Friday, April 26, 2024

covid period

लोकहो, आजकाल कोविड च्या दुसर्या लाटेबद्दल बोललं जात असताना या पहिल्या लाटेनेच आपल्या प्रत्येकाला कमी अधिक फरकाने त्रास दिला आहे. यात ज्येष्ठांना सुद्धा खूप त्रास झाला. मी इकडे प्रामुख्याने विविध कारणांमुळे एकटे राहणार्या जेष्ठांबद्दल बोलतेय. 

काही जेष्ठ जे हाती पायी active होते, त्यांनी हा काळ आपली तब्बेत सांभाळून कामं एक हाती करून तरून नेला. काही जेष्ठ कामाच्या बायकांवर अवलंबून होते. त्यांना खूप कष्ट पडले, कधी फक्त त्यांच्या करता मोलकरणी येऊ देण्याची परवानगी दिली गेली, कधी शेजार्यापाजार्यांनी त्यांच्या स्वैपाकपाण्याचा प्रश्न सोडवला, कधी अगदी अनोळखी लोकांनी सुद्धा जेवणाचे डबे घरपोच दिले. 

काही जेष्ठ अगदी नाष्ट्यासकट बाहेरच्या डब्यावर अवलंबून होते त्यांना ही जुलै मधला दुसरा लाॅकडाऊन जड गेला. काहींना तब्बेतीच्या तक्रारी होत्या पण दवाखान्यात जायची देखिल धास्ती वाटत होती. तब्बेत बिघडल्याने काहींचे याच काळात checkups अटळ झाले, आणि देवाचं नाव घेत त्यांनी ते उरकले. 

कधी साधीशी सर्दी झाली तरी छातीत धस्सं व्हायचं. कधी जोडप्यातील निरोगी व्यक्ती ला सर्दी झाली तर ती साधीच कि करोना ची हे कळेपर्यंत जोडप्यातील आजारी व्यक्तीला ती होऊ नये म्हणून धावपळ झाली. लांब जवळ असणार्या मुलांना देखिल हा काळ खूप मानसिक त्रासाचा गेला, कारणं काही असो आपण या काळात आई वडिलांची उत्तम बडदास्त ठेवण्यात कमी पडलो ही विवंचना त्यांना ही छळत राहिली. 

काही ज्येष्ठ मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे हिंडत फिरत होते. केवळ व्यायाम चुकवायचा नाही या हट्टापायी जनता curfew च्या दिवशी सुद्धा फिरून येणारे होते. घरी मुलं, नातवंड असताना देखिल दुकानांबाहेर लांबच लांब रांगांमधे उभं राहून पिशव्या भरभरून सामान आणत होते. मित्र मंडळ जमवून गप्पांचे फड भरवत होते. करोना ला आमंत्रणासाठी अगदी पायघड्या घालून देखिल लागण न झाल्याने त्यांच्यावर आणि अप्रत्यक्षपणे त्यांच्या घरच्यांवर ही नशिबाने कृपा केली. 

एकुणच या survival year मधे अनेक अनुभव घ्यायला मिळाले. तुमचे ही कडू गोड अनुभव ऐकायला आवडतील.