Thursday, January 23, 2020

Swatantrya maze

नुसतं एक स्त्री म्हणून किंवा माणूस म्हणून आपण कधीच जगत नाही  बेसिक स्वातंत्र्य संसारात पडल्यावर मागायचं नसतं. ते हवंच असेल तर मग विनापाश एकटं राहणं हाच एक उपाय आहे. आपण जगतो कुणाची तरी आई, पत्नी,  नणंद, सून, वहिनी, काकू, आत्या म्हणून.  आपण असतो सदैव कुणाची तरी सासू, आजी, विहीण,  मावशी,  मामी. या सर्व नात्यांसोबत येते अपेक्षांची भली मोठी यादी. 

एकाची अपेक्षा दुसर्याचं स्वातंत्र्य हिरावणारी असू शकते, पण त्याला इलाज नाही.  हे जो स्वीकारेल त्यानेच संसारात पडावं अन्यथा एकटा जीव सदाशिव रहावं.  तर एवढी क्लॅरिटी आली कि उरलेल्या अवकाशात आपापल्या स्वातंत्र्याची व्याख्या करता येते का ते पाहू.

नात्यांचे हे सर्व रोल्स निभावताना मुद्दाम स्वतःसाठी वेळ काढणं,  आपले छंद जोपासणं, हे माझी स्वातंत्र्याची बेसिक रुपरेखा.  स्वतःसाठी काढलेल्या वेळी इतर कोणताही रोल न करता,  तो सगळा वेळ उपभोगता येणं हे माझ्यासाठी स्वातंत्र्य. 
स्वतःच्या शरीरधर्माबद्दल जागरूक आणि आग्रही असणं हे ही खूप महत्त्वाचं आहे. स्वतःच्या पाळीसंबंधित निर्णय स्वतः घेणं हे माझ्यासाठी स्वातंत्र्य.  माझ्या पाळीची तारीख माझ्या व्यतिरिक्त कोणाला माहित असावी हे ठरवण्याचा अधिकार माझा असावा. या गोष्टीशी देवाधर्माच्या संकल्पना जोडणं अथवा नाकारणं हा निर्णय मी घेणं म्हणजे स्वातंत्र्य.

मी कोणत्या प्रसंगी काय पेहराव करावा, कोणत्या समारंभाला येणं जाणं ठेवावं किंवा टाळावं याची स्पष्टीकरणं कुणाला द्यावी न लागणं हे माझ्या दृष्टीने स्वातंत्र्य. माझं वजन,  माझे लुक्स,  माझं राहणीमान हे कुणाच्याही कल्पनाविलासाला प्रमाणे न बदलता मला रुचेल,  झेपेल आणि कम्फरटेबल वाटेल अशा पद्धतीने ठेवणं हा माझा निर्णय असेल.

कुटुंबाव्यतिरिक्त माझं स्वतःचं जग आहे.  त्यातली माझी माणसं, माझा  मित्र परिवार यांच्यामध्ये माझी भावनिक,  कधी आर्थिक गुंतवणूक असणार  आणि या बद्दल चे निर्णय मला घेता येतील ते स्वातंत्र्य. माझी विचार पक्रिया  दरवेळी समोरच्याशी जुळायलाच हवी असा माझा आग्रह नसेल आणि समोरच्याने ही तो धरू नये.  माझ्या स्वच्छतेच्या कल्पना, खाण्यापिण्याच्या सवयी तुमच्याहून निराळ्या असतील अशा शक्यता गृहीत धरून माझ्या माणसांनी मला विनाअट स्वीकारणं हे माझ्या दृष्टीने स्वातंत्र्य.

हे सर्व मुद्दे मलाही लागू होतात, या न्यायाने मी देखिल समोच्याचं स्वातंत्र्य जपण्यासाठी जागरूक रहावं हे ही अपेक्षित आहे.  मागच्या पिढीतील स्त्री जर स्वतःचे पारतंत्र्याचे दिवस आठवून पुढल्या पिढीतील स्त्री ला देखिल तेच पारतंत्र्य देत असेल तर त्यात तिचा ईगो सुखावेल पण माणूस म्हणून तिची वाढ खुंटेल.