Monday, December 19, 2011

पर्व नवे

ऑन-लाईन मैत्री हि या दशकाची एक देणगी आहे यात वाद नाही. या मैत्री मध्ये जितकं थ्रील, वेगळेपण, तितकीच रिस्क सुद्धा. एखादा आश्वासक दुवा सापडला तर मात्र प्रत्यक्ष मैत्री इतकाच आल्हाद दायक अनुभव मिळतो हा माझा अनुभव. आमच्या तनिष्का परिवार बाबत तरी हेच म्हणता येईल.
'तनिष्का' हे सकाळ वृत्तपत्र समूहाचे नवीन मासिक ५ वर्षान पूर्वी हातात आले आणि त्यातील विषय हे नेहमीच्या टिपिकल महिला स्पेशल मासिकान पेक्षा हटके आहेत हे जाणवले. तोवर मासिकान मध्ये सरधोपट अशी दोन टोकं होती. एक बाजूला 'बेहेनजी' प्रकारातील साचेबद्ध घरेलू विषयांना आधुनिकतेची फोडणी पेरलेली, त्यातील कथा या आपल्याशा न वाटणाऱ्या, त्यातील टिप्स वाचून वाचून चोथा झालेल्या, कौटुंबिक प्रश्नोत्तरे हि निव्वळ मासिकाचा खप वाढवा या साठी निर्मिलेली तडक-भडक अशी 'सहेली', 'मैत्रीण',वुमेन'स इरा', मधून डोकावणारी. आणि दुसर्या बाजूला अगदी उच्चभ्रू वर्गाला साजेसे 'फेमिना' गटातील मासिके ज्यात फेशन, मेकप, आणि घरभेदी विचारसरणी चा भडीमार या शिवाय काही नसे.
या दोन्ही टोकाच्या वर्गातील स्त्री मासिकान मध्ये समन्वय साधत मुख्यत्वे वैचारिक, बौद्धिक आणि सामाजिक जाणिवेचे खाद्य पुरविणारे मासिक म्हणून 'तनिष्का' समोर आले.
आजूबाजूच्या पुरुष प्रधान जगात, लढत,झगडत का होईना पण पण आपले स्थान मागत वावरणाऱ्या , स्व-ओळख असलेल्या आणि त्यामुळेच स्वतंत्र विचारसरणीच्या अश्या स्त्रियांचे खर्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारे मासिक म्हणून 'तनिष्का'ने आपली ओळख प्रस्थापित केली आणि आमच्या मनात घर केले.
कालानुरूप या मासिकाने खास 'netizens' पर्यंत हि पोचता यावे या कारणाने ओर्कुट वर 'तनिष्का' नामक ऑन-लाईन समूह चालू केला. त्याची लिंक मासिकावर झळकू लागली. फेसबुक शी अजून मैत्री न झालेल्या पण ओर्कुट वर बर्यापैकी स्थिरावलेल्या माझ्या सारख्या अनेक सख्यांना नवीन लिंक आकर्षित करू लागली. बघूया तरी काय प्रकार आहे या विचाराने सभासदत्व घेतले गेले.
सुरवातीला केवळ मूक वाचक राहणे माझा सारखेच अनेकींनी पसंत केले. त्या काळात इतर सहभागी मेम्बर्स च्या पोस्ट्स वाचणे आणि एकेकीची एकतर्फी पारख करणे चालू असायचे. मग हळू हळू विश्वास दृढ व्हायला लागल्यावर प्रकट होऊन पोस्ट्स टाकणे, नवीन टोपिक्स टाकणे आणि त्यावर चर्चा करणे सुरु झाले. जुन्या जाणत्या मेम्बर्स नीच मग मराठी फोन्ट कसा वापरायचा ते हि शिकवले. आशा तर्हेने सावध पावले टाकीत सुरु झालेला प्रवास मजल-दरमजल करीत वेग घेऊ लागला.
समुहात प्रकट होऊन सहभाग घेणाऱ्या सख्या दूरवर पसरलेल्या आहेत. यु.एस, सिंगापोर, ओमान, युके, मधून तर आहेतच पण महाराष्ट्रात देखील जयसिंगपूर, फलटण, कल्याण, ठाणे, मुंबई, पुणे सांगली, सातारा, रत्नागिरी ,सोलापूर आणि भारतभर देखील उज्जैन, हैदराबाद येथे हि आहेत. पण असे लक्षात आले कि पुण्यातील सख्या मेजोरीटी मध्ये आहेत आणि समूहाची समन्वयक आणि सर्वेसर्वा मंजिरी फडणीस हिच्या शी बोलून एक कल्पना सुचली.
आजवर केवळ ऑन-लाईन भेटलेल्या पण एव्हाना एकमेकींना पुरेपूर ओळखलेल्या मेम्बर्स चे पुण्यात सारसबागे मध्ये पाहिले गेट-टुगेदर ठरले. त्यात शहरातील व चिंचवड, कल्याण,फलटण आणि जय्सिंपूर हून देखील सख्या आल्या होत्या. समोरासमोर आल्यानंतर खरेतर पहिल्यांदा भेटल्याचा फील आम्हाला कोणालाच आला नाही, तरीही आमची ओळख आणि मैत्री वर्चुअल जगातून वास्तवात दृढ झाल्याचा आनंद काही औरच होता हे निश्चित.
त्या नंतर आजवर अनेक गेट-तुगेदर्स झाली, कधी संभाजी बागेत कधी सारस बागेत तर दोन तीनदा पानशेत मधील सूर्य शिबिरात हि सहली झाल्या.
मंजिरी फडणीस ने आजवरच्या एकूण एक नाही पण जास्तीत जास्त गेट-तुगेदर्स मध्ये नुसती हजेरीच नाही तर वेळ काढून सहभाग घेतला आणि ऑन-लाईन नव-नवीन विषय काढून आम्हाला प्रतिक्रिया द्यायला, लिहायला उद्युक्त करून अनेकदा मासिका मध्ये आमची नावेही छापून आणली. अनेकींचे छंद, त्यातून त्यांनी केलेले अर्थार्जन कधी समाजकार्य समोर आले. अनेकींच्या कौतुकाने, अभिमानाने छाती फुलून आली. कित्येकींनी सख्या मैत्रिणीन प्रमाणे एकमेकींना आधार दिला, दिलासा दिला. इतर नात्यान प्रमाणेच इथेही अनेकदा 'अतिपरिचयात अवज्ञा' डोकावली पण काळाने त्यावरही मात केली आहे आणि एकमेकींना आता आमच्यातील गुण-दोषान सहित आम्ही पूर्णपणे स्वीकारले आहे.
या समूहातील सहभागाने मला खूप समृद्ध अनुभव दिले आहेत. समोर न दिसणाऱ्या व्यक्तीला माणूस म्हणून कसे जोखावे याचे शिक्षण याच समूहातून मिळाले. दृष्टीभेत न घडता हि आपला सच्चा व्यवहार समोरील सच्च्या व्यक्तीला किती अचूक भिडतो हा प्रत्यय आला.
आमच्या नवीन कल्पनेचे बीज हि याच समूहात रोवले गेले. 'बोल-सखी' या ऑन-लाईन समूहा ची स्थापना याच तानिश्कातील मैत्रिणींच्या आग्रहा खातर झाली. त्याची पाळे-मुळे रुजून आता अडीच महिने झाले आहेत. तो आता मन मोकळे करण्याचा एक हक्काचा कट्टा बनून गेला आहे. आपल्याला खरेतर किती काय काय बोलायचे असते, पण ते सोडून आपण इतरच काही बाही बोलत राहतो याची जाणीव आता सख्यांना होऊ लागली आहे. बर्याचदा हवे ते न बोलल्याने, खदखदणारा विचार कोणापाशी तरी बोलून न टाकल्याने किंवा आपण करू किंवा बोलू ते चूक कि बरोबर हे न ठरवता आल्याने एकटेपणाची, वैफल्याची भावना निर्माण होऊ लागली कि तिचे पडसाद शरीरावर उमटल्याशिवाय राहत नाहीत. हा समूह 'तुमच्या समस्यांची तत्काळ उत्तरे' वगैरे अजिबात देत नाही. फक्त आपण एकटे नाहीयोत हि भावना मात्र नक्कीच रुजवतो. समस्या नाकारणे हे उत्तर कधीच नसते, त्याला भिडून त्य्चाशी कसे डील करता येईल याच्या शक्यता तपासून बघायला आपल्या समूहाची नक्कीच मदत मिळू शकते. आणि बायका आश्वस्त झाल्या कि त्या बोलतातच, नव्हे ती त्यांची ताण मुक्त होण्याची गरजच आहे हे या समूहातील पोस्ट्स च दर्शवतात.
या ऑन-लाईन विश्वाने मला वैयक्तिक रित्या एक फ्रेंड फिलोसोफेर आणि गाईड 'मीनल दफ्तरदार' च्या रूपाने दिला आहे. बहुदा देवानेच तिचे माझ्या आयुष्यात येणे, हे माझ्या दोन जवळच्या व्यक्ती हिरावून घेतल्या बद्दल केलेली भरपाई वाटावी असे नियोजित केले असावे. तो आहे आणि कुठले रूप घेऊन कधी प्रकट होईल सांगता येत नाही हेच खरे. गणपती बाप्पा मोरया.