Monday, April 4, 2011

पारोसे घर

आज ६ वर्षात प्रथमच " यशोधन " गुढीविना ओके बोके राहिले. तसे ते त्या आधी जवळ जवळ १५ एक वर्ष पर्यंत ओके बोकेच होते. पण आम्ही राहायला गेल्यापासून त्याचे घर झाले होते. अगणित आठवणींचा खजिना बनलेले घर. ज्या घराने आम्हा दोघांना आमची स्वतंत्र ओळख दिली, आपापले स्वतंत्र विश्व निर्माण केलेले पाहिले, जिथे अनेक कटू सत्यांना आम्ही सामोरे गेलो आणि त्यातून तावून सुलाखून बाहेर हि निघालो, जिथे आमच्या दुसर्या अपत्याचा जन्म झाला, आणि जिथे थोरल्याच्या मुंजीचा सोहळा अत्यंत दिमाखात राबवला गेला, असे आमचे घर आज पारोसेच राहिले.
ज्या दिवशी ठरवले आता " यशोधन" मध्ये बस्तान हलवायचे तो क्षण आठवतोय. खूप विचार विनिमय, करून घेतलेला तो निर्णय अतिशय योग्य आणि सर्वांच्याच दृष्टीने हितकारक असा ठरला याचे आज समाधान वाटते. सर्वांचा होकार अगदी मनातून आला नाहीये हि सल घेऊन काहीशा अपराधी भावनेनीच आम्ही "जगन्नाथ" चा उंबरा मागे टाकला आणि "यशोधन" मध्ये प्रवेश केला. तिथली ती पहिली अनोळखी रात्र आम्ही दोघांनी अस्वस्थ चित्त आणि भरलेल्या डोळ्यांनीच काढली.
मग सुरु झाला अंधारात चाचपडण्याचा प्रवास. वयाची २५ शी ओलांडून आणि एक अपत्य पदरात असूनही म्हणावे तसे संसारिक शहाणपण आम्हा दोघांकडे नव्हते. "जगन्नाथ" मधील ५ वर्षात दूध पिशवी चा रेट, वर्तमानपत्राचे बिल, बाईचा पगार, आणि अशा इतर गोष्टींशी अमचा सुतराम संबंध आला नव्हता. चुकत माकत, सगळी अक्कल आलीच हळू हळू.
खर्या अर्थाने स्वतःच्या आयुष्याचा गांभीर्याने विचार करायला मी त्या सुमारास लागले. घराबाहेर चे जग कुठल्यातरी स्वरूपात निर्माण करायचे मनात पक्के केले. आणि करून पाहू म्हणून रानडे मध्ये जर्मन भाषा सर्तीफिकेत कोर्स ला प्रवेश घेतला. तो क्षण माझ्या कल्पने पलीकडचा टर्निंग पोईंत ठरला. एकतर जे १०, १२, पदवी पर्यंत उमगले नव्हते ते आत्ता उमगले. माझी आवड, माझी गती भाषा विषयात आहे हे उलगडले. शिकवलेले पटापट आत्मसात होत गेले. आणि मनावर कसलेही दडपण न घेता मी प्रथमच अभ्यास करत होते. कोणाच्या माझ्याकडून कसल्याच अपेक्षा नव्हत्या. अभ्यास बरोबर कोर्स मधल्या एक्स्ट्रा करिकुलर उपक्रमान मध्ये हिरीरीने भाग घेऊ लागले. इथे पुन्हा मला प्रथमच कोणाचीही आडकाठी नव्हती. बक्षिसे मिळवली. नाटक बसवले. समवयस्क नसला तरी माझा प्रथमच मित्रा- मैत्रिणींचा ग्रुप जमला. जे जे निसटले ते ते अनुभवण्याची सुवर्णसंधी या वेळी अजिबात सोडली नाही.
सेर्तीफिकेत नंतर डिप्लोमा केले. त्यात चक्क तिसरी आले. माझ्यातल्या ह्या बदलाने मीच चक्रावून जात होते. पण माझा हा न्यूनगंदातून आत्मभानाकडे झालेला प्रवास मी " यशोधन" मधेच अनुभवला. तो तिथेच घडायचा होता. हे विधिलिखित होते.
अभिजित मध्ये हाच आत्मविश्वास फुलून आलेला ह्याच घराने पहिला. नवीन विचार, नवीन शक्यता पडताळून पहायचे बळ ह्याच घराने त्याला दिले.
दुसर्या अपत्याचा विचार आणि आमच्या बाळाचे स्वागत ह्याच घराने केले. राजस चे मित्रमंडळ ह्याच घराने वाढवले. त्याचे रिक्षातील मित्रं, ग्राउंड चे मित्रं, आसपासचे मित्रं, असे वर्तुळ निरंतर फोफावत गेले. त्याच्या दृष्टीने तेव्हाही नवी पेठ हेच घर त्याच्या मनात कायम होते. कारण तिथे त्याच्या लाडाची माणसे होती. पण तो "यशोधन" मध्ये रमला होता हे निश्चित. आता इकडे आल्यावर त्याला "यशोधन" सुटल्याची जाणीव अस्वस्थ करते यातच सगळे आले.
राजस च्या मुंजीचे ग्रहमक आणि देवक हट्टाने मी "यशोधन" मधेच बसणार हे जाहीर केले. ४ दिवस घर नव्या नवरिगत नटले होते. येणाऱ्या जाणार्यांची वर्दळ, दारी मांडव, जेवणाच्या पंगती, सगळं कसं मस्त जमून आलं होता. तेव्हा ठाऊक नव्हते त्या घरातले ते शेवटचे मंगल कार्य असणार आहे ते. कार्य दणक्यात पार पडले. श्रम-परिहार होऊन जेमतेम वर्ष होते न होते तोवर तिथून गाशा गुंडाळण्याची वेळ आली. आणि अशी आली कि धडपणे त्या वास्तूला अखेरचा दंडवत हि करायचे राहून गेले.