#चिंता#
बाळाच्या जन्माबरोबर एका आईचा हि जन्म होतो म्हणतात ते अगदी खरं आहे . असंही म्हणतात कि बाळाच्या ५वि च्या पूजेला त्याचं भाग्य कोरलं जातं . अगदी तसंच या नवीन जन्मलेल्या आईच्या भाळी कायमची एक गोष्ट कोरली जाते ती म्हणजे चिंता .
या चिंतेचं स्वरूप मात्र काळाच्या ओघात बदलत राहिलं आहे .
उदाहरण म्हणून दोन पिढ्या मागे जाऊन बघितलं तर हे चिंतेचं स्वरूप कसं बरं होतं ?
त्या काळी गावी होणारा बाळाचा जन्म हा रोजची आन्हिकं पार पाडण्यासारखाच एक भाग होता . त्या काळच्या आई ला १०/१२ पोरं जन्माला घातल्याशिवाय या निसर्गचक्रातून सुटका नव्हती . अखण्ड कामात गढून गेलेल्या त्या माउली ला बाळाचा जन्म एकदा सुखरूप पार पडला कि त्याच्या तब्बेत पाण्याशिवाय दुसरी फारशी कुठली चिंता नसे . नाही म्हणायला सासरी गेलेल्या लेकी बद्दल अंधुकशी चिंता असे .
नंतरची मधली पिढी शिक्षण नोकरी निमित्त शहरात स्थिरावली . या पिढीतील आया मध्यमवर्गीय घर चालवायला बऱ्याचदा नवर्याच्या बरोबरीने नोकरी करत . तिच्या डोळ्यासमोर सदैव नाचत ते ८. १० आणि ५. १४ हे घड्याळाचे काटे . घरकामात मदत करणारा नवरा हि जणू परग्रहावरची संकल्पना . या सगळ्या घरच्या बाहेरच्या धामधुमीत मूल सगळ्या इयत्ता नीट पास होतंय ना हीच चिंता तिला पुरून उरायची . एव्हाना दूरदर्शन आणि पेपर मासिकातून बाहेरच्या जगातील संभाव्य धोके तिला समजत असत . त्या मुळे मुलाला संगत योग्य आहे ना किंवा मुलगी ७ च्या आत घरात येत्येय ना या कडे तिचे बारीक लक्ष असायचे .
आता येऊया आमच्या पिढीकडे . जी आता ४० शी ला आल्यावर या सगळ्याकडे त्रयस्थपणे पाहायच्या आणि स्वतः वर हसायच्या मनस्थितीत आली आहे .
आमच्या पिढीच्या आयांच्या वाट्याला चहू बाजूंनी ज्ञानाचा भडीमार आला . हेच अतिरिक्त ज्ञान आम्हाला नवनवीन खाचखळगे दाखवतं , पॅनिक करून सोडतं . त्यामुळे आधीच चिंतेने भरून गेलेल्या कपाळावर इंच इंच जागा लढवत नवनवीन चिंतातुर रेषा उमटत असतात.
म्हणूनच जन्मतः ५ मिनिटांच्या आत बाळ रडलं का ?
दीड वर्ष सरायच्या आत ते चाललं / बोललं का ?
३ वर्ष्याच्या आत त्याचा बालवाडी प्रवेश झाला का ?
त्यात कुठे learning / reading / hyperactivity disorder आढळली का ?
४ री ठाव त्याच्या पोटात पौष्टिक खुराक जातोय का ?
शाळे व्यतिरिक्त extra activity लावलीय का ?
या आणि अशा अनेक गोष्टींकरता आम्ही आया आमचं रक्त आटवत असतो .
हे कमी म्हणून कि काय हल्ली बालपण सरल्याच्या खुणा देखील फार घाईघाईने दिसायला लागतात.
जणू पुढल्या ताणांची फ्रेश यादी घेऊन कोणीतरी आपल्यावर हसत असतं .
एव्हाना स्मार्टफोन शी मुलांची चांगलीच गट्टी झालेली असते . गेम्स खेळून कंटाळलेलं बालपण आता यु ट्यूब कडे वळत असतं . अभ्यासातून ब्रेक म्हणून हातात सतत फोन येऊ लागलेला असतो. मोठ्या मुलांना तर स्वतःचाच फोन मिळालेला असतो . अशा वेळी आम्हा माऊलींची तारेवरची कसरत काय वर्णावी . सहजच म्हणून किंवा काहीतरी काम काढून मुलांच्या खोलीत डोकावत राहणं आणि त्यांचं फोनवर नेमकं काय चाललंय हे नकळतपणे हेरत राहणं हे कौशल्य फार मेहनतीनं कमवावं लागतं .
तर दर वेळी नवनवीन कल्पना लढवून , मुलांना भावनिक, सामाजिक , ध्येयनिष्ठ का काय ती वळणं लावून (?) एकदा का निर्विघ्न आणि अपेक्षेप्रमाणे मुलांची १२वि पार पडली , कि आम्ही आया सुटकेचा श्वास घेतो. स्वतःसाठी जगायचं ठरवतो (?) थोडक्यात उधळतो .
आम्हा आयांचे स्वतःच्या वाढीच्या वयातले काही न भरलेले घाव असतात . आता पालक म्हणून आपल्या हातून त्या चुका घडू नयेत या करता आम्ही सदैव दक्ष असतो. हो पण त्या ओघात काही नवीन चुका आम्ही करून ठेवतो ते वेगळं . असो....
प्रत्येक पिढीचे चॅलेंजेस वेगळे , त्यामुळे पॅरेंटिंग चे फंडे वेगळे.
पण चिंता हि शाश्वत आहे .
सो...... कूल आई हा भ्रम आहे.
आणि असलंच तर मग काहीतरी गोम आहे .