Sunday, March 8, 2020

Samaanta6

समानता माझा हक्क असला तरी ती एक जबाबदारी सुद्धा आहे. ही जबाबदारी कशी निभावून न्यायची?
तर मुलींनी देखिल जुन्या समजुतींना बगल द्यायची गरज आहे. समस्त पुरुष जातीला एका तराजूत तोलणं योग्य नाही. कुठल्याही स्टिरियोटाईप मधे न अडकता खुलेपणाने जगाला सामोरं जायला हवं.
 त्याची आई हाऊसवाईफ आहे म्हणजे तो आयतोबा असणार, त्याला बहिण नाही मग त्याला काय कळणार, अमुक पोटजात म्हणजे अमूक सवयी, यातून बाहेर यायला हवं. लग्नाच्या मॅट्रिमोनियल साईट्स वर मुलींना किती विस्तृत अपेक्षा नमूद करता येतात. त्यातही कधीकधी अति कीस काढला जातो, किती वस्त्रगाळ करा शेवटी अॅडजस्टमेंट चाच मामला असतो सगळा हे मुलींनी सुद्धा समजून घ्यायला हवं. आपल्यापेक्षा जास्त शिक्षण आणि जास्त पगार असलेला नवरा हवा यात मुलींना तडजोड नको असते. पण या वरचढपणाचा मान राखायची तयारी सुध्दा मुलींनी ठेवावी.
एक ठराविक माइंडसेट घेऊन मुलींनी सासरी प्रवेश करू नये. चार डोकी एकत्र आली कि कुठेही मतभेद होणारच. सासू चुकली तर त्याचा गहजब करणार्या किती मुली आईही चुकते हे लक्षात घेतात? सासूने संसारात ढवळाढवळ करू नये ही अपेक्षा रास्तच पण तेच आईने केलं तर त्याला प्रेम म्हणणं ही विषमता नाही का? समानता हवी तर आईची चूक सुद्धा ठळकपणे मान्य करता यायला हवी. तिच्या चुकीच्या सवयी तंतोतंत उचलून सासूच्या सवयींना नावं ठेवणं सोडून द्यायला हवं. सासूच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करणे, सासरच्या चांगल्या पद्धती खुलेपणाने अंगिकारणे म्हणजे समानता.
तेच आईलाही लागू पडतं. मुली आणि सुनेचे एकाच खुलेपणाने कौतुक करणे म्हणजे समानता. कधी एखाद्या प्रसंगी लेक चुकीची पण सून बरोबर असू शकते हे स्वीकारणे म्हणजे समानता. एकमेकींच्या वरचढ राहण्याचा खटाटोप नणंद भावजयींनी कधीच करू नये. आईच्या नजरेत भावजय खाली राहिली तरच आपला वरचष्मा राहील ही भावना लेकीने मनातून काढून टाकायला हवी. विहिणींनी देखिल आपली मुलं ही आपल्या आईपणाचं मापदंड न मानता मुलांना त्यांच्या स्वतंत्र विचारसरणी ने वागू द्यावं.
आपल्या पैकी इतक्या जणी इतकं सुंदर लिखाण करतात, कितीतरी जणी आज इकडे रॅन्क होल्डर आहेत. त्यांच्या बाबतीत कौतुक वाटायचं सोडून जर आपल्याला त्यांच्या गृहिणीपणावर शंका घ्यावीशी वाटली, कसं काय लिहितात सहा दिवसात सहा लेख , वेळ बरा मिळतो असे विचार शिवले तरी मनाला लगेच दटावता यायला हवं.
एकूणच बायकांनी एकमेकांना स्पर्धक न मानता निर्लेप दृष्टीने पाहिलं तर समानता आपोआप रुजेल.