Friday, January 17, 2020

Uthal pani

प्रिया चे नुकतेच लग्न झाले होते.  सासरकडची मंडळी हौशी होती, मित्रमंडळ भरपूर,  सगळ्यांकडे येणेजाणे होते. अशाच एका स्नेह्यांनी नवीन सूनबाईंची ओळख व्हावी म्हणून एक दिवस प्रिया आणि तिच्या घरच्यांना चहाला बोलावले होते.

प्रिया ला घर बघताक्षणीच आवडले.  स्वच्छ,  टापटीप आणि मोजके फर्नीचर होते. या कुटुंबाची तशी लग्नात थोडी फार ओळख झाली होती पण आज नीट जाणून घेण्याचा योग आला होता.  यजमानांनी आगत स्वागत केले, वडीलधार्यांच्या पायी पडून प्रिया बाकी मंडळींकडे उत्सुकतेने पाहू लागली.

तेवढ्यात त्या घरची धाकटी सूनबाई आपणहोऊन प्रिया ची ओळख करून घ्यायला आली.  प्रिया पेक्षा 5/6 वर्षांनी मोठी असेल. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या,  मग चहा फराळ आला.  फराळ धाकट्या सूनबाई सर्वांना देत होत्या.
 त्यासोबतच सुरू झाली यजमानीण सूनबाईंची तोंडाची टकळी. आपल्या माहेरचा उदो उदो. आमच्याकडे मिलिटरी शिस्त,  काॅस्मोपोलिटन वातावरण,  पार्टी कल्चर,  मोठ्यांमधे उठबस,  आमची पदार्थ सर्व्ह करायची खासियत, होते नव्हते ते सगळे उगाळून झाले.

 गप्पा आटपल्या, सगळ्यांचा निरोप घेऊन प्रिया ची घरची मंडळी परतली. साहजिकच प्रिया ने कुतुहलापोटी यजमानीण सूनबाईंच्या मिलिटरी माहेरचा विषय काढला. त्यांचे वडील कुठे कोणत्या पोस्ट वर होते, असं ती सासुबाईंना विचारू लागली. त्या बरोबर सगळे घरचे जोरात हसू लागले. नवरा म्हणाला, " अगं कसलं पोस्टींग आणि कुठला हुद्दा? सुरेखा वहिनींचे वडील आर्मीत नाही,  मिलिटरी ईंजिनीयरींग सर्व्हिस मधे कामाला होते . तेवढ्यावर हिची नवीन लोकांसमोर असली टिवटिव चालू असते, आव तर असा असतो कि कुठे या गावंढळ लोकांच्यात येऊन पडले आहे. 

आता कुठे प्रिया ला जाणवायला लागलं कि हा तर उथळ पाण्याचा  खळखळाट.

असे कितीतरी अनुभव आपल्याला रोज येतात नाही? माणूस बोलून जातो बरंच काही,  पण करायची वेळ आली कि गायब होतो.  शांतपणे गाजावाजा न करता कर्तव्य करून मोकळं होणारा वेगळाच असतो. सोशल मीडिया वर या वृत्ती चा जाम धुमाकूळ चालू असतो. घरी एकमेकांची तोंडे विरुद्ध दिशेला असणारी जोडपी,  आपली ॲनिवरसरी पिक्स कशी जास्तीत जास्त युनिक असतील या बाबत कमालीचे काटेकोर असतात. कलाक्षेत्रात तर आजकाल एकवेळ गुणवत्ता कमी असेल तरी चालते, पण चमकोगिरी जमली पाहिजे हा समज फोफावत चालला आहे. पण याच भाऊगर्दीत एखादी सोज्वळ राहणारी, सोशल मीडिया वर झळकण्याचा अट्टाहास नसलेली विभावरी आपटे सारखी प्रतिभावान गायिका आपल्या अस्सल बावनकशी आवाजाचा ठसा उमटवत राहते.

उथळ पाण्याचा  खळखळाट शेवटी क्षणिकच ठरतो, चिरंतन राहते ती खोलवर रुजलेली नीतिमत्ता.