Friday, April 26, 2024

shaheer

#cinemagully 
#MaharashtraShaheer 
जी पांढरपेशी कुटुंबं शाहिरांच्या कलेवर फिदा होती त्याच एका घरापैकी मी ही आहे. लहानपणी कानावर मोठ्यांकडून शाहिरांंचे कौतुक कानावर पडत असे, त्यांच्या कलेबद्दल, कार्यक्रमांबद्दल दूरदर्शन वर लागलेले बघितले जायचे, सर्वांना आवडायचे इतपतच माहीत होते. मग चारूशिला वाच्छानी, केदार शिंदे यांच्या कामातून हा वारसा पुढील पिढीत येत राहिलेला पाहून जीव सुखावत राहिला. 

या ग्रुपवर मात्र वसुंधरा ताई यांच्या लेखनातून लोकधारेची, त्यांच्या कुटुंबियांची आणि शाहिरांच्या जीवनपटाची विस्तृत ओळख होत गेली आणि किती थोर कलावंत महाराष्ट्राला लाभले याची नव्याने जाणीव झाली.
आताशा ott आल्यानंतर आणि कोविड ने घरबसल्या सर्व कारभार करााची सवय लावल्यावर खरोखर चित्रपटगृहात जाण्यापेक्षा आला ott वर कि बघू असे झाले आहे. पण उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना मोठा पडदाच न्याय देऊ शकतो, हे आज पुन्हा एकदा अधोरेखित झालं. 

एक अख्खं आयुष्य, त्यातल्या चढउतारांसह चित्रपटात सामावून कलाकृती प्रत्यक्षात आणणं या सारखं अवघड शिवधनुष्य सर्व टीम ने मनापासून पेलले आहे, शाहिरांना मुलांची भरारी कौतुकाने पाहता आली, पण माझ्यासारख्या अनेक जणांना लोकधारा कळत्या सवरत्या वयात अनुभवायला मिळायला हवी ही हुरहुर लावत हा चित्रपट संपतो.
 
इतर पोस्ट मधे प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली या सारखे काढलेले निष्कर्ष घाईघाईने काढू नये असे वाटते, long weekend आहे, मुलांचे निकाल घेऊन सगळे गावाला गेले आहेत, मराठी भाषेवर प्रेम करणारा प्रेक्षक या चित्रपटाकडे आणि केदार शिदेंच्या कलाकृतीकडे पाठ फिरवणार नाही हे निश्चित. 

याच प्रेमापोटी एक आणि फक्त एकच खटकलेली आणि कितीही करु म्हटलं तरीही दुर्लक्ष करता न येण्याजोगी गोष्ट म्हणजे सना शिंदेचा मराठी लेहजा. 
त्या काळातील गावातील मुलीच्या तोंडी जो लेहजा अपेक्षित आहे तो सापडला नाही. पदार्पणातच अवघड भूमिका ज्यात अनेक कंगोरे आहेत ती साकारताना दमछाक होणे स्वाभाविक आहे, पण....  

असो, बाकी सर्व कलाकार, तंत्रज्ञ, संगीत, गायक आणि अंकुश नावाचा झंझावात....... अ प्र ति म

archies

#CinemaGully 
#TheArchies

अनुल्लेखाने मारण्याइतका वाईट नक्कीच नाही. 
Zoya साठी, starkids साठी Archies कॉमिक साठी मी पाहिला हे म्हणण्यात मला कसलाही कमीपणा नाही.

काही मुद्दे सुरवातीपासून या चित्रपट च्या विरोधात मांडले जात होते, ते तेव्हाही पटले नव्हते आत्ताही नाही. 

हो आहेत ही starkids, मग काय करावे त्यांनी त्याचे? 

दुकानाच्या गल्ल्यावर बाप बसतो नंतर त्याचा मुलगा/मुलगी बसतो/बसते ....
बापाचे हॉस्पिटल मुलगा/मुलगी डॉक्टर होऊन पुढे चालवतो/ते ......
छान तेजीत चालणारी CA, वकील, वास्तूविशारद यांची प्रॅक्टिस त्यांची त्यांची मुले सर्व तयार सेट अप सकट पुढे नेतात. 

उलट हे सर्व असताना त्याने/तिने जर नाही ते पुढे नेले तर आश्चर्य व्यक्त केले जाते.

अगदी आत्ता आत्ता पर्यंत आपल्याला रोशन च्या 3 पिढ्या, कपूर च्या 4 पिढ्या, भट परिवार, चोप्रा परिवार, देओल परिवार, आणि या सारखे अनेक सिने क्षेत्रात आलेले, पडलेले, वाईट पडलेले, चमकलेले, तूफान पुढे आलेले आपल्याला चालत होते.

राजकारणात झालेले nepotism आपल्याला नवीन नाही.

मग आत्ताच nepotism ही संकल्पना का अचानक सर्वांना छळते आहे? 
त्याच्या बाहेर येऊन आपण नवीन कलाकारांना कलाकार म्हणुन पाहूया का?

त्यात ही मूळ पात्राच्या ते किती जवळपास जाऊ शकले का नाही या पेक्षा दिग्दर्शकाला पात्र ज्या प्रकारे दाखवायचे होते तसे त्यांना साकारायला जमले आहे का हे पाहता येईल. 

आजवर screen presence फक्त दोन कलाकारांना पदार्पणातच जमला असे मला वाटते, ऋषी कपूर आणि हृतिक रोशन. 

तर या बाळांचा त्यात ही स्टार किड्स चा screen presence किंचित कमी पडला आहे असे वाटले. इतर बाळा ना stardom प्रेशर नसल्यामुळे ते जास्त सहज वाटले. पण रद्दड म्हणावे असे मात्र कोणीच नाही. 

गोष्ट आणि सादरीकरण म्हणाल तर मूळ कॉमिक पेक्षा जास्त चांगले आहे असे म्हणावे लागेल कारण मूळ कॉमिक हे teen romance च्या पलिकडे जात नाही आणि Betty, Veronica Archie आपल्याकडे धरून ठेवण्याच्या धडपडी पलिकडे जात नाहीत. 

इथे मात्र मुलींना कुणालातरी इम्प्रेस करण्यापलीकडे स्वतः कडे व्यक्तित्व विकासासाठी नव्याने बघण्याचा सल्ला पटकथेत दिला आहे. तसेच छोटेसे कथानक त्या काळाला साजेसे गुंफले आहे. 

काळ, स्थळ, गोष्ट, पात्र 
सगळे काल्पनिक असल्याचे वेळोवेळी तो सांगीतिक विराम आपल्याला करून देतो आणि आपण आपसूक कशात लॉजिक शोधण्यापासून परावृत्त होतो. 

तर गोड आहेत सगळे कलाकार, पुढे आले तर आनंद आहेच, नाही तर त्याचे कारण आणि उत्तर त्यांना वेळीच समजेल ही आशा ठेवायला हरकत नाही.

kho gaye....

#CinemaGully 
#khogayehumkahan 
#netflixmovies 

झोया अख्तर रीमा कागती लिखित अजून एक मैत्रीचा नजराणा.
पुन्हा तेच त्रिकूट, पुन्हा तीच केमिस्ट्री तेच टिपिकल झोया स्टाईल शहरी वातावरण (ज्यात उभं आयुष्य गेल्यामुळे ते दाखवण्यात ती रमते, पण त्याच बरोबर गली बाॅय चे आयुष्य सुद्धा अचूक चितारते)
त्याचप्रमाणे त्रिकूटातील एक जण इतर दोघांपेक्षा मध्यमवर्गीय स्तरातील असणे हे समान धागे झाले.

या वेळचे वेगळेपण म्हणजे चित्रपट पूर्णपणे जेन झी च्या सोशल मीडिया ने व्यापून टाकलेल्या आयुष्यावर आधारित आहे.

झोया आणि रीमा च्या लिखाणातली दमदारपणा प्रसंगानुरूप संवादांमधून उत्तम प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांची मांडणी आणि सादरीकरण याची अचूक जबाबदारी दिग्दर्शक पार पाडत त्याला चार चाँद लावतो.

आपल्या आजूबाजूचे मुलं मुली फोन मध्ये डोकं घालून नेमकं काय करत असतात हे आपल्याला कितीही ठाऊक असलं तरी त्याचे दुरगामी परिणाम किंवा त्याची चटक लागणं म्हणजे काय आणि त्याच्याशिवाय पान न हलणं म्हणजे काय हे बघताना आपण पुन्हा एकदा चाट पडतो.

यांच्या आयुष्यावर टिप्पणी करण्याकरता इमादच्या स्टँड अप कॉमेडी चा वारंवार केलेला वापर फार सुरेख जमून गेला आहे.
 
 एका रूममध्ये एकत्र मित्रांबरोबर बसलेले असताना देखील आपण एकमेकांत सहभागी नसतो, आपण एक एकटे आपापल्या फोनच्या विश्वात रममाण असतो, कुणी टिंडर वर असतं कोणी शॉपिंग करत असतं कुणी टेक्सटिंग करत असतं.
नीलच्या कामाचा भाग म्हणून त्याने इंफ्लुएनसरशी मैत्री करणं आणि त्यानंतर तिच्यात एकतर्फी गुंतत जाणं, तिने मात्र त्याच्याकडे विरंगुळा म्हणून पाहणं एवढेच नव्हे तर आपल्या फॉलोवर्सचा आकडा यत्कींचित ही कमी न होता तो वाढतच जावा यासाठी त्याच्याबरोबरची कोणत्याही प्रकारची जवळीक पोस्ट न करणं, जाहीर न करणं हे सगळं बघता आपण चक्रावून जातो.

चित्रपटाचा बऱ्यापैकी भाग हा या इनफ्लुएनसर स च्या आयुष्यातले झोल आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना होणारे मॉरल पोलीसिंग, ट्रोलिंग, त्यांचं स्वतःतच रममाण होण्याची वृत्ती, एक वेगळंच जग झोया आणि रीमा आपल्याला दाखवतात.

मागणी तसा पुरवठा याच न्यायाने सर्व दोष त्यांच्याकडे न टाकता दुसऱ्यांच्या आयुष्यात 24 तास डोकावण्याची आपल्याला लागलेली चटक तितकीच या सगळ्याला जबाबदार आहे हे अधोरेखित हा चित्रपट करतो. 

दुसऱ्यांचं भारी आयुष्य बघत बघत यातील पात्र आपल्या आयुष्याशी तुलना करत राहते मग स्वतःबद्दल कीव येत मग भारी वाटण्यासाठी ती भारी भारी फोटो टाकत स्वतःचं सुरळीत नसलेलं आयुष्य सुद्धा किती हॅपनिंग आहे याचं प्रदर्शन मांडते आणि मग त्याला मिळालेल्या व्ह्यूज लाईक आणि कमेंट्स मधून आपल्या स्वप्रतिमेला गोंजारत राहते. 

आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की ट्रॉलर्स नेमके कोण असतात का प्रत्येक अकाउंट बद्दल प्रत्येक पोस्ट बद्दल काहीतरी खोचक बोचक कधी विकृत अशी टिप्पणी करायची असते याचे उत्तर आपल्याला हा चित्रपट जाता जाता देऊन जातो.

 तसंच झोयाच्या आधीच्या चित्रपटांमध्ये दिसलेला मैत्रीतला एक नाजूक क्षण इथे ही येतोच. मैत्रीतील ती अदृश्य सीमारेषा जेव्हा नकळत किंवा जाणून बुजून पार केली जाते, मस्करी ची कुस्करी होते. तेव्हा इमादच्या हातून घडलेलं कृत्य नंतर त्याला आणि आपल्या पुढेही हा प्रश्न फेकत राहतं. तुमची पोस्ट, तुमचे अकाउंट, तुमचा परफॉर्मन्स दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यावर ताशेरे उडत हिट करायला आपण मागेपुढे पाहत नसू तर तेच ताशेरे आपल्या उणीवांवर आपण मारू शकतो का त्यावर विनोद निर्मिती करू शकतो का हे सोशल मीडिया वर वावरणाऱ्या प्रत्येकाने पडताळून बघायला हवे. 

सर्वांची कामे सुरेख झाली आहेत, अनन्या आजवर इतकी कधीच आवडली नव्हती. सिद्धांत, आदर्श सारखे इंडस्ट्री बाहेरील टॅलंट टॅप करणारी झोया का खुशी, सुहाना, अगस्त्य यांना पदार्पणाची संधी देते किंवा का अनन्या, आलीया साठी अनुरूप पात्र निर्मिती करते याचे उत्तर तिला स्वतःच्या कौटुंबिक पाश्र्वभूमीमुळे मिळालेल्या privilege मधे आणि त्याचे चीज करण्यामधे आहे.

animal

#CinemaGully 
#Animal
#roastalert
#diehardfanspleaseignore

एकदा का धरून चाललं कि हे परग्रहावरील जीवसृष्टी चे चित्रण आहे मग आपले सर्व त्रास वाचतात. लॉजिक शोधायचे तर वाचतातच पण उर्वरित मूर्खपणा स्थितप्रज्ञ अवस्थेत बघता येतो. 

 1) जे कॉलेज तुमच्या मालकीचे त्याच कॉलेजमध्ये तुमच्या मुलीचे रॅगिंग होते......
 हे म्हणजे धीरूभाई अंबानी शाळेमध्ये अंबानी कन्येचे रॅगिंग होण्यासारखे आहे

 हे चुकून झाले अशी कल्पना जरी केली तरी रॅगिंग करणाऱ्या मुलांना वास्तवात त्या कॉलेजमध्येच काय राज्यातील कोणत्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू नये याची व्यवस्था करणे इतक्या मोठ्या business magnate च्या हातचा मळ खरतर..... 

पण नाही .....आपण ते मुळीच मनावर घ्यायचे नाही.
भावाला हातात गन घेऊन भर वर्गात फायरिंग करण्यावाचून कोणताही पर्याय नाही हे मान्य करायचे.

2) पितृसत्ताक मोठ्या इंडस्ट्रियलिस्ट कुटुंबातील एकुलतं एक पोरगं जे पुढे तुमच्या अख्ख्या उद्योगधंद्याचा वारस होणार आहे तो दुर्लक्षित घटक म्हणून वाढला या बाबीवर आपण विश्वास ठेवायचा.
 
तो एक वेळ अति लाडात वाढलेला नखरेल चढेल ऐतखाऊ मतलबी दाखवला असता तरी चाललं असतं. अशा गंडलेल्या मुलाचं एवढं मोठं फ्रेंड सर्कल असू शकतं हेही मान्य करायचं. या पोरापासून चार हात लांब राहा असं सांगणारे पालक काय ते पृथ्वीवर.

 3) तितकीच बिनडोक ती गीतांजली. बहिणीसाठी हातात गन घेतलेल्या पोरावर आधीच फिदा झालेली. अल्फामेल ची स्टोरी न सांगताच त्याला पटली असती, काय ते अक्कल गहाण ठेऊन त्याच्या थिअरीवर मोहित होऊन लग्न मोडणं, brainwashing म्हणतात ते हेच असावं नाही? 

4) एकुलत्या एका मुलाच्या विचित्र वागण्याचे कुटुंबाला काहीही देणं घेणं नाही, पोटच्या पोराला एका प्रकारे वाऱ्यावर सोडल्यागत वागणं, आई, बापावर सगळा दोष टाकून मोकळी, त्याला कुठे डॉक्टरकडे, मानसोपचार तज्ञाकडे , ते झेपत नसेल तर पोरगं सुधारण्यासाठी निदान देव देव, कर्मकांड काही काही हे कुटुंब करताना दिसत नाही.
 
यांच्याकडे दोनच उपाय, थोबाडीत लगवायच्या आणि boarding ला पाठवायचं.

 5) तिकडे मात्र सुतासारखे सरळ वागून लगे हातों private jet pilot चे प्रशिक्षण घेण्याचे शहाणपण रणविजय ला आले ते एक बरे झाले. पोटापाण्याचे ही स्वतंत्र बघायला शिकला हे ही आपण समजून जायचे.

6) या ग्रहावर पोलीस नाहीत बरं का 
गुन्हा घडल्यानंतर उशिरा यायची, लाच घेण्याची, सत्ताधाऱ्यांच्या प्रेशर खाली दबून राहण्याची कसली कटकटच नाही. 

7) below the belt dialogues प्रचंड गंभीर आविर्भावात यातील पात्र बोलतात. कमाल....

8) बदला घेण्याच्या नावाखाली काय हवं ते करून घ्या, adultery वगैरे बारीकसारीक collateral damages व्हायचीच.....त्यात काय विशेष 

 
रणबीर चे कोटी कोटी आभार कि व्यक्तिरेखा साकारताना बुद्धि शाबूत ठेवून अतिशय सजगपणे वठवली आहे. त्याला पाहून डोक्यावर घ्यावसं वाटतं का चीड येते हे मात्र व्यक्तिसापेक्ष आहे.

Ali baba ....

#CinemaGully 
#अलीबाबा_आणि_चाळीशीतले_चोर 

 अलीबाबा आणि चाळिशीतले चोर यातील प्रत्येक पात्र वेगवेगळ्या पातळीवर चोरटेपणा करतं. 
कधी नुसतंच मन मोकळं करायला भेटणं, कधी भावनिक आधार शोधणं, कुठे थ्रील टाईमपास.

आपल्या पार्टनरच्या नकळत किंवा त्याच्यापासून लपवून ठेवून केलेली प्रत्येक कृती.....अगदी अफेअर पर्यंत मजल न जाता देखील कोणतीही बारीकशी कृती .......उदाहरणार्थ एखादा मेसेज एखादा फोन कॉल एखादी भेट अशा प्रत्येक लपवून केलेल्या वेळी तुम्ही प्रामाणिकपणा चा उंबरठा खरंतर ओलांडलेला असतो. 

चित्रपटात अतिशय उच्चभ्रू आणि सो कॉल्ड मॉडर्न जीवनशैली जगणारी ही सर्व पात्र मोकळ्या मनाने एकमेकांशी मैत्री मात्र निभावू शकत नाहीत. 

आपल्या पार्टनरनी लपवून  दुसऱ्याशी  केलेली मैत्री ही निखळ मैत्री उरतच नाही,  मग ती कितीही प्लॅटॉनिक, वैचारिक, बुद्धिजीवी आणि भावनिक या पातळ्यांवर का असेना.  ही  वैचारिक स्पष्टता तुमची आणि तुमच्या पार्टनर ची असेल तर हा चित्रपट निव्वळ मनोरंजन म्हणून बघून तुम्ही तिथे सोडून देऊ शकता. 

 या चित्रपटातील(श्रुती आणि उमेश ची पात्र वगळता) प्रत्येकाच्या भूमिकेचा आलेख, त्याचे सादरीकरण, संवाद, दिग्दर्शन आणि एका काल्पनिक कथेची मांडणी या सर्वांचा साधलेला सुंदर मेळ अनुभवून तुम्ही निरलेप मनाने थेटर बाहेर पडू शकता.
  
यातील कोणतंही पात्र तुम्हाला रिलेटेबल  वाटलं  नाही तर याचा अर्थ तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं इक्वेशन हे निदान स्वच्छ आणि पारदर्शी नक्कीच आहे.  पण आजूबाजूला असं घडतच नाही का? पडद्यावर दाखवलेलं सगळं च अशक्य कोटीतलं आहे का? तर नाही, यातील प्रत्येक पात्र कमी अधिक छटांमध्ये आपल्या आजूबाजूला आपल्याला नक्कीच सापडतं. 

असं म्हणतात  की फिडेलिटी ही रिलेटिव्ह गोष्ट आहे.
 तुम्ही  तोपर्यंतच प्रामाणिक असता जोवर तुम्हाला संधी मिळत नाही. संधी मिळाल्यानंतर  देखील जर तुम्ही प्रामाणिक  राहिलात तर खरं. 

ही संधी पूर्वी कमी मिळत असे तेव्हा निदान सरळ सरळ extra marital affair असं लेबल तरी लावता यायचं, आता आपला फोन ही आपली individual space झाल्यामुळे त्यावर या सीमारेषा ओलांडणे अतिशय सुलभ झाले आहे, आणि म्हणूनच कोणतेही affair  चे लेबल न लागता त्यावर अनेक पातळ्यांवर देवघेव सुरु असते. 

चित्रपटातील मधुरा च्या तोंडी असलेलं एक वाक्य 
" हातात हात कि पायात पाय या दोन्ही मधे नक्की कशाला व्यभिचार म्हणायचं" हे इतकं देखील सोपं न राहता फार वेगळ्या धूसर स्तरावर आजूबाजूला  पसरत चालले आहे ही वास्तवता आपण कोणत्याही आर्थिक,सामाजिक स्तरातील असलो तरी नाकारू शकत नाही.

covid period

लोकहो, आजकाल कोविड च्या दुसर्या लाटेबद्दल बोललं जात असताना या पहिल्या लाटेनेच आपल्या प्रत्येकाला कमी अधिक फरकाने त्रास दिला आहे. यात ज्येष्ठांना सुद्धा खूप त्रास झाला. मी इकडे प्रामुख्याने विविध कारणांमुळे एकटे राहणार्या जेष्ठांबद्दल बोलतेय. 

काही जेष्ठ जे हाती पायी active होते, त्यांनी हा काळ आपली तब्बेत सांभाळून कामं एक हाती करून तरून नेला. काही जेष्ठ कामाच्या बायकांवर अवलंबून होते. त्यांना खूप कष्ट पडले, कधी फक्त त्यांच्या करता मोलकरणी येऊ देण्याची परवानगी दिली गेली, कधी शेजार्यापाजार्यांनी त्यांच्या स्वैपाकपाण्याचा प्रश्न सोडवला, कधी अगदी अनोळखी लोकांनी सुद्धा जेवणाचे डबे घरपोच दिले. 

काही जेष्ठ अगदी नाष्ट्यासकट बाहेरच्या डब्यावर अवलंबून होते त्यांना ही जुलै मधला दुसरा लाॅकडाऊन जड गेला. काहींना तब्बेतीच्या तक्रारी होत्या पण दवाखान्यात जायची देखिल धास्ती वाटत होती. तब्बेत बिघडल्याने काहींचे याच काळात checkups अटळ झाले, आणि देवाचं नाव घेत त्यांनी ते उरकले. 

कधी साधीशी सर्दी झाली तरी छातीत धस्सं व्हायचं. कधी जोडप्यातील निरोगी व्यक्ती ला सर्दी झाली तर ती साधीच कि करोना ची हे कळेपर्यंत जोडप्यातील आजारी व्यक्तीला ती होऊ नये म्हणून धावपळ झाली. लांब जवळ असणार्या मुलांना देखिल हा काळ खूप मानसिक त्रासाचा गेला, कारणं काही असो आपण या काळात आई वडिलांची उत्तम बडदास्त ठेवण्यात कमी पडलो ही विवंचना त्यांना ही छळत राहिली. 

काही ज्येष्ठ मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे हिंडत फिरत होते. केवळ व्यायाम चुकवायचा नाही या हट्टापायी जनता curfew च्या दिवशी सुद्धा फिरून येणारे होते. घरी मुलं, नातवंड असताना देखिल दुकानांबाहेर लांबच लांब रांगांमधे उभं राहून पिशव्या भरभरून सामान आणत होते. मित्र मंडळ जमवून गप्पांचे फड भरवत होते. करोना ला आमंत्रणासाठी अगदी पायघड्या घालून देखिल लागण न झाल्याने त्यांच्यावर आणि अप्रत्यक्षपणे त्यांच्या घरच्यांवर ही नशिबाने कृपा केली. 

एकुणच या survival year मधे अनेक अनुभव घ्यायला मिळाले. तुमचे ही कडू गोड अनुभव ऐकायला आवडतील.

one sided posts

या ग्रूपवर फक्त वृद्धांबद्दल तक्रारी सांगणार्या पोस्ट्स लिहिल्या जातात असा आरोप आजवर अनेकांनी केला. कधी दुसर्यांच्या पोस्ट्स वरील कमेंट्स मधून, तर कधी स्वतंत्र पोस्ट्स लिहून हाच सूर आळवला गेला. 

वृद्धांवर सामुदायिक लेबल लावून तक्रारीच्या पोस्ट लिहिण्याचा हेतु असता तर त्याची परवानगी नाकारली गेली असती ही साधी गोष्ट आरोप करणारे विसरतात. इकडे मन मोकळं करण्याने सततच्या शारीरिक आणि मानसिक झगड्यातून क्षणिक उभारी मिळते इतकाच हेतू पोस्टकर्ते मनात बाळगतात. 

यातले प्रत्येकाचे अनुभव युनिक आहेत, त्यांचा सामना ते आपापल्या परीने करतच आहेत, सरसकट दूषणं देत बसण्या इतका वेळ आणि एनर्जी इथल्या कोणाच caregivers कडे नाही. त्यामुळे त्यांचं मनमोकळं कथन हे आपल्या ला उद्देशून आहे असा समज जर कोणाचा होत असेल तर तो त्यांनी काढून तरी टाकावा किंवा मग आपण घरी वागताना चुकत नाही ना याचं आत्मपरीक्षण तरी करावं. तुमच्याच कुटुंबातील caretakers ना त्याचा पुढे फायदा होईल. 

शिवाय इथे स्वतःचे caregivers म्हणून सकारात्मक अनुभव लिहायला कोणी बंदी केलेली नसताना, ते कमी किंवा अजिबात का शेअर केले जात नाहीत याची कारणं आक्षेप घेणार्यांनी जरूर शोधावीत. तसंच हा so called नकारात्मक पोस्ट्स चा trend मोडून काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपण आपल्या ज्येष्ठांचं caregiving करताना अनुभवलेल्या सकारात्मक अनुभवांची भर घालावी. 

या आधी ग्रुप वर अशा प्रकारे सकारात्मक अनुभव लिहिले गेले आहेत व अशा पोस्ट्स चं इथे नेहमीच स्वागत झालं आहे कारण त्या आम्हा सर्वांना खूप च दिलासादायक वाटतात आणि अल्प काळ का होईना पण मनोबल उंचावतं. 

शेवटी इतकंच सांगेन कि सकारात्मक अनुभव जितके जास्त उलगडले जातील तितके नकारात्मक पोस्ट्स आपोआप कमी दिसू लागतील आणि तक्रारी ला जागाच उरणार नाही.