Wednesday, August 29, 2018

Introspection anyone

#introspectionanyone#

निकालाचा दिवस . नवीन भाषा थर्ड लँग्वेज म्हणून कुठली मिळाली हि सर्वांना उत्सुकता .

कुणाला जर्मन कुणाला संस्कृत कुणाला मराठी इत्यादी चर्चा रंगल्या . लगोलग शाळेच्या ग्रुप वर जर्मन क्लासेस  च्या जाहिराती आदळायला लागल्या .नवीन विषयाचा क्लास लावून पालक आता मोकळे होतील .

छान मार्क म्हणजे उत्तम क्लास . कमी मार्क म्हणजे भंगार टीचर .

त्याचे  फंडे 'क्लिअर 'आहेत .

एका ओळखीच्यांनी मुलाला कमी मार्क मिळाल्याचे खापर ट्युशन टीचर वर फोडले . का तर इतके पैसे भरून पदरात मार्क नाहीत म्हणजे काय ? अमुक एका क्लास च्या टीचर मार्कांची हमी देतात . चला धावा  तिकडे .
शाळाबाह्य उपक्रमांचे देखील तेच . एखाद्या खेळात किंवा कलेत आपले मूल प्रवीण असणे किंवा नसणे याला देखील बऱ्याचदा शिक्षक अथवा कोच लाच जबाबदार धरले जाते .
या सगळ्यात सोयीस्कर पणे विसरले जाते ते आत्मपरीक्षण . पालक म्हणून स्वतःचे आणि आपल्या पाल्याचे  .
सर्वात ढोबळ मानाने लावला जाणारा निकष म्हणजे आपल्यासारखेच आपले मूल  एखाद्या उपक्रमात निपजणे हा आग्रह . आपल्याला अनुकूल असे आपले गूण मुलात उतरले आहेत का नाही हे तपासून घ्यायला थोडा अवधी तरी हवा .
बरं आवड आहे , इच्छा आहे अमुक उपक्रम करण्याची तर अनुभव म्हणून करून पाहूदे , मजा घेउदे , जमल्यास नवीन शिकता येउदे . इतकी बेसिक उद्दिष्ट साध्य झाली तरी खूप झालं . पण छे , आपल्याला सगळ्यात अचिव्हर्स च हवेत . मार्कांची तर आहेच , ती कमी म्हणून आता उपक्रमां मध्ये देखील स्पर्धा चुरस हवीच . आपण हि उतरतो आणि मुलांना देखील उतरवतो . बरं अपेक्षित रिझल्ट मिळवण्यासाठी लागणाऱ्या परिश्रमांची तरी मुलांची मानसिकता आहे का ? आपली तर आहेच हो . पालक म्हणून आपली ध्येय तर आकाशालाच पोचली आहेत . पण मुलांचं काय ? आपण चारी ठाव खुराक देऊ , पोषक वातावरण देऊ , ने आण करू , थोडक्यात घोड्याला पाण्यापाशी नेऊ ....... ...... पण पाणी प्यायचं का नाही हे आपण नाही ना ठरवू शकत .

आपले मूल अभ्यासात सिन्सिअर नसेल , शाळेत ट्युशन ला टिवल्याबावल्या करत असेल , खेळाचा वर्कआउट मस्ती करत कोच ची बोलणी खात उरकत असेल , कलेत एकाग्र होत नसेल , कुठलीच स्वयंशिस्त ना पाळता जुलमाचा रामराम ठोकत असेल , उलट  या पैकी कुठलीच हयगय आपण मुळीच करत नाही , हे वर भासवत असेल आणि वरील कुठलीही शक्यता नाकारून  आपण डोळे झाकून मुलांचंच खरं मानून त्यांच्या कामगिरी चं खापर शिक्षक , कोच वरच फोडणार असू , तर आपण स्वतःलाच फसवत आहोत , नाही का ?

नुसतं क्लास बदलून , कोच बदलून मार्क , मेडल्स अथवा कुठलच प्राविण्य पदरात पडत नाही , हे आपल्याला कधी कळणार . बऱ्याचदा अंगभूत कौशल्य बाहेर व्यक्त व्हायला ठराविक काळ जाऊ द्यावा लागतो , या मधल्या काळात बरेचदा मुलांना आपोआप समज येते , शहाणपण येतं , वय मोठं होतं तसं शारीरिक मानसिक बळ देखील आपसूक वाढतं .
आणि अचानक एक दिवस आपल्याला अपेक्षित ते 'यश 'लक्खपणे समोर येऊन ठाकतं . पण त्यासाठी थोडं थांबायची , वाट पाहायची , योग्य वेळ येऊ देण्याची गरज असते . एखाद्या तळमळीच्या शिक्षका कडे आपल्या उतावीळपणामुळे हकनाक नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ शकतं याचं भान आपण ठेवलं पाहिजे .
या वर्षीच्या निकालातून आपण या गोष्टीची  थोडीफार  जाण ठेऊन वागू शकतोय का ते पाहूया .

Vay

स्थळ : रूपाली , पुणे

आज ब्रेकफास्ट ला रूपाली मधे नवर्याला एक अजब अनुभव आला. नवरा आणि दोन मित्र बसलेले असताना एक मध्यमवयीन गृहस्थ त्यांच्या टेबलापाशी आले , स्वतःची ओळख सांगितली, आणि त्याच टेबलाच्या एका रिकाम्या खुर्ची वर बसू का अशी विचारणा केली.
अशा वेळी साधारण पणे सभ्य सहृदय माणसं वागतात तसेच वागून या मंडळींनी त्यांना बसा असे सांगितले आणि पुढचा पूर्ण वेळ झक्क मारली आणि बसा म्हटलं असं म्हणायची वेळ त्या गृहस्थांनी आणली.
मित्र त्यांचं त्यांचं बोलत होते.....
या गृहस्थांनी 2 पुस्तकं टेबलावर काढली आणि मधेच बोलू लागले. ' मी अमूक इतकी पुस्तकं लिहिली आहेत, अमूक इतकी वर्ष मी स्तंभलेखक होतो, परीक्षणं लिहितो वगैरे वगैरे सांगू लागले.
त्यांनी बरोबर आणलेली पुस्तके या मंडळींना दिली. इथपर्यंत सुद्धा ठीक होतं.
पुन्हा मित्रमंडळी आपल्या विषयांकडे वळली तरी हे महाशय गप्प बसायचं नाव घेईनात. जो विषय निघेल त्यात ते घुसून आपले मुद्दे मांडू लागले.
त्यांनी बोलण्याच्या ओघात ज्या आजूबाजूच्या टेबलांकडे कटाक्ष टाकला आणि ओळख दाखवायचा प्रयत्न केला त्या सर्व सदस्यांनी त्यांच्याकडे बघितलं न बघितल्यासारखं केलं. 
वेटर जाता येता कपाळावर आठी पाडून घेत होता.
म्हणजे एकूण प्रकरण नेहमीचं होतं. पण आज यांच्या वाट्याला आलं होतं हे या मित्रांनी ताडलं. मित्र ही खरंतर रूपाली चे रेग्युलर्स होते पण आज बकरे बनायची पाळी यांची होती.
कसंबसं खाणं आणि बोलणं आवरतं घेऊन मंडळी ऊठून चालती झाली.
इतक्या लवकर ब्रेकफास्ट भेट आटपून गडी घरी हजर म्हटल्यावर मीही चाट.
हे सगळं गम्मत म्हणून सांगायला आणि सोडून द्यायला ठीकच आहे पण यातून टेक होम धडा इतकाच ( टीचर झाल्यापासून हे असं होतं.....moral of the story  सांगायची वाईट सवय लागलीय ) ..........
आत्ता शी  साठीच्या वयात असताना या गृहस्थांचं तारतम्य सुटत चाललंय, दुसरं बालपण चालू झाल्याच्या या खुणा ते ओळखू शकत नाहियेत, असं जाहीर हसं व्हायची वेळ आपल्यावर आपण ओढवून घेत आहोत हेही कदाचित त्यांना समजत नाहिये, या सगळ्या मागे कदाचित अचानक कमी झालेली क्रियाशीलता, निवृत्ती चं ठोस नियोजन नसणं , किंवा इतर अनेक मानसिक , सामाजिक कारणं असतील.......
आपल्यावर ही वेळ येणारच नाही हे म्हणणं हा निव्वळ माज आहे. हे होऊ नये म्हणून आपल्या हातात असतील त्या उपाययोजना आपणं करत आहोत ना हे ठणकवून स्वतःला अधनंमधनं विचारलं तरी बास झालं.