Saturday, March 21, 2020

Karonaanisocialmedia

करोना आणि सोशल मीडिया

कठीण समयी माणसांचं खरं रूप कळतं असं म्हणतात. या करोनापर्वाने ही समजूत खरी ठरवली आहे. सध्या सोशल मीडिया वर माणसांची  विविध रुपं बघायला मिळत आहेत. सोशल मीडिया खोटं आहे माणसं खरी आहेत,  ही फाॅरवर्ड्स तेवढ्यापुरती वाचून सोडून द्यायची , माणसं कायम आपली राहणार आहेत हे सगळं सगळं खरं असलं तरी आपल्या विचारसरणीचे प्रतिबिंब आपल्या सोशल मीडिया वरच्या वावरण्यातून दिसत असतं. आपण काय पोस्ट करतो, काय फाॅरवर्ड करतो, कोणत्या जोक्स वर हसतो, माना डोलावतो त्यातलं काय खरं मानतो, काय दुर्लक्ष करतो हे सगळं आपलं व्यक्तीमत्व दर्शवत असतं.
सुरवात जोक्स ने करुया. काही जोक्स खरंच चेहर्यावर हसू आणतात. या जोक्स च्या निर्मात्यांची कमाल वाटते. घटना कोणतीही असो अगदी महिला दिन ते गायब झालेलं मलेशियन एअरलाईन त्याला नवरा बायको च्या तू तू मैं मैं ची खमंग फोडणी देऊन तीच चावून चावून चोथा झालेली जोक्स ची मालिका रेटत राहतात. पण जेव्हा हे जोक्स निर्माते एखाद्याच्या व्यंगावर किंवा जीवन मरणाच्या व्यथेवर बळेबळेच कोट्या करायला लागतात तेव्हा चीड येते. त्यांच्या बरोबरीने आपणही जेव्हा या जोक्स ची मजा घेत पुढे पाठवत राहतो तेव्हा आपणही नकळत आपली पातळी सोडलेली असते.
या करोनापर्वात शाळकरी मुलं परीक्षा रद्द झाल्याने जाम खूष आहेत पण त्यांच्या आया मात्र हवालदिल झाल्या आहेत. 5वी /6वी /7 वी च्या परीक्षा रद्द झाल्याने जणू करियर चं वाटोळं होईल कि काय या भितीने आयांच्या तोंडचं पाणी पळालंय. 31 तारखेला मी गेलोच म्हणून समजा असं करोना वायरस यांच्या कानात सांगून गेल्याच्या आविर्भावात या आया शाळांनी एप्रिलमध्ये परीक्षा घेऊन टाकाव्यात असं सुचवतायत. कित्येकांनी शाळेतून एक्झाम कॅन्सलेशन चा निरोप आपल्या अदरवाईज टेक सॅव्ही मुलांपासून लपवायचा केविलवाणा प्रयत्न ही करून पाहिला. मुलांना शाळेने एक्झाम पेपर्स ऑनलाईन द्यावेत पण एक्झाम घ्यावी ही देखिल कळकळीची काही ' जागरूक ' पालकांची विनंती आहे.
या करोनापर्वात जागोजागी ज्ञानामृताचे असंख्य झरे फुटले आहेत. आपण शिकली सवरलेली माणसं सत्य असत्य न पडताळता येईल ते ज्ञानामृत प्राशन करून दुसर्याकडे त्वरित पिटाळतो. रसायन काय,  फवारणी काय, उपग्रहातून वायुगळती काय, ओंकार पठणाची लस काय कशाला कशाचा संबंध जोडून वाट्टेल ते पसरवणे सुरू आहे.
या सर्व गदारोळात काही थोर स्वयंघोषीत देशभक्त आपले वैयक्तिक हेवेदावे पोस्ट्स च्या खांद्यावर बंदुक धरून बाहेर काढतायत. बर्याचदा आपल्या देशाबाहेर वास्तव्य न करणे या एकाच कारणाने ते स्वतः ला देशभक्त म्हणवत असतात. ' पैसा मिळतो म्हणून परदेशात पळालात आता आपत्ती आल्यावर देश आठवला ' या टाईपच्या पोस्ट्स ही त्यांची बंदूक असते आणि हिरीरीने  त्या फाॅरवर्ड करण्यात ते धन्यता मानतात. आपण घराच्या 4 भिंतीत सुरक्षित आहोत म्हणून अधेमधे अडकलेल्यांवर हसणे याने आपलीच मनोवृत्ती उघड होते.
करोनाचं वादळ जात, पात, धर्म, वंश, देश, प्रांत काहीही न जुमानता धडकत असताना आपण मात्र अजूनही आपापल्या चाली रिती ,सवयी ,संस्कार च या संकटावर मात करतील असे ढोल बडवत आहोत. मात करणारे आपली रोगप्रतिकारशक्ती आपल्या धर्माबाबत चा अहंकार नाही.
एकीकडे आपणच हातावर शिक्का मारलेला असून देखिल मोकाट फिरतो आहोत तर दुसरीकडे आपल्या मोलकरीणीला साध्या सर्दी चे निमित्त करून घरात घेणं टाळतो आहोत. कुठे स्वयंशिस्तीने उरुस, जत्रा बंद करणारे आहेत तर कुठे रस्ते कसे मोकळे आहेत हे बघत फिरणारे इम्युनिटी चे पुतळे आहेत. एकीकडे परदेशातून आलेले आणि सेल्फ क्वारंटाईन करून घेतलेले सुरेश प्रभू आहेत आणि दुसरीकडे ट्रॅवलहिस्ट्री लपवणारे महाभाग आहेत.
एकूणच मजेशीर हालचाली आणि मतमतांतरं आजूबाजूला दिसतात. पोस्ट करणारी आपलीच आहेत,  त्यांच्या सोशल मीडिया वावरामधून त्यांना जज करायचा इथे हेतू नाहिए , सोशल मीडिया वरील पोस्ट्स मुळे परस्पर संबंध बिघडू न देण्याचा सूज्ञपणा आपल्या सर्वांना आहेच तरीही या गोष्टी आपल्यातल्या माणूसपणाचं खरंखुरं दर्शन जगाला घडवतात याची जाणीव कुठेतरी असावी एवढ्यासाठी  हा लेखन प्रपंच.
- मीनल देवस्थळे