Friday, April 26, 2024

Ali baba ....

#CinemaGully 
#अलीबाबा_आणि_चाळीशीतले_चोर 

 अलीबाबा आणि चाळिशीतले चोर यातील प्रत्येक पात्र वेगवेगळ्या पातळीवर चोरटेपणा करतं. 
कधी नुसतंच मन मोकळं करायला भेटणं, कधी भावनिक आधार शोधणं, कुठे थ्रील टाईमपास.

आपल्या पार्टनरच्या नकळत किंवा त्याच्यापासून लपवून ठेवून केलेली प्रत्येक कृती.....अगदी अफेअर पर्यंत मजल न जाता देखील कोणतीही बारीकशी कृती .......उदाहरणार्थ एखादा मेसेज एखादा फोन कॉल एखादी भेट अशा प्रत्येक लपवून केलेल्या वेळी तुम्ही प्रामाणिकपणा चा उंबरठा खरंतर ओलांडलेला असतो. 

चित्रपटात अतिशय उच्चभ्रू आणि सो कॉल्ड मॉडर्न जीवनशैली जगणारी ही सर्व पात्र मोकळ्या मनाने एकमेकांशी मैत्री मात्र निभावू शकत नाहीत. 

आपल्या पार्टनरनी लपवून  दुसऱ्याशी  केलेली मैत्री ही निखळ मैत्री उरतच नाही,  मग ती कितीही प्लॅटॉनिक, वैचारिक, बुद्धिजीवी आणि भावनिक या पातळ्यांवर का असेना.  ही  वैचारिक स्पष्टता तुमची आणि तुमच्या पार्टनर ची असेल तर हा चित्रपट निव्वळ मनोरंजन म्हणून बघून तुम्ही तिथे सोडून देऊ शकता. 

 या चित्रपटातील(श्रुती आणि उमेश ची पात्र वगळता) प्रत्येकाच्या भूमिकेचा आलेख, त्याचे सादरीकरण, संवाद, दिग्दर्शन आणि एका काल्पनिक कथेची मांडणी या सर्वांचा साधलेला सुंदर मेळ अनुभवून तुम्ही निरलेप मनाने थेटर बाहेर पडू शकता.
  
यातील कोणतंही पात्र तुम्हाला रिलेटेबल  वाटलं  नाही तर याचा अर्थ तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं इक्वेशन हे निदान स्वच्छ आणि पारदर्शी नक्कीच आहे.  पण आजूबाजूला असं घडतच नाही का? पडद्यावर दाखवलेलं सगळं च अशक्य कोटीतलं आहे का? तर नाही, यातील प्रत्येक पात्र कमी अधिक छटांमध्ये आपल्या आजूबाजूला आपल्याला नक्कीच सापडतं. 

असं म्हणतात  की फिडेलिटी ही रिलेटिव्ह गोष्ट आहे.
 तुम्ही  तोपर्यंतच प्रामाणिक असता जोवर तुम्हाला संधी मिळत नाही. संधी मिळाल्यानंतर  देखील जर तुम्ही प्रामाणिक  राहिलात तर खरं. 

ही संधी पूर्वी कमी मिळत असे तेव्हा निदान सरळ सरळ extra marital affair असं लेबल तरी लावता यायचं, आता आपला फोन ही आपली individual space झाल्यामुळे त्यावर या सीमारेषा ओलांडणे अतिशय सुलभ झाले आहे, आणि म्हणूनच कोणतेही affair  चे लेबल न लागता त्यावर अनेक पातळ्यांवर देवघेव सुरु असते. 

चित्रपटातील मधुरा च्या तोंडी असलेलं एक वाक्य 
" हातात हात कि पायात पाय या दोन्ही मधे नक्की कशाला व्यभिचार म्हणायचं" हे इतकं देखील सोपं न राहता फार वेगळ्या धूसर स्तरावर आजूबाजूला  पसरत चालले आहे ही वास्तवता आपण कोणत्याही आर्थिक,सामाजिक स्तरातील असलो तरी नाकारू शकत नाही.