Wednesday, July 4, 2018

navat kay ahe

#नावातकायआहे#

हीच तिची पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया होती . जेव्हा नवऱ्याने त्याचा मानस तिला बोलून दाखवला होता . आपल्या धाकट्या अपत्याचे लेकीचे नाव बदलण्याचा ..... म्हणजे तिच्या नावातील वडील म्हणून आपले असलेले नाव काढून , आई म्हणून बायकोचे नाव घालण्याचा . आई म्हणून नुसते कर्तव्या पुरते , लाडापुरते नाही , तर दोन मुलां पैकी एकाच्या नावाशी कागदोपत्री देखील आईचे नाव जोडले जावे हा त्याचा सरळ साधा हेतू .

आता नवऱ्याचा सरळ साधा हेतू बायकोच्या सहजासहजी पचनी पडला तर कसं चालेल ? तिला असंख्य प्रश्न पडले . मुळात आत्ता हे करायची काही गरज आहे का ? त्यामुळे काही प्रॉब्लेम आला तर ? लेकीच्या पुढील कागदपत्रांमध्ये काही अडचण अली तर ? त्याचं उत्तर तयार होतं - पुढे अडचण येऊ नये म्हणून हीच योग्य वेळ आहे . ती म्हणाली - उद्या लग्न झाल्यावर आपलं आडनाव तरी लेक पुढे लावणार आहे का हे कुठे नक्की आहे ?
आडनावाचाच भरोसा नाही तर माझं नाव जोडलेलं राहील याची काय शाश्वती ? यावर तो म्हणाला - लगेच १० वर्षात तिचं लग्न लावणार आहोत का आपण ? पुढचं पुढे बघू . हि लगेच म्हणाली - मग लेकाचं का नको ?
त्याचं हि बरोबर होतं - त्याच्या स्कूल लिविंग आणि मार्कशीट वर  आधीच माझं नाव आलंय . त्या पेक्षा लेकीचं बदलणं सोपं आहे .

मग तिने  ब्रम्हास्त्र काढलं . तुझ्या लेकीला चालणार आहे का विचार आधी . नाही  म्हटलं तरी तो हि गडबडलाच . लेकीला एव्हाना स्वतःची मतं आहेत हे तो चांगलंच जाणून होता . लेकीसमोर हा  विषय काढताच अपेक्षित रिऍक्शन आली - हे काय ...... नाव का बदलायचं ? मला सवय झाली आहे याच नावाची , मी एकटीच शाळेत आणि बाकी सगळीकडे ऑड मॅन आऊट होईन , मग सगळे काय म्हणतील वगैरे प्रश्नांच्या फैरी झडल्या .

बायको गालातल्या गालात हसत होती . त्याने काही दिवस जाऊ दिले . थोडे लेकीच्या कलाने वागून घेतले .   लेकीने हि संधी ओळखून वरचेवर काही दिवस बाहेरून पार्सल ऑर्डर्स मागवून घेतली . पुन्हा हा विषय लेकीसमोर काढल्यावर ती परत आपल्या मागच्याच भूमिकेवर ठाम . ती बधायला तयार नाही म्हटल्यावर त्याने त्वरित खिसा आवरता घेतला आणि आपला पवित्रा  बदलायचे ठरवले .  लेकीला  समज तशी चांगली होती , हे तो जाणून होता . त्यामुळे आता सरळ तिच्याशी आपली या विषया  मागची भावना शेअर करायचे त्याने नक्की केले .
या शेअरिंग चा मात्र हवा तो परिणाम झाला आणि लेक तयार झाली.

आता त्याने मैदानच मारले म्हटल्यावर बायको ला नवीन काही मुद्दे उरलेच नाहीत . लगोलग तो कामाला लागला , आवश्यक ती तजवीज केली , आणि मनात आलेला विचार कृतीत उतरवला . इतके दिवस काथ्याकूट करता करता वारंवार कानावर पडत असलेले नवीन नाव एव्हाना घरात सर्वांच्याच सवयीचे झाले . त्यामुळे त्यातील वेगळेपणाचा अंश तर गेलाच , आणि त्या जागी नव्या बदलांची नांदी आणणारे कर्त्या पुरुषाचे वेगळे विचार लक्खपणे समोर आले .
Savni Meenal Deosthale