#ForeverHost
आपण परदेशात टूरिस्ट म्हणून जायचं ठरवताना सगळ्यात पहिले काय बघतो, " अरे अमुक अमुक या स्टेट मध्ये आहे, बर झालं" , " तिकडे तमुक तमुक आहे , काळजीच नको," हो कि नाही ? या बिचार्या फोरेवर होस्ट ना कायमच उचक्या लागत असतील इतके आपण भारतीय त्यांच्या कडे जायच्या प्लान्स ने त्यांच्या आठवणी काढत असतो. खासकरून मे महिना, दिवाळी, या टिपिकल भारतीय सुट्ट्या आल्या कि तर हमखास.
नाताळच्या सुट्टीत तीच मंडळी इकडे येतात त्यामुळे तेवढीच काय ती त्यांना सूट. नाही तर कोणी न कोणी भारतीय कनेक्शन यांना कायमच गृहीत धरत असावं. अगदी सासूच्या मैत्रिणीच्या बहिणी पासून ते मेव्हण्याच्या भाचीच्या मैत्रिणी पर्यंत कोणीही यांना आपल्या येण्याची वार्ता कळवत असत. अगदी तंबू ठोकून राहायला येण्यापासून ते एक दिवसाचा स्टोप ओवर असो किंवा नुसती सौजन्य भेट असो या फोरेवर होस्ट ना कायमच एक प्रकारे डोक्यावर टांगती तलवार असेल. बर, ओळख वरवरची असो , त्यांचे काही प्रोग्राम्स ठरलेले असो , त्यांना एखादा वीकेंड काहीही न करता नुसते लोळायचे असो, परदेशात स्थायिक आहेत म्हटल्यावर, त्यांनी भारतीय टूररिस्ट ना अटेंड करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य असल्यासारखी अपेक्षा आपण ठेवतो.
एकदा पाहुणे आलेत म्हटल्यावर कोणत्या गोष्टी चुकत नाहीत ? आणि पहिल्यांदाच आलेत म्हटल्यावर तर अत्यंत प्रेमाने काही गोष्टी नव्हे लाड जी हि मंडळी करतात त्याला तोड नाही. मुळात मनात जागा म्हणून घरात जागा करणे, एरपोर्ट पिकप, स्पेशल मेन्यू प्लानिंग, साईट सीइंग शेड्युल बनवून देणे, तेथील कल्चर, पदार्थ, खरेदी सकट सगळ्या खासियातींचा आपल्याला आस्वाद घेता यावा म्हणून धडपडणे, आपल्या व्यस्त शेड्युल मधून आपल्याकरता वेळ काढणे, मुलांच्या विविध उपक्रमांमधून आपलं हवं नको बघणे.
बर, येणारे काही आपण एकमेव नसतो. आपल्या आधी अनेकजण पाहुणचार घेऊन गेलेली असतात, नंतर हि ओघ सुरु राहणारच असतो. अगदी आपणच काही लाडके नसतो, इतरही त्यांचीच जोडलेली जीवाभावाची माणसे असतात तरी देखील हे बिरूद मिरवत आपली घरे, मने, वेळ, आपल्यासाठी सदैव खुली ठेवणारी हि मंडळी असतात. अगदी यांच्या आणि आपल्या आधीच्या दोन पिढ्यांनी देखील शहरात घरे केल्यावर गावाकडच्या पाहुण्यांचं आगत स्वागत करण्यातच हयात घालवलेली असते सगळं सगळं काबुल असलं तरी म्हणून याचं योगदान किंचितही फिकं पडत नाही. उलट भयंकर तारेवरची कसरत आहे हि. या सर्वांबद्दल एकच भावना " तेथे कर माझे जुळती "
माझ्या आजवरच्या उण्या पुर्या दोन परदेशवार्या ज्यांच्या जीवावर, घरावर, पाहुणचारावर पार पडल्या अश्या याच जमातीतील काही जिवलगांना tag करतेय.
- मीनल