Saturday, November 24, 2018

वटवृक्ष

#वटवृक्ष#

हॉस्पिटल ची पायरी कुणी सहसा स्वखुशीने चढत नाही . आणि जर वेळ आलीच तरी मनात एक अनामिक असुरक्षितता जाणवत राहते . डॉक्टर , इतर स्टाफ आणि हॉस्पिटल मध्ये शिरलेले कॉर्पोरेट वातावरण या सर्वां बद्दल समज गैरसमज , आणि धास्ती वाटल्याशिवाय राहत नाही .
जेव्हा  एखाद्या  हॉस्पिटल मधील कर्मचारी वर्ग , डॉक्टर किंवा हॉस्पिटल  प्रॉपर्टी वर हल्ले झाल्याच्या बातम्या ऐकू येतात तेव्हा अतीव यातना होतात . कारण वैद्यकीय क्षेत्रातील मिळालेल्या सेवेचा आमचा अनुभव अगदी उलट आहे . अनेकप्रकारे नावं ठेवल्या गेलेल्या या क्षेत्रात आम्हाला आलेले सकारात्मक अनुभव चांगुलपणा वरील आपला विश्वास दृढ करून जातात .
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल शी आमचे असेच हृद्य नाते  आहे . फॅमिली हॉस्पिटल असं म्हटलं तर वावगे ठरू नये . कधी साधे रुटीन वार्षिक चेकअप , कधी तब्बेतीच्या बारीक सारीक कुरबुरी , मधूनच आलेला एखादा इन्फेक्शन चा अटॅक , पासून ते  knee replacement , hip joint replacement आणि अगदी संपूर्ण कॅन्सर ट्रीटमेंट पर्यंत चे नानाविध उपचार आमच्या कुटुंबाने याच वटवृक्षाच्या छायेत घेतले आहेत .

आजवर मंगेशकर हॉस्पिटल मधील अनेक लहान मोठी डिपार्टमेंट्स उपचारा निमित्त आम्ही पालथी घातली आहेत . ER , ओपीडी , admin section , फार्मसी , मेडिक्लेम , billing , diagnostics मधील X ray , सोनोग्राफी , ऑपरेशन थेटर्स , जनरल वॉर्ड , Chemo  चा day care वॉर्ड , सेमी प्रायव्हेट रूम , प्रायव्हेट रूम , ICU , आणि कॅन्टीन अशी जुन्या- नव्या बिल्डिंग मधील विविध सेवा सुविधांचा आम्ही लाभ घेतला आहे .
हॉस्पिटल चा एंट्री पॉईंट म्हणजे ER . इथल्या स्टाफ ची तारांबळ शब्दात व्यक्त करणं  निव्वळ अशक्य . पेशंट कोणत्या स्थितीत एंट्री घेतो त्यावर त्याची वर्गवारी होते . आपल्या पायावर चालत आलेल्या पेशंट ला बाहेरच्या रूम मधील डॉक्टर प्रथमोपचार देतात आणि त्याच्या रिस्पॉन्स वर त्याला ऍडमिट करून घ्यायचं का सोडायचं ते ठरतं .   बऱ्याचदा स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर वर आलेला पेशंट दाखल करून घेण्याच्याच स्थितीत असतो .
दाखल केला गेलेल्या पेशंट ला एकाच छताखाली सर्व सुविधा मिळतात हि  या हॉस्पिटल ची खासियत.

८०० बेड्स असलेल्या या अवाढव्य पसाऱ्याची धुरा ज्ञान प्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट चे निष्णात आणि तत्पर डॉक्टर्स सांभाळत आहेत . ज्ञान प्रबोधिनी ची नीतिमूल्यं हॉस्पिटल च्या कार्यक्षमतेत पुरेपूर भिनली आहेत . पेशंट फर्स्ट हे ब्रीदवाक्य समोर ठेऊन इथला प्रत्येक कर्मचारी वावरत असतो . इथले रेसिडेंट डॉक्टर्स आणि नर्सेस जेव्हा पेशंट अटेंड करत नसतात तेव्हा  कॉम्पुटराइज्ड  पेपरवर्क मध्ये आकंठ बुडलेले  असतात . पण एरवी ऍडमिट  पेशंट ची बारीक सारीक तक्रार नोंदवून त्यावर सोल्युशन सांगायला ते सदैव सज्ज असतात .

इथे प्रत्येक डिपार्टमेंट साठी  एक फीडबॅक फॉरमॅट आहे. त्या त्या डिपार्टमेंट शी तुमचा संबंध येऊन गेला कि पेशंट च्या रिलेटिव्ह कडून तो तपशीलवार भरून घेतला जातो . त्यात विस्ताराने आपण आपली नापसंती किंवा प्रशंसा नमूद करू शकतो . त्यामुळेच रेसिडेंट डॉक्टर्स पासून फार्मसी , नर्सेस , सेक्युरिटी , मामा/ मावशी सर्वच उत्तरदायी आहेत , त्याने प्रत्येकाच्या परफॉर्मन्स मध्ये लक्षणीय फरक पडतो .
शेवटी तीही माणसेच आहेत . अखंड कामाच्या घाईत त्यांना अनेकदा स्वभावाने किरकिरे पेशंट्स हॅण्डल करावे लागतात . मागे आम्हाला आलेला एखाद दुसरा कटू अनुभव या नव्या सिस्टीम ने खूपच आटोक्यात आला आहे .

मुद्दाम उल्लेख करायला हवा तो म्हणजे इथल्या होम केअर डिपार्टमेंट चा . काही पेशंट्स आपले आपले हॉस्पिटल मध्ये तपासणी साठी ये जा करू शकत नाहीत , पण ऍम्ब्युलन्स बोलवून दाखल करण्याइतकी काही त्यांची सिरिअस कंडिशन हि नसते . अशां  साठी हा उत्तम पर्याय हॉस्पिटल देतं . फिजिशियन कडून तपासणी किंवा नर्स कडून ड्रेसिंग किंवा लॅब च्या काही चाचण्या अश्या सर्व सेवा घरी येऊन पेशंट ला दिल्या जातात .

काही डिपार्टमेंट्स शी पेशंट्स चा प्रत्यक्ष संबंध कधीच येत नाही . येतो तो त्याच्या नातेवाईकांचा .
रिसेप्शन वर नवख्या माणसाला कुठे जायचं , कसं जायचं , कोणाला भेटायचं या बद्दल हार प्रकारे गाईड केलं जातं . इतकंच नाही तर तिथे जी चहा कॉफी मशीन ची टोकन्स मिळतात ती अगदी मशीन मध्ये घालून ऑपरेट करायची कशी इथवर चं प्रात्यक्षिक प्रसंगी रिसेप्शनिस्ट आपल्या डेस्क वरून उठून तुम्हाला देते .
नव्या बिल्डिंग मधील पासेस ची सिस्टीम सिक्युरिटी गार्डस काटेकोर पणे चालू आहे कि नाही या बद्दल दक्ष असतात . तसेच ICU च्या दालनाबाहेरील गार्डस नातेवाईकांना भेटण्या  बोलण्याचे कडेकोट नियम पाळायला लावतात .
ऍडमिशन डिपार्टमेंट मध्ये जो रूम टाईप हवा असेल त्यावर क्लेम ठेवायला सांगितला जातो . आलो आणि रूम मिळाली असे कधीच होत नाही , इतकं हॉस्पिटल पेशंट्स ने सदैव खचाखच भरलेलं असतं . गेल्या आठवड्यात २ दिवसांच्या अंतराने आमचे २ पेशंट एक जुन्या आणि एक नव्या ICU मध्ये ऍडमिट होते . ICU मधून एक पेशंट बाहेर येऊन ज्या मजल्यावरच्या रूम मध्ये दाखल झाला , त्याच मजल्यावरची  दुसरी  प्रायव्हेट रूम मिळावी म्हणून आम्ही क्लेम ठेवला . तेवढीच आमची धावपळ कमी हा त्यामागे हेतू होता . आमची हि नड ऍडमिशन डिपार्टमेंट नि लक्षात घेतली आणि आमची गरज भागवली. पण मिळाली ती रूम सेमी प्रायव्हेट होती . आम्ही पुन्हा प्रायव्हेट रूम साठी क्लेम ठेवला तर त्याची  देखील संध्याकाळपर्यंत दखल घेतली गेली .
२००९ साला पासून  मंगेशकर हॉस्पिटल शी पेशंट म्हणून असलेलं आमचं असोसिएशन आम्हाला कधीच नाराज करून गेलं नाही. हॉस्पिटल मधून पेशंट लाच काय नातेवाईकाला सुद्धा कधी एकदा आपल्या घरी परत जातोय असं  होतंच . पण तिथून डिस्चार्ज घेताना आम्ही नेहमीच हॉस्पिटल बद्दल कृतज्ञतेच्या  ऋणात राहून बाहेर पडतो  हे नक्की .