Friday, April 26, 2024

kho gaye....

#CinemaGully 
#khogayehumkahan 
#netflixmovies 

झोया अख्तर रीमा कागती लिखित अजून एक मैत्रीचा नजराणा.
पुन्हा तेच त्रिकूट, पुन्हा तीच केमिस्ट्री तेच टिपिकल झोया स्टाईल शहरी वातावरण (ज्यात उभं आयुष्य गेल्यामुळे ते दाखवण्यात ती रमते, पण त्याच बरोबर गली बाॅय चे आयुष्य सुद्धा अचूक चितारते)
त्याचप्रमाणे त्रिकूटातील एक जण इतर दोघांपेक्षा मध्यमवर्गीय स्तरातील असणे हे समान धागे झाले.

या वेळचे वेगळेपण म्हणजे चित्रपट पूर्णपणे जेन झी च्या सोशल मीडिया ने व्यापून टाकलेल्या आयुष्यावर आधारित आहे.

झोया आणि रीमा च्या लिखाणातली दमदारपणा प्रसंगानुरूप संवादांमधून उत्तम प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांची मांडणी आणि सादरीकरण याची अचूक जबाबदारी दिग्दर्शक पार पाडत त्याला चार चाँद लावतो.

आपल्या आजूबाजूचे मुलं मुली फोन मध्ये डोकं घालून नेमकं काय करत असतात हे आपल्याला कितीही ठाऊक असलं तरी त्याचे दुरगामी परिणाम किंवा त्याची चटक लागणं म्हणजे काय आणि त्याच्याशिवाय पान न हलणं म्हणजे काय हे बघताना आपण पुन्हा एकदा चाट पडतो.

यांच्या आयुष्यावर टिप्पणी करण्याकरता इमादच्या स्टँड अप कॉमेडी चा वारंवार केलेला वापर फार सुरेख जमून गेला आहे.
 
 एका रूममध्ये एकत्र मित्रांबरोबर बसलेले असताना देखील आपण एकमेकांत सहभागी नसतो, आपण एक एकटे आपापल्या फोनच्या विश्वात रममाण असतो, कुणी टिंडर वर असतं कोणी शॉपिंग करत असतं कुणी टेक्सटिंग करत असतं.
नीलच्या कामाचा भाग म्हणून त्याने इंफ्लुएनसरशी मैत्री करणं आणि त्यानंतर तिच्यात एकतर्फी गुंतत जाणं, तिने मात्र त्याच्याकडे विरंगुळा म्हणून पाहणं एवढेच नव्हे तर आपल्या फॉलोवर्सचा आकडा यत्कींचित ही कमी न होता तो वाढतच जावा यासाठी त्याच्याबरोबरची कोणत्याही प्रकारची जवळीक पोस्ट न करणं, जाहीर न करणं हे सगळं बघता आपण चक्रावून जातो.

चित्रपटाचा बऱ्यापैकी भाग हा या इनफ्लुएनसर स च्या आयुष्यातले झोल आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना होणारे मॉरल पोलीसिंग, ट्रोलिंग, त्यांचं स्वतःतच रममाण होण्याची वृत्ती, एक वेगळंच जग झोया आणि रीमा आपल्याला दाखवतात.

मागणी तसा पुरवठा याच न्यायाने सर्व दोष त्यांच्याकडे न टाकता दुसऱ्यांच्या आयुष्यात 24 तास डोकावण्याची आपल्याला लागलेली चटक तितकीच या सगळ्याला जबाबदार आहे हे अधोरेखित हा चित्रपट करतो. 

दुसऱ्यांचं भारी आयुष्य बघत बघत यातील पात्र आपल्या आयुष्याशी तुलना करत राहते मग स्वतःबद्दल कीव येत मग भारी वाटण्यासाठी ती भारी भारी फोटो टाकत स्वतःचं सुरळीत नसलेलं आयुष्य सुद्धा किती हॅपनिंग आहे याचं प्रदर्शन मांडते आणि मग त्याला मिळालेल्या व्ह्यूज लाईक आणि कमेंट्स मधून आपल्या स्वप्रतिमेला गोंजारत राहते. 

आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की ट्रॉलर्स नेमके कोण असतात का प्रत्येक अकाउंट बद्दल प्रत्येक पोस्ट बद्दल काहीतरी खोचक बोचक कधी विकृत अशी टिप्पणी करायची असते याचे उत्तर आपल्याला हा चित्रपट जाता जाता देऊन जातो.

 तसंच झोयाच्या आधीच्या चित्रपटांमध्ये दिसलेला मैत्रीतला एक नाजूक क्षण इथे ही येतोच. मैत्रीतील ती अदृश्य सीमारेषा जेव्हा नकळत किंवा जाणून बुजून पार केली जाते, मस्करी ची कुस्करी होते. तेव्हा इमादच्या हातून घडलेलं कृत्य नंतर त्याला आणि आपल्या पुढेही हा प्रश्न फेकत राहतं. तुमची पोस्ट, तुमचे अकाउंट, तुमचा परफॉर्मन्स दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यावर ताशेरे उडत हिट करायला आपण मागेपुढे पाहत नसू तर तेच ताशेरे आपल्या उणीवांवर आपण मारू शकतो का त्यावर विनोद निर्मिती करू शकतो का हे सोशल मीडिया वर वावरणाऱ्या प्रत्येकाने पडताळून बघायला हवे. 

सर्वांची कामे सुरेख झाली आहेत, अनन्या आजवर इतकी कधीच आवडली नव्हती. सिद्धांत, आदर्श सारखे इंडस्ट्री बाहेरील टॅलंट टॅप करणारी झोया का खुशी, सुहाना, अगस्त्य यांना पदार्पणाची संधी देते किंवा का अनन्या, आलीया साठी अनुरूप पात्र निर्मिती करते याचे उत्तर तिला स्वतःच्या कौटुंबिक पाश्र्वभूमीमुळे मिळालेल्या privilege मधे आणि त्याचे चीज करण्यामधे आहे.