स्थलांतर हि आपल्यापैकी बहुतेक जणांना कमी अधिक प्रमाणात करावी लागलेली अशी गोष्ट आहे. त्यातही वर्गवार स्थलांतर हि पूर्णपणे ऐच्छिक अशी बाब समाजात फोफावल्याचे सध्या चित्र आहे. ह्या अतिशय केविलवाण्या अट्टाहास ला काही जण बळी पडल्याचे आपल्या आजूबाजूला दिसते. त्यात सर्वात आघाडीवर आहे तो निम्न वर्ग.
गडी, मोलकरणी ह्यांची पोरे,बाळे आपापल्या आई-वडिलांना "मम्मी-पप्पा" संबोधतात. माझी कामवाली, सावनी ला तान्हेपणी, नुकते शब्द उच्चारायला लागल्यावर, मला "मम्मी" म्हणायला शिकवीत असे. मी त्यापासून तिला तत्काळ परावृत्त करायला म्हटलेले मला चांगले आठवतेय " बाई ग, आमच्यात मम्मी-पप्पा नाही आई-बाबा "च" म्हणतात." तेव्हा तिचा चेहरा "काय मागासलेली मालकीण भेट्लीये" असे भाव स्पष्ट दर्शवित होता.
माझ्या घरी वास्तव्यास असलेली दुसरी मदतनीस मुलगी मला दर आठवड्याला ना चुकता ५ रुपयाचे "फिरली" क्रीम आणायला सांगायची. पाहिल्या वेळेस मला ह्या शब्दाचा काहीच अर्थबोध होईना. मी ५ वेळा तेच तेच विचारल्यावर तिने माझ्याकडे एकवार कीव करीत न्याहाळून पाहिले आणि म्हणाली," ताई, ते गोरं व्हायचं, टीवीत दाखवतात कि सारखं." मग माझी एकदाची ट्यूब पेटली आणि मी निमूट तिच्यासाठी" फेर अन्ड लवली" क्रीम आणू लागले.
हल्ली त्यांच्या लग्नात हि " दाजींचे" बूट लपवतात. त्याही पटापट रात्रीचे स्वैपाकपाणी आटोपून "उत्तरान" आणि बालाजी फिल्म च्या 'एक से बढकर एक' मालिका बघायला सरसावून बसतात. हि अशी अनेक उदाहरणे आसपास आढळतील. तरीही ह्यातील बरीचशी तशी म्हटली तर निरुपद्रवी आणि क्षणिक का होईना करमणूक करणारी म्हणायला हवीत.
पण माझ्या भुवया खर्या अर्थाने उंचावतात ते ह्याच अशिक्षित परंतु थोड्या सधन गटाकडे पाहून. ह्या मंडळींकडे घरी उच्च शैक्षणिक कारकीर्द, सुसंस्कारित बालपण नसते पण दारी किमान दोन तरी "फोरीन" चारचाक्या असतात. ह्यांच्या बायका टीवी वरील एकूणेक सिरिअल्स फॉलो करतात. एपिसोड गणिक बदलणाऱ्या लेटेस्ट वेशभूषा त्या परिधान करतात. आपापल्या अति "बीजी" नवर्यान शिवाय "माय फेर लेडी " टूर्स ला आदेश भावजी न बरोबर मज्जा करतात. ह्यांची पोरे ओन्ली कोन्वेंत शाळांमध्ये जातात. तिकडे शिकवलेले समजत काहीच नाही, त्यामुळे केजी टू पीजी ट्युशन क्लासेस चे चांगलेच फोफावते. पण हे सगळे करण्याचा त्यांचा मूळ हेतू सुसंकरीत, सुशिक्षित जीवन जगण्याचा नसून केवळ मध्यम वर्गीयांशी बरोबरी करीत उच्च वर्गात स्वतःला जाऊन बसवण्याचा अट्टाहास असतो. हाच गट आपल्याला जमले नाही म्हणून आपल्या पोरांना विविध रिअलिटी शोज मध्ये भाग घ्यायला लावतात. त्यात खरे नैपुण्य असणारे अगदी हाताच्या बोटावर सापडतील. पण त्या चिमुकल्या वयात त्यांना नखरेल लावणीचे अथवा आईतेम डान्स चे हावभाव तंतोतंत जमतात हे पाहूनच माझे काळीज तुटते. आणि हे बघून त्यांचे " मम्मी-पप्पा" भरून पावतात हे पाहून डोके सुन्न होते.
असो........त्यांच्या बौद्धिक पातळीची कीव करण्यापलीकडे आपल्या हातात खरेच काही नाही. आणि तसेही त्याबद्दल काही खेद आणि खंत हि नाही.
पण मध्यम वर्ग जेव्हा " हाय-प्रोफाईल" होण्याचा प्रयत्न करताना आढळतो, तेव्हा खरच काळजी वाटते. कारण जगात कुठेही जा, काहीही करा, हि मध्यमवर्गीय मूल्येच लांबवर तारून नेणारी आहेत. आणि हीच जेव्हा आजूबाजूला कात टाकल्यासारखी लोक फेकून देताना दिसतात तेव्हा खरेच वाईट वाटते. आपल्या ह्याच मूल्यांनी आपल्याला आजवर नितीमत्तेची शिकवण दिली, दुसर्यांना आदर-भाव द्यायला शिकवले, वाईट संगत आणि सवयीन पासून दूर ठेवले. पण हीच मुल्ये आज "बिलो-दिग्निती" समजली जातायत. मुक्त हस्ते आज आपण घरात वाईट सवयींना वावरू देतो. आपल्याला वाटते काय हरकत आहे, थोडी मजा करूयात, काय बिघडले. वयाच्या ह्या टप्प्यावर आपण काही आता वाया जाणार नाही. आता नाही तर काय म्हातारपणी मजा करणार? पण आपण हे विसरतो, कि आपली मजा आपल्या आजूबाजूला असलेली भावी पिढी बघत बघत मोठी होणार आहे.
घरात मातृभाशे चा वापर कमीत कमी ते अजिबात न करणे. का तर कॉन्वेंत मधली मुले गोंधळून जातील ना, कुठली संस्कृती आपली (?) म्हणून. ह्यांच्या जिभेला वळण "मम्मी-पप्पा" पेक्षा जरा वरचा श्रेणीचे" mom-dad " म्हणण्याचे. ह्या मुलांचे वाढदिवस मग mac -D मधेच साजरे होतात. ओवाळून घेणे आणि मोठ्यांच्या पाया पडणे बहुदा ह्यांना माहीतच नसावे. पालकांच्या सुद्धा ह्या मुलांकडून असल्या 'फालतू' अपेक्षा मुळीच नसतात. आपण फक्त त्यांच्या 'ऑल-राउंड' विकास साठी त्यांना उद्युक्त केलं कि झाले. पण ह्यात फक्त अभ्यास, खेळ, स्पर्धा परीक्षे साठी तयारी, एवढेच येते असं बहुदा यांचा समज असतो. त्याला शिस्तीची, लवचिकतेची , नकार पचवण्याची आणि संस्कारांची जोड द्यायची गरज या होतकरू उच्चभ्रूंना वाटत नाही. ह्यांच्या घरात सणासुदीचे दिवस सुद्धा 'जस्ट अनदर डे' म्हणूनच येतात नि जातात. पण क्रिसमस मात्र सेलेब्रेत करावाच लागतो. यांच्या घरात दिवेलागणीला 'एकंच प्याला' , कंपनी असो व नसो ,सर्रास घेतला जातो. इथे मराठी मालिकांना नाके मुरडली जातात, पण 'बिग बॉस', रोडीज' डोळे फाडून पाहिले जातात. मुलांच्या शाळेत सुद्धा ह्या आया वेशभूषेचे कुठलेच संकेत पाळताना दिसत नाहीत. अप-टू-डेट हे फक्त राहणीमाना करिता वापरले जाणारे विशेषण आहे हा यांचा ठाम समज झालेला दिसतो.
वरील सर्व मुद्दे पूर्णतः वैयक्तिक आहेत. पण चांगले वाचन, चांगली संगत आणि जबाबदारीची जाणीव हे कधीच आपसूक होत नाहीत. या गोष्टी मुद्दाम आपल्या जगण्याचा भाग बनवाव्या लागतात आणि तरच आयुष्याला परिपूर्णता येते असे माझे मत आहे.