मदतनीस किंवा ब्युरो ही सेवा घेण्याआधी काही प्रश्नावली किंवा चाचणी यादी तयार करता येईल का याबाबत एक पोस्ट वाचनात आली.
माझ्या अनुभवानुसार ती यादी किंवा मुद्दे मी या पोस्टमध्ये मांडते.
प्रत्येकाने आपापल्या अनुभवानुसार त्यात भर घालावी किंवा बदल करावेत.
मदतनीसांकडून अपेक्षे बाबत मुद्दे:
1) पेशंट स्वतःचे काय आणि किती करू शकतो याची माहिती देणे
2) पेशंट कोणत्या गोष्टी स्वतः करू शकत नाही
3) पेशंटला डॉक्टरांनी कोणती ऍक्टिव्हिटी आवर्जून करायला सांगितली आहे
4) पेशंटला डॉक्टरांनी काय करायला मनाई केलेली आहे
5) मदतनीसानी पेशंटची करायची कामे
6) मदतनिसांनी घरातल्या कामांमधली पेशंटशी निगडित करायची कामे
7) कामावर येण्याची वेळ, कामावरून सुटण्याची वेळ परस्पर संमतीने ठरवणे
8) मदतनिसाने पेशंट कडे खालील चौकशा करू नयेत :
घर, त्यातील माणसे, त्यांची कामे, त्यांची मुले बाळे
9) मदतनीसाने पेशंटची बोलायची इच्छा आहे किंवा नाही हे बघून मग पुढील संभाषण वाढवायचे की नाही हे ठरवावे
10) मदतनिसाला जर फोन आला तर पेशंटचे काम चालू असताना तो घेणे टाळावे
11) पेशंटचे काम चालू नसताना जर फोन आला तर पेशंटची पूर्व परवानगी घेणे आणि बोलण्यासाठी पाच दहा मिनिटांची रजा घेणे
12) मदतनीसाला जर फोन करायचा असेल तर पेशंटची कामाची वेळ नाही अशी वेळ बघून पेशंटची पूर्वपरवानगी घेऊन किती मिनिटे बोलू शकते याचा अंदाज घेऊन पंधरा मिनिटांची सुट्टी घेणे
13) पेशंटला हवे असेल तेव्हाच टीव्ही, रेडिओ किंवा इतर करमणुकीची साधने सुरू केली जातील अन्यथा इतर वेळी ती बंद राहतील त्याबाबतीत पेशंटच्या डोक्याशी भुणभण करू नये
14) घरातील इतर कामगार वर्ग किंवा मदतनीस यांच्या वाट्याला जाऊ नये
ते करत असलेल्या कामांचा क्वालिटी कंट्रोल करायला जाऊ नये
त्याबाबतीत पेशंटच्या डोक्याशी कटकट करू नये
तिने अमुक अमुक केलंच नाही, तिने आज हे झाडलंच नाही
ही भांडी बघा अशीच राहिली आहेत यातले काहीही पेशंटला किंवा घरातल्यांना सांगायला येऊ नये
घरातल्या कामवाल्या बाईच्या हलगर्जीपणाचा बोजा तुमच्यावर पडतोय असे वाटत असेल तर कामवाल्या बाईशी डायरेक्टली डील करायला सांगावे.
पेशंट आणि परिवाराने पाळायच्या काही गोष्टी:
1) मदतनीस माणूस आहे त्याला माणसाच्या गरजा आहेत.
2) योग्य वेळी जेवणाची सुट्टी, त्यानंतर पेशंट ची वेळ सांभाळून पंधरा-वीस मिनिटे विश्रांती, अधेमधे दिवसातून एखादा आलेला फोन, एक दोन केलेले फोन हे मान्य असायला हवे.
3) आपल्या पेशंटच्या स्वभावाचे आपल्याला व्यवस्थित भान हवे, त्याबाबत स्वीकृती हवी
दरवेळी मदतनीसच चुकीचे असतील आपला पेशंटही चुकू शकतो ही शक्यता गृहीत धरायला हवी आणि त्यानुसारच मदतनीसाला किंवा पेशंटला दोघांनाही सौम्य प्रकारे समजावणे ही घरातल्यांची जबाबदारी असायला हवी.
4) मदतनीसाला घरातली जादा कामे सांगताना ती फक्त आणि फक्त पेशंटशी निगडित असतील, त्याच्या स्वच्छतेच्या प्राथमिक गरजेच्या संबंधित असतील इतपतच सांगावी बाकी कोणासाठीही घरकाम करायला मदतनीस बांधील नाही हे पक्के लक्षात ठेवावे.
5) मदतनीसाला ही सणवार आहेत, घरदार आहे, सणावारी त्यालाही सुट्टी लागणार, ती आनंदाने द्यावी सणवार असल्यामुळे त्यावेळी बदली मदतनीस मिळणार नाही याची पुरेपूर तयारी ठेवावी.