Friday, April 26, 2024

ads for helpers

काही पोस्ट ' आखूड शिंगी बहू दुधी' ही म्हण सार्थ ठरवत आहेत. 

मुळात कुणी ही आपले समजून दुसर्‍याच्या घरी उत्पन्नाचे साधन म्हणून राहून काम करील ही अपेक्षाच अवास्तव आहे. 
राहील, काम ही करील पण आपले समजून....? 

प्रत्येक मदतनीसाला आपलं घर आहे, संसार आहे, अडचणी आहेत, 
विनापाश व्यक्ति मिळणे, इतके सोपे असते? 
पूर्णपणे अनोळखी व्यक्तिवर आपण आपला पेशंट, घर, कागदपत्र, सामानसुमान सोडून निर्धास्त राहू शकतो? 
साधं केर, फरशी करणारी मदतनीस आपण कोणा ओळखीच्यांकडे काम करते हे पारखून कामावर घेतो, आणि पूर्ण वेळ घर ज्याच्या हवाली करणार अशी व्यक्ति फेसबुकवर शोधू शकतो?

घरातल्या व्यक्ति आपल्याच पेशंट ची दुखणी वर्षानुवर्ष काढून कंटाळून जातात, आणि परक्या व्यक्तिने दीर्घ काळ ते न कंटाळता करावे आणि अशी माणसे या ग्रुपवर जाहिरात करून मिळतील हा भाबडा (कि अति आगाऊ) समज आपण करून घेतो आहोत का? 

रीतसर bureau चा स्टाफ ठेवला तर निदान तो reliable असतो, background check होऊन आलेला असतो, खरंतर एका मर्यादेबाहेर ते ही कोणाची खात्री देऊ शकत नाहीत. 

आणि सेवाभाव आपल्याला तरी खरंच असतो का हो कि तो आपण परक्यामधे असण्याची अपेक्षा करावी? खरे सेवावृत्ती असणारे विरळाच, ते शिवधनुष्य पेलणारे त्याचे मोल पैशात करत नाहीत.

पोस्ट चा सूर हेटाळणीचा लागला आहे त्या बद्दल अगदी मनापासून माफी मागते, शेवटी अडला जीव सर्व प्रकारे विविध options शोधत असतो, मी ही त्यातून गेल्यामुळे अनुभव आहे, अजूनही घेते आहे, 

समोर हजर असेल मदतनीस तर मला सुट्टी नाहितर ते काम आपले, जसं घर आपलं, त्याची साफसफाई ही जबाबदारी आपली, आली तर मदतनीस करतेच पण तिने सुट्टी न घेता ते करतच रहावं ही अपेक्षा जशी अवास्तव तसंच पेशंट आपला, त्यांचं करणं हे आपलं काम, दुसरा कितीही मोल दिले तरी ते आपले समजून करेल याची आशा ही नाही आणि अपेक्षा ही नाही.

माझ्या करण्यात मला सेवाभाव नाही फक्त कर्तव्यपूर्ती दिसते तर बाहेरची सेवाभाव का म्हणून आणि कुठून आणेल? ती वरचेवर कंटाळून सुट्टीवर गेल्यावर मला तिचा राग येत नाही, तिला मी इतक्या सुट्ट्या का घेतेस विचारत नाही, मी गपगुमान माझ्या पेशंट च्या कामाला हजर राहते.

अगदी मान्य आहे, परदेशस्थ किंवा काम सोडून कुणाला हे जमणे अशक्य आहे आणि म्हणूनच ही अशी शोधाशोध करतात सगळं ठाऊक आहे, पण अशा वेळेस एक घर एक दोन जेष्ठ परक्याच्या हवाली करण्यापेक्षा तेवढ्याच मोबदल्यात वृद्धनिवासात व्यवस्था करणे जास्त योग्य वाटते.