"कशी आहेस परी? काल घरी आली नाहीस? आई म्हणाली हल्ली एकटी बसून असते परी, कुठे जात नाही, कोणाला बोलावत नाही. तू आमच्या कडे आली नाहीस असं आजवर कधी झालं नाही, मग ठरवलं आपणच जायचं परी ला भेटायला.
मला सांग "कशी आहेस परी? काल घरी आली नाहीस? आई म्हणाली हल्ली एकटी बसून असते परी, कुठे जात नाही, कोणाला बोलावत नाही. तू आमच्या कडे आली नाहीस असं आजवर कधी झालं नाही, मग ठरवलं आपणच जायचं परी ला भेटायला.
मला सांग तुला कसलं टेन्शन आहे का? काही तरी बोललीस, शेअर केलंस तर मोकळं वाटेल, आई बाबांशी नाही तर मैत्रिणींशी बोल, मला सांग, पण अशी एकटी कुढत बसू नकोस.
परी थोडी सैलावली. " आत्या, अगं, तुमच्या साठी हे खूप कॅज्युअल असेल, पण मला विसा रिजेक्ट झाल्यापासून सगळं संपल्यासारखं वाटतंय. माझ्या सगळ्या मैत्रिणी तिकडे गेल्या आहेत, मीच एकटी रखडले आहे. त्यामुळे त्या मला काय धीर देणार, त्यांचं लाईफ तर सेट आहे. हे अख्खं वर्षच खराब गेलं ग. काल तुझ्याकडे न्यू इयर पार्टी ला यायचा मूडच नव्हता. या वर्षी आबा गेले, चांगले धडधाकट असताना गेले, बाबांना माईल्ड अटॅक येऊन गेला, माझ्या विसाचं हे असं भिजत घोंगडं तसंच आहे, जाॅब पण मनासारखा नाही, विसाचं होईल म्हणून आहे ते चालवत होते पण आता पेशन्स चा कडेलोट झाला आहे. काही करायला, कुठे जायला नको वाटतं. "
" परी मला ठाऊक आहे तुझी किती जबरदस्त इच्छा आहे यूएस ला जायची. या वर्षी खूप घडामोडी झाल्या, मला मान्य आहे, आबांचा तुझ्यावर आणि तुझा त्यांच्यावर किती जीव होता, हे आम्हाला माहित आहे. आबा असते तर त्यांना तुझं असं खचून जाणं मुळीच रुचलं नसतं. ते स्वतः खूप कणखर होते. त्यांच्यात हा कणखरपणा कोणाकडून आला ठाऊक आहे ? त्यांच्या आई कडून, होय, तुझ्या पणजी कडून. "
"तुझ्या पणजीला 4 मुलं, त्यातले एक आबा आणि बाकी 3 मुली. तुझे पणजोबा वारल्यावर पणजी ने चौघांना एकटीने वाढवलं, मुलींची लग्ने लावून दिली, तुझ्या आबांना ही चांगली नोकरी लागली, त्यांचंही लग्न झालं आणि तुझ्या आईचा आणि मामाचा जन्म झाला. एका किरकोळ आजाराचं निमित्त झालं आणि तुझ्या आईची आई दोन लहान लेकरांना मागे ठेवून अकाली देवाघरी गेली. आबांच्या लेकरांना सांभाळायला आणि त्याचा उघड्यावर पडलेला संसार सावरायला पणजी ने पदर खोचला. पुन्हा एकदा उतारवयात मुलांना एकटीने मोठं करायची जबाबदारी खंबीरपणे पणजीने पेलली, कल्पना कर आपल्या नातवंडाची आई होणं सोपं नव्हतं, आबांच मुलंही आता मार्गी लागायच्या बेतात असताना परत एक अतिशय वाईट घटना घडली. आबांचा हाताशी आलेला मुलगा , तुझा मामा अचानक 20/21 व्या वर्षी चालता बोलता हार्टफेल ने गेला. तुझी आईअसेल तेव्हा 16/17 वर्षांची. या आघाताने आबा पुन्हा कोसळले, पणजीला तर आभाळ फाटल्यागत झाले. आता या बुडत्या नावेला सावरून धरण्यासाठी पणजीने होता नव्हता तो धीर एकवटला आणि आबा आणि तुझ्या आईसाठी पुन्हा उभी राहिली. पणजी होती म्हणून तुझे आबा दुहेरी धक्क्यातून सावरले, तुझी आई पणजीच्या खमक्या आधाराने कळती सवरती झाली, चांगले शिकून ऊत्तम करियर मध्ये स्थिरावली. तिचं लग्न, तिची मुलं आणि तिची खुशाली सगळं डोळे भरून बघितल्यावरच पणजीने अखेरचा श्वास घेतला. "
या सगळ्या संकटाच्या मालिकेत तगून रहायचं बळ कुठून आलं असेल पणजीकडे? तिचंही मन कातरलं असेलच, हिंमत कधीतरी खचली असेलच, पण या सगळ्याला मागे ठेवून तिच्या जबरदस्त इच्छाशक्ती ने दर वेळी ती पुढे पुढे जात राहिली, मागचं उगाळत अडचणी कुरवाळत बसली नाही, हात पाय गाळून बसली असती तर आबा आणि नातवंडांचे हाल हाल झाले असते.
परी, तुझ्या आईला तिच्या आजीकडून हेच बाळकडू मिळाले आहे, म्हणून आजवर तिला कधीच आपण कोणीच काळजीत बसलेलं पाहिलं नाही. हे वर्ष तुझ्या लेखी वाईट गेलं असेलही, पण म्हणून सगळं संपल्यासारखं वाटून घेऊ नकोस. बाबा आता त्याच्या तब्येतीबद्दल जागरूक झालाय, ही विल बी फाईन. आबा सगळ्यांना अजून हवेच होते पण त्यांच्या 85 ला सुखासमाधानानं हिंडते फिरते असताना गेले हे नशीब आहे. तुझ्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण खात्री आहे, विसाचं दार बंद झालं तरी अजून चांगल्या जाॅबचं दार नक्की उघडेल.
हो आत्या, मला खूप बरं वाटतंय तुझ्याशी बोलून, पणजीची गोष्ट ऐकून तर अंगावर काटा आला. परिस्थितीला सामोरे जाण्यातच शहाणपण आहे, खचून जाऊन कुढत राहण्यात नाही.
आता मागचं झालं ते झालं, नव्या उमेदीने नवीन वर्षी जोरात प्रयत्न चालू ठेवीन मी, शेवटी सिर सलामत तो पगडी पचास .
दॅट्स माय गर्ल, हॅपी न्यू इयर
#माझेलेखन