काही व्यक्ती आयुष्यभर सामान्य मानव म्हणूनच जगू शकतात. त्या पलीकडे त्यांच्यात कोणत्याच भूमिकेत शिरण्याची कुवत नसते. आई/वडील, बहीण/भाऊ, नवरा/बायको, मुलगा/मुलगी, अगदी आजी/आजोबा सुद्धा. एकदा का यापैकी कोणत्याही नात्यात प्रवेश केला कि आपण स्वकेंद्रित सामान्य माणूस म्हणून जगूच शकत नाही. त्या भूमिकेचे आपल्याकडून काही ना काही मागणे असतेच.
यातील कोणतीही व्यक्ति दुसर्याशी भूमिका सोडून सामान्य माणूस म्हणून वागली कि मने दुखावली जातात. दुखावलेली मने सावरायची असतील तर त्या भूमिकेबाहेर काढून गुण दोषांचे मिश्रण असलेली सामान्य व्यक्ति म्हणून बघावे लागते. हे करायचा वाढीव क्लिष्ट प्रयत्न दुखावलेल्या मनालाच करावा लागतो. तो एकदा जमला कि भूमिकेबाहेरील माणूस म्हणून त्याचे सगळे वागणेबोलणे त्रयस्थपणे स्वतःवर परिणाम होवू न देता बघता येतात.
तरीही ज्येष्ठांचे पालकत्व निभावताना एखादा दिवस असा नाठाळ येतोच जो आपल्याला हे सगळे ज्ञान विसरायला लावतो, आपण पेशन्स ची परिसीमा ओलांडतो आणि बोलायला नको ते बोलून जातो.
या सगळ्यात एक पक्कं ठाऊक असतं कि 'ती मला बोलली' ही इतकीच नोंद समोरचा घेणार असतो, आणि आपण बोललेलो आतवर शिरणारं तर नसतंच पुढच्याच क्षणी स्वतःच्या पुढील गरजेच्या पूर्ततेकडे वळतात, आत्मपरीक्षण वगैरे या गोष्टी त्यांच्यासाठी नसतातच.
आपण मात्र नको ते बोलल्याबद्दल गिल्ट आणि त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक भाव या कात्रीत अडकतो.
या दोन्ही टोकांमधून स्वतःला वेळ देत, समजावत आपणच बाहेर काढावं लागतं, तर पुढचा पालकत्वाचा प्रवास अलिप्तपणे निभावून नेता येतो.