Wednesday, September 26, 2018

diet pahave karun

#डाएट पाहावे करून #

सध्या बघावं तिकडे म्हणजे ( सोशल मीडिया वर ) दीक्षित - दिवेकर वाद सुरु आहे . या विषयावर टुकार जोक्स टाकत वॉट्सऍप वर विनोद निर्मिती चा वसा घेतलेले बहाद्दर आहेत , तर कुठे जाणकार तज्ञ् त्यावर हिरीरीने आपली मत - मतांतरे मांडत आहेत .
आपल्या ओळखीचे बरेच जण या दोन्ही पैकी एकाचे तरी अनुयायी असलेले आपल्याला दिसतात . त्यात हल्ली दीक्षितांचाच वरचष्मा जास्त . दोन्ही जीवनशैलींबद्दल मला आदर आहे . दोन्ही चे आपापले फायदे , विरोधाभास , त्यावर घडलेली डिस्कशन्स , शास्त्रीय उहापोह या सर्वच बाबतीत एव्हाना आपण सगळेच खूपच अपडेटेड आहोत.
हे सर्व असले तरीही माझ्यासारखे काही जण नक्की असतील जे या पैकी कुठल्याही एका शैली ला आपलेसे करण्याकडे कानाडोळा करीत असतील . प्रत्यक्ष उडी घ्यायला कचरत असतील. त्या सर्वांचे प्रातिनिधिक मत मला मांडायचे आहे .
माझ्या सारखे काही जण आत्ताशी चाळीशी ला पोचले असतील . वर्षानुवर्षे काठी सारखा अति शिडशिडीत बांधा लाभलेले आत्ताशी कुठे काठी न दिसता  खांब दिसू लागले असतील. जरा मूठ भर मांस अंगावर चढल्याच्या खुमारीत असतील. सध्याच्या या "तब्बेत सुधारलेली दिसते " फेज  मध्ये रमलेले आम्ही एवढ्यात तरी वजन कमी करणे या विषयापर्यंत अजून पोचलेले नसतो . हि फेज काही चिरकाल टिकणारी नाही याची जाणीव आम्हाला आहेच , त्यामुळे व्यायाम सुरु केलेला आहेच , पण तूर्तास डाएट या फंदात न पडण्याकडे आमचा कल असण्याचे हे एक मुख्य कारण आहे .
आता दुसरं कारण असं कि या दोन्ही गटाचे फॉलोअर्स यांची मुळातली जीवनशैली पाहता असं वाटतं -
या पैकी किती जण सकाळी लौकर उठून स्वतः घरातल्यांचे डबे , चहा , नाश्ते , स्वैपाक यावरून पूर्ण वेळ अथवा अर्धा वेळ बाहेरचे काम करून आल्यावर परत ओट्यापाशी उभे राहून किंवा पगारी बायका च्या कामांव्यतिरिक्त करण्याची घरातील अव्याहत कामे उरकून दीक्षित अथवा दिवेकर जीवनपद्धती फॉलो करू शकत असतील ?
यातील बहुतांश जणांना किमान सकाळचा नाश्ता करून दुपारचा डबा अथवा जेवण आणि रात्रीचे डायरेक्ट जेवण या तीन वेळा तरी नियमित आणि शांतपणे उपभोगता येतात कि नाही तो देव  जाणे .
तिसरा मुद्दा असा कि दीक्षित दिवेकर किंवा कुठलेही डाएट फॉलो करणाऱ्या किती व्यक्ती  स्वतःच्या हिमतीवर ती ती पद्धत फॉलो करतात? अनेकदा कुणीतरी पगारी मदतनीस / स्वयंपाकी / फॅमिली मेम्बर त्यांना त्या त्या पद्धती बिनचूक वेळेवर पाळण्यात मदत करत असतो . दर दोन तासांनी खायच्या पदार्थांची तजवीज अथवा दिवसातून दोनदाच जेवायच्या वेळी अन्न आणि त्या ५५ मिनिटातील सर्व घटक कुणीतरी दुसरा तुम्हाला सोय आणि सोबत म्हणून पाळणारा आणि बरेचदा स्वतः ना पाळणारा / री जय्यत तयारीनिशी हजर करत असतो .
यात अनेक सन्माननीय अपवाद असतील यात शंका नाही . पण बहुतांशी चित्र मात्र असंच आहे .
सध्यातरी या पैकी कुठल्याच गटात सामील व्हायला माझाकडे मोकळा वेळ , फौजफाटा आणि मुख्य करून आंतरिक इच्छा या पैकी काहीच नाही . त्यामुळे दिवसातून ४ ठळक भुका पाळणे आणि व्यायामात खंड न पडावा या कडे लक्ष केंद्रित करणे एवढ्या बाबींवर मी अल्पसंतुष्ट आहे.
या जीवनशैली फॉलो करणाऱ्यांचे कौतुक आहेच आणि त्या हि पेक्षा त्यांना त्यात अनाम साथ देणाऱ्या कुटुंब घटकांना शतशः नमन.