Monday, March 30, 2020

 नमस्कार,
कालच इकडे जाॅईन झाले आणि अगदी आपल्या घरी आल्याचा फील आला. चित्रपट, गाणी रसग्रहण सगळंच आवडीचं. निमित्त झालं पॅरॅसाईट सिनेमा चं. आम्ही दोन मैत्रिणींनी एकाच दिवशी चित्रपट पाहिला, अचाट कलाकृती अनुभवल्यावर जे होतं तेच आम्हा दोघींचंही झालं. निशब्द भारावलेपणाची स्टेज ओसरल्यावर आपल्या ला जे वाटलं भावलं तेच पूर्ण कि काही निसटून गेलं हे तपासून पाहण्याची स्टेज येते. त्या करता मैत्रिणीशी बोलताना तिने मला या ग्रुपमध्ये अॅड केलं. याच सिनेमा वरच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेल्या    जुन्या सर्व पोस्ट्स वाचून काढल्या आणि आत दाटून आलेली अनुभूती कागदावर उतरवण्याची तिसरी स्टेज गाठली.
एव्हाना मेंबर्स नी चित्रपट पाहिला असेलच तरीही my two cents समजून केलेला  हा प्रांजळ प्रयत्न.

#parasite
पॅरॅसाईट हा जीवसृष्टीतील एक असा घटक आहे जो स्वतः चे अस्तित्व दुसर्याच्या जीवावर जगवतो. यजमानाच्या नकळत त्याच्या शरीरात शिरकाव करून ही बांडगुळं त्याचा शरीररस शोषून त्यावर स्वतःला जगवतात. बर्याच वेळा होस्ट बाॅडी धारक माणूस पर्सनल हायजिन बाबतीत जरा ढिसाळ झाला कि यांचं चांगलंच फावतं. मग पोटात जंत होणे किंवा  ढेकूण , उवांमुळे होणारी स्किन इनफेक्शन अशा तक्रारी डोकं वर काढतात.
पॅरासाईट या यंदाच्या ऑस्कर विजेत्या कोरियन चित्रपटातील काही पात्रांच्या नशिबी हे असं पॅरॅसाईट होऊन जगणं आलं आहे. चित्रपटात आपली प्रथम Kim फॅमिली शी ओळख होते. Ki-Taek आणि Choung-Souk हे दांपत्य आणि त्यांची Ki-Jung आणि Ki- woo ही मुलं. शिक्षण नाही, आर्थिक स्थैर्य नाही असं हे कुटुंब  Seoul शहरातील एका लोअर क्लास वसाहतीमधे एका खुराड्यात राहात असतं. अशातच एके दिवशी ki woo चा मित्र त्याला एक नोकरी ची ऑफर देतो.
पात्रता नसताना देखील चालून आलेली ही संधी  ki woo ला सोडवत नाही. अशा परिस्थितीत उच्चभ्रू Park फॅमिली मधे नोकरी निमित्त ki woo चा प्रवेश होतो. या कुटुंबात असतात mr and mrs Park आणि त्यांची मुलं  Da-hye आणि Da-song. Park फॅमिली च्या वैभवाने ki woo चे डोळे विस्फारतात आणि kim फॅमिली एक प्लॅन बनवते. Park फॅमिलीच्या गरजा जाणून घेऊन त्यांच्या गाफिलपणाचा गैरफायदा घेत kim फॅमिली एक एक करून या बड्या घरात आपलं स्थान बनवते. हा शिरकाव तद्दन खोटेपणावर रचलेला असला तरीही आपापली धारण केलेली सोंगं अतिशय बेमालूमपणे वठवून kim फॅमिली park फॅमिली ला फसवत राहते.
कितीही आव आणला, अंगावरची वस्त्रे बदलली,  देहबोली बदलली तरी बकालपणा काही लपत नाही. Kim फॅमिली च्या वस्तीला, तिथल्या राहणीमानाला चिकटलेला दर्प काही त्यांची पाठ सोडत नाही. आपल्या या किड्या मुंगीच्या बकाल अस्तित्वाची घृणा उच्चभ्रू वर्गांचं प्रतिनिधित्व करणार्या मालकाच्या मनात खोलवर रुजलेली आहे हे kim फॅमिली  व्यवस्थित जाणून असते.
Park फॅमिली च्या जीवावर Kim फॅमिली आपलं बांडगुळांचं आयुष्य जगत असताना गोष्टीला एक अतिशय नाट्यमय कलाटणी मिळते. Kim फॅमिली ला माहीत नसलेली एक वेगळीच बाजू त्यांच्या या प्लॅन ला सुरुंग लावायची शक्यता निर्माण करते. यातून एक विचित्र विषण्णावस्था त्यांच्या पुढे उभी ठाकते. शेवटी एक असा प्रसंग घडतो ज्यात  उच्चभ्रूवर्गाने  आपल्या शत्रूबाबत ही दाखवलेली हीनतेची भावना सहन न होऊन kim फॅमिलीतल्या बापाकडून एक प्रमाद घडतो.
ही चित्रपटाची ढोबळमानाने सांगितलेली गोष्ट. पण त्याचा सुन्न करणारा प्रभाव अनुभवायला चित्रपट पहायलाच हवा. चित्रपटात जे सांगायचं आहे ते फक्त subtitles मुळेच पोचतं असं नाही. त्यातील पात्रांचं व्यक्तीचित्रण, त्यांच्या मनातील चलबिचल पोचवणारी लेखणी, दिग्दर्शकाचं कसब, कलाकार तंत्रज्ञांचं कौशल्य सगळं सगळं मिळून तयार झालेलं हे आर्टवर्क सध्या सर्व OTT माध्यमांतून बघण्यास उपलब्ध आहे.