या वर्षी चा 31 डिसेंबर आजवरचा सगळ्यात संस्मरणीय ठरला. या वर्षी आम्ही सहकुटुंब एका मित्राच्या शेतावर अख्खा दिवस घालवला. शिक्रापूर जवळ शिरूर तालुक्यात टाकळी भिमा या गावी आमच्या या मित्राची 100 एकर सामायिक शेती आहे . आजवर बागाईतदार हा शब्द आम्हाला फक्त ऐकून ठाऊक होता, तिथे गेल्यावर आमच्या जुन्या मित्राची ही नवीनच ओळख आम्हाला झाली.
पुरोहित वाडीत शिरताच ऊसांचे मळे स्वागताला फुलून उभे होते. तिथून थोडं पुढे येताच मोठं पटांगण असलेल्या वाड्यात गाड्या स्थिरावल्या. त्यानंतरचं स्वागत गोठ्यातील जनावरांनी केलं. 3 श्वानांनी हाका मारुन मारुन आम्हा पाहुण्यांना जवळ बोलावलं . स्वतःची प्रेमानें ओळख करुन दिली, आमची करून घेतली. मग मुलांनी गायीवासरांकडे मोर्चा वळवला. तिथेही अशीच मायेची ओळख परेड झाली. तोवर गरम चहा समोर आला.
चहा होईस्तोवर बाजूला चुलीवर भाकर्या थापण्या भाजण्याचं सुंदर चित्र आकाराला येत होतं. लगेच कॅमेरे सरसावले, अन्नपूर्णेची परवानगी घेऊन ते कसब फोटोत विडियोत साठवलं गेलं. जेवणाची वेळ अर्धा पाऊण तासातच होती पण त्या दृश्याने तिथेच एक गरम भाकरी खाण्याचा मोह आवरला नाही. थोड्या गप्पागोष्टी होईस्तोवर अजूनही गोठ्याजवळच घुटमळणार्या मुलांना जेवायचं बोलावणं आलं. मग मोठ्यांच्या पंगती बसल्या. तांदुळाची भाकरी, मेथी ची भाजी, खरडा , वांग्याची रस्सा भाजी, पापड, कुरड्या, भजी, काकडी, टोमॅटो, आमटी भात असा फक्कड बेत होता.
पंचेंद्रिय तर तृप्त झालीच, पण त्याचबरोबर जुन्या मित्रांच्या सोबतीने मन ही तृप्त झाले. मुंलांची एकमेकांशी जमलेली गट्टी बघून तर अजून समाधान झाले. जेवणं उरकल्यावर मुलांचे बोर्ड गेम्स रंगले, ते जरा लवकर आटोपते घेतले, कारण अजून सगळा परिसर हिंडून यायचे होते.
नजर ठरणार नाही इतकी विस्तीर्ण ऊस शेती, त्यात सुरू असलेली ऊस तोडणी, कामगारांचे सपासप चालत असलेले हात, त्यांची उघड्यावरची कुटुंब सगळं सगळं इतक्या जवळून आम्ही प्रथमच पाहत होतो. शेतीचा पट्टा संपेस्तोवर भिमा नदीच्या निळ्याशार पाण्याने आम्हाला खुणावले. मग तासभर फोटो काढण्यात पाण्यावर चपट्या खड्यांनी तरंग उमटवण्यात निघून गेला.
परतीच्या वाटेवर मगाशी न भेटलेला मेंढरांचा कळप दृष्टीस पडला. मग मुलांनी त्यांच्याशी पण दोस्ती केली. परत वाड्यात शिरता शिरता ट्रॅक्टर च्या अंगाखांद्यावर खेळून झालं. चहा घेऊन, सर्व मदतनीस कुटुंबांचे आभार मानून परतीच्या वाटेवर निघालो.
हा असा एकदिवसीय गावरान अनुभव देणारी कित्येक पॅकेजेस आज उपलब्ध आहेत. पण आपल्या दोस्ताचं हे वैभव त्याच्या सोबत अनुभवायला मिळणं या सारखं दुसरं भाग्य नाही. वर्षभरातील अनुभवलेल्या कडू गोड प्रसंगांवर मिळालेला हा वर्षाअखेर चा श्रमपरिहार