Wednesday, August 29, 2018

Introspection anyone

#introspectionanyone#

निकालाचा दिवस . नवीन भाषा थर्ड लँग्वेज म्हणून कुठली मिळाली हि सर्वांना उत्सुकता .

कुणाला जर्मन कुणाला संस्कृत कुणाला मराठी इत्यादी चर्चा रंगल्या . लगोलग शाळेच्या ग्रुप वर जर्मन क्लासेस  च्या जाहिराती आदळायला लागल्या .नवीन विषयाचा क्लास लावून पालक आता मोकळे होतील .

छान मार्क म्हणजे उत्तम क्लास . कमी मार्क म्हणजे भंगार टीचर .

त्याचे  फंडे 'क्लिअर 'आहेत .

एका ओळखीच्यांनी मुलाला कमी मार्क मिळाल्याचे खापर ट्युशन टीचर वर फोडले . का तर इतके पैसे भरून पदरात मार्क नाहीत म्हणजे काय ? अमुक एका क्लास च्या टीचर मार्कांची हमी देतात . चला धावा  तिकडे .
शाळाबाह्य उपक्रमांचे देखील तेच . एखाद्या खेळात किंवा कलेत आपले मूल प्रवीण असणे किंवा नसणे याला देखील बऱ्याचदा शिक्षक अथवा कोच लाच जबाबदार धरले जाते .
या सगळ्यात सोयीस्कर पणे विसरले जाते ते आत्मपरीक्षण . पालक म्हणून स्वतःचे आणि आपल्या पाल्याचे  .
सर्वात ढोबळ मानाने लावला जाणारा निकष म्हणजे आपल्यासारखेच आपले मूल  एखाद्या उपक्रमात निपजणे हा आग्रह . आपल्याला अनुकूल असे आपले गूण मुलात उतरले आहेत का नाही हे तपासून घ्यायला थोडा अवधी तरी हवा .
बरं आवड आहे , इच्छा आहे अमुक उपक्रम करण्याची तर अनुभव म्हणून करून पाहूदे , मजा घेउदे , जमल्यास नवीन शिकता येउदे . इतकी बेसिक उद्दिष्ट साध्य झाली तरी खूप झालं . पण छे , आपल्याला सगळ्यात अचिव्हर्स च हवेत . मार्कांची तर आहेच , ती कमी म्हणून आता उपक्रमां मध्ये देखील स्पर्धा चुरस हवीच . आपण हि उतरतो आणि मुलांना देखील उतरवतो . बरं अपेक्षित रिझल्ट मिळवण्यासाठी लागणाऱ्या परिश्रमांची तरी मुलांची मानसिकता आहे का ? आपली तर आहेच हो . पालक म्हणून आपली ध्येय तर आकाशालाच पोचली आहेत . पण मुलांचं काय ? आपण चारी ठाव खुराक देऊ , पोषक वातावरण देऊ , ने आण करू , थोडक्यात घोड्याला पाण्यापाशी नेऊ ....... ...... पण पाणी प्यायचं का नाही हे आपण नाही ना ठरवू शकत .

आपले मूल अभ्यासात सिन्सिअर नसेल , शाळेत ट्युशन ला टिवल्याबावल्या करत असेल , खेळाचा वर्कआउट मस्ती करत कोच ची बोलणी खात उरकत असेल , कलेत एकाग्र होत नसेल , कुठलीच स्वयंशिस्त ना पाळता जुलमाचा रामराम ठोकत असेल , उलट  या पैकी कुठलीच हयगय आपण मुळीच करत नाही , हे वर भासवत असेल आणि वरील कुठलीही शक्यता नाकारून  आपण डोळे झाकून मुलांचंच खरं मानून त्यांच्या कामगिरी चं खापर शिक्षक , कोच वरच फोडणार असू , तर आपण स्वतःलाच फसवत आहोत , नाही का ?

नुसतं क्लास बदलून , कोच बदलून मार्क , मेडल्स अथवा कुठलच प्राविण्य पदरात पडत नाही , हे आपल्याला कधी कळणार . बऱ्याचदा अंगभूत कौशल्य बाहेर व्यक्त व्हायला ठराविक काळ जाऊ द्यावा लागतो , या मधल्या काळात बरेचदा मुलांना आपोआप समज येते , शहाणपण येतं , वय मोठं होतं तसं शारीरिक मानसिक बळ देखील आपसूक वाढतं .
आणि अचानक एक दिवस आपल्याला अपेक्षित ते 'यश 'लक्खपणे समोर येऊन ठाकतं . पण त्यासाठी थोडं थांबायची , वाट पाहायची , योग्य वेळ येऊ देण्याची गरज असते . एखाद्या तळमळीच्या शिक्षका कडे आपल्या उतावीळपणामुळे हकनाक नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ शकतं याचं भान आपण ठेवलं पाहिजे .
या वर्षीच्या निकालातून आपण या गोष्टीची  थोडीफार  जाण ठेऊन वागू शकतोय का ते पाहूया .

Vay

स्थळ : रूपाली , पुणे

आज ब्रेकफास्ट ला रूपाली मधे नवर्याला एक अजब अनुभव आला. नवरा आणि दोन मित्र बसलेले असताना एक मध्यमवयीन गृहस्थ त्यांच्या टेबलापाशी आले , स्वतःची ओळख सांगितली, आणि त्याच टेबलाच्या एका रिकाम्या खुर्ची वर बसू का अशी विचारणा केली.
अशा वेळी साधारण पणे सभ्य सहृदय माणसं वागतात तसेच वागून या मंडळींनी त्यांना बसा असे सांगितले आणि पुढचा पूर्ण वेळ झक्क मारली आणि बसा म्हटलं असं म्हणायची वेळ त्या गृहस्थांनी आणली.
मित्र त्यांचं त्यांचं बोलत होते.....
या गृहस्थांनी 2 पुस्तकं टेबलावर काढली आणि मधेच बोलू लागले. ' मी अमूक इतकी पुस्तकं लिहिली आहेत, अमूक इतकी वर्ष मी स्तंभलेखक होतो, परीक्षणं लिहितो वगैरे वगैरे सांगू लागले.
त्यांनी बरोबर आणलेली पुस्तके या मंडळींना दिली. इथपर्यंत सुद्धा ठीक होतं.
पुन्हा मित्रमंडळी आपल्या विषयांकडे वळली तरी हे महाशय गप्प बसायचं नाव घेईनात. जो विषय निघेल त्यात ते घुसून आपले मुद्दे मांडू लागले.
त्यांनी बोलण्याच्या ओघात ज्या आजूबाजूच्या टेबलांकडे कटाक्ष टाकला आणि ओळख दाखवायचा प्रयत्न केला त्या सर्व सदस्यांनी त्यांच्याकडे बघितलं न बघितल्यासारखं केलं. 
वेटर जाता येता कपाळावर आठी पाडून घेत होता.
म्हणजे एकूण प्रकरण नेहमीचं होतं. पण आज यांच्या वाट्याला आलं होतं हे या मित्रांनी ताडलं. मित्र ही खरंतर रूपाली चे रेग्युलर्स होते पण आज बकरे बनायची पाळी यांची होती.
कसंबसं खाणं आणि बोलणं आवरतं घेऊन मंडळी ऊठून चालती झाली.
इतक्या लवकर ब्रेकफास्ट भेट आटपून गडी घरी हजर म्हटल्यावर मीही चाट.
हे सगळं गम्मत म्हणून सांगायला आणि सोडून द्यायला ठीकच आहे पण यातून टेक होम धडा इतकाच ( टीचर झाल्यापासून हे असं होतं.....moral of the story  सांगायची वाईट सवय लागलीय ) ..........
आत्ता शी  साठीच्या वयात असताना या गृहस्थांचं तारतम्य सुटत चाललंय, दुसरं बालपण चालू झाल्याच्या या खुणा ते ओळखू शकत नाहियेत, असं जाहीर हसं व्हायची वेळ आपल्यावर आपण ओढवून घेत आहोत हेही कदाचित त्यांना समजत नाहिये, या सगळ्या मागे कदाचित अचानक कमी झालेली क्रियाशीलता, निवृत्ती चं ठोस नियोजन नसणं , किंवा इतर अनेक मानसिक , सामाजिक कारणं असतील.......
आपल्यावर ही वेळ येणारच नाही हे म्हणणं हा निव्वळ माज आहे. हे होऊ नये म्हणून आपल्या हातात असतील त्या उपाययोजना आपणं करत आहोत ना हे ठणकवून स्वतःला अधनंमधनं विचारलं तरी बास झालं.

Wednesday, July 4, 2018

navat kay ahe

#नावातकायआहे#

हीच तिची पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया होती . जेव्हा नवऱ्याने त्याचा मानस तिला बोलून दाखवला होता . आपल्या धाकट्या अपत्याचे लेकीचे नाव बदलण्याचा ..... म्हणजे तिच्या नावातील वडील म्हणून आपले असलेले नाव काढून , आई म्हणून बायकोचे नाव घालण्याचा . आई म्हणून नुसते कर्तव्या पुरते , लाडापुरते नाही , तर दोन मुलां पैकी एकाच्या नावाशी कागदोपत्री देखील आईचे नाव जोडले जावे हा त्याचा सरळ साधा हेतू .

आता नवऱ्याचा सरळ साधा हेतू बायकोच्या सहजासहजी पचनी पडला तर कसं चालेल ? तिला असंख्य प्रश्न पडले . मुळात आत्ता हे करायची काही गरज आहे का ? त्यामुळे काही प्रॉब्लेम आला तर ? लेकीच्या पुढील कागदपत्रांमध्ये काही अडचण अली तर ? त्याचं उत्तर तयार होतं - पुढे अडचण येऊ नये म्हणून हीच योग्य वेळ आहे . ती म्हणाली - उद्या लग्न झाल्यावर आपलं आडनाव तरी लेक पुढे लावणार आहे का हे कुठे नक्की आहे ?
आडनावाचाच भरोसा नाही तर माझं नाव जोडलेलं राहील याची काय शाश्वती ? यावर तो म्हणाला - लगेच १० वर्षात तिचं लग्न लावणार आहोत का आपण ? पुढचं पुढे बघू . हि लगेच म्हणाली - मग लेकाचं का नको ?
त्याचं हि बरोबर होतं - त्याच्या स्कूल लिविंग आणि मार्कशीट वर  आधीच माझं नाव आलंय . त्या पेक्षा लेकीचं बदलणं सोपं आहे .

मग तिने  ब्रम्हास्त्र काढलं . तुझ्या लेकीला चालणार आहे का विचार आधी . नाही  म्हटलं तरी तो हि गडबडलाच . लेकीला एव्हाना स्वतःची मतं आहेत हे तो चांगलंच जाणून होता . लेकीसमोर हा  विषय काढताच अपेक्षित रिऍक्शन आली - हे काय ...... नाव का बदलायचं ? मला सवय झाली आहे याच नावाची , मी एकटीच शाळेत आणि बाकी सगळीकडे ऑड मॅन आऊट होईन , मग सगळे काय म्हणतील वगैरे प्रश्नांच्या फैरी झडल्या .

बायको गालातल्या गालात हसत होती . त्याने काही दिवस जाऊ दिले . थोडे लेकीच्या कलाने वागून घेतले .   लेकीने हि संधी ओळखून वरचेवर काही दिवस बाहेरून पार्सल ऑर्डर्स मागवून घेतली . पुन्हा हा विषय लेकीसमोर काढल्यावर ती परत आपल्या मागच्याच भूमिकेवर ठाम . ती बधायला तयार नाही म्हटल्यावर त्याने त्वरित खिसा आवरता घेतला आणि आपला पवित्रा  बदलायचे ठरवले .  लेकीला  समज तशी चांगली होती , हे तो जाणून होता . त्यामुळे आता सरळ तिच्याशी आपली या विषया  मागची भावना शेअर करायचे त्याने नक्की केले .
या शेअरिंग चा मात्र हवा तो परिणाम झाला आणि लेक तयार झाली.

आता त्याने मैदानच मारले म्हटल्यावर बायको ला नवीन काही मुद्दे उरलेच नाहीत . लगोलग तो कामाला लागला , आवश्यक ती तजवीज केली , आणि मनात आलेला विचार कृतीत उतरवला . इतके दिवस काथ्याकूट करता करता वारंवार कानावर पडत असलेले नवीन नाव एव्हाना घरात सर्वांच्याच सवयीचे झाले . त्यामुळे त्यातील वेगळेपणाचा अंश तर गेलाच , आणि त्या जागी नव्या बदलांची नांदी आणणारे कर्त्या पुरुषाचे वेगळे विचार लक्खपणे समोर आले .
Savni Meenal Deosthale  






Friday, June 15, 2018

#tedhahainparmerahain#

#टेढ़ा हैं पर मेरा हैं#

तुझ्याकडे काय 'गुण 'आहेत म्हणून तू व्यवसाय करायचं ठरवलंस  ?
व्यावसायिक म्हणवून घ्यायचं असेल तर नुसतं -
डिस्टिंक्शन ने डिग्री मिळवून थोडंच भागतं ? इमाने इतबारे नोकरीची उमेदवारी करून सर्व प्रकारच्या कामाचा रग्गड अनुभव गाठीशी असून थोडंच भागतं ?
स्वभावाचं काय ? पैशासारखा त्याचा देखील आव आणता येत नाही .
तुझा सरळमार्गी स्वछ रोकठोक स्वभाव इथे काय कामाचा ?
इथे हवी गोड बोलून अलगद गळा कापायची वृत्ती . तत्व - बित्व गुंडाळून समोरच्याला ( त्याला कळू न देता ) जास्तीत जास्त गंडवायची 'हुशारी ' .
तुझं काय चालू असतं भलतंच ? परोपकारी गंपू च कि नाही तू . धावून धावून दुसऱ्याची सोय आधी पाहणाऱ्याला 'नफेखोरी 'कशाशी खातात हे कसं कळणार ?
बरं हे कमी म्हणून कि काय ....... ती गेंड्याची कातडी किंवा मगरीचे अश्रू का काय म्हणतात ती साधनं सुद्धा तू बाळगत नाहीस .
दुसऱ्याचं दुःख पाहून जीव कळवळतो तसंच समोरच्याने केलेला वार देखील जिव्हारी लावून घेतोस . म्हणजे आणखी दुष्काळात तेरावा महिना .
न तुला दर तीन वर्षांनी कार ची मॉडेल्स 'बदलता ' आली , न स्वतःला किंवा फॅमिली ला दर वर्षी फॉरेन टूर 'घडवता ' आली . हो एक फार्महाउस तेवढं बांधलस , पण ते देखील चैनी पेक्षा मित्रांच्या सहवासाच्या ओढीनं .
हो....... शांत झोपेची श्रीमंती मात्र तुझ्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही .
तरी मी तुला सारखी म्हणत असते  .... ...... ....... ........
"दुनिया ने कितना समझाया , कौन हैं अपना कौन पराया ,
फिर भी दिल की चोट छुपाकर , हम ने आपका दिल बहलाया ,
खुद ही मर मिटने की ये ज़िद हैं हमारी ............
सच हैं दुनियावालों के हम हैं अनाड़ी "
या ओळी तुला चपखल बसतात . असो.
सरळमार्गी पिंड आणि संवेदनशील मन हा डेडली कॉम्बो असलेलं दान ( कि ध्यान ?) देवाने माझ्या पदरात घातलंय . त्याच्या दुर्लभतेची जाण आणि अपूर्वाई जगाला नसली तरी मला आहे .
 त्या पायी अधे मध्ये तुझी पंचिंग बॅग होणं , empathiser होणं , आणि सतत तुझं मोराल बूस्ट करत राहणं एवढच माझ्या  हातात आहे . माझ्यात क्षमता असल्याशिवाय मी ह्या रोल मध्ये आलेच नसते हा विश्वास मला आहे .
कधी परखड मत व्यक्त करेन ......
कधी काळजीने अर्धमेली होईन......
कधी ' आता काय करू मी या माणसाचं ' या टोकाला पण जाईन.....
पण शेवटी दर वेळी ...... समजून हि मीच घेईन .





Saturday, May 19, 2018

Mother's day

#Mother'sday#

माझा  आणि सावनी चा एक आवडता जोक आहे . तिला मी सांगितलेली एखादी गोष्ट आतून पटली असेल , पण निव्वळ हट्टापोटी तिला त्या क्षणी बरोबर उलट वागायचं असेल तर माझी  ठरलेली रिऍक्शन असते "ठीक आहे , आता सोप्पं झालं मला , सोडून देते आता मी 'मदर ड्यूटी' करणं , तुला हवं तसं वागायला तू मोकळी आहेस ."
माझ्या शिस्तीपेक्षा माझा हा स्टॅन्ड तिला जास्त झोंबतो . मी शिस्त लावणं थांबवणं म्हणजे तिला एका प्रकारे वाऱ्यावर सोडून देण्यासारखं आहे असं तिला कुठेतरी वाटतं , आणि ती माझं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत येते . आता मोठी होतेय तसतसे या माझ्या म्हणण्यातला  फोलपणा तिच्या लक्षात येतोय  . त्यामुळे आता ती मला सांगते, "लगेच मदर ड्युटी सोडायची धमकी देऊ नकोस , "आणि या माझ्या कालबाह्य झालेल्या आयडिया वर आम्ही दोघी मनसोक्त हसतो.

मदर ड्युटी किंवा आईपण . काय काय येत नाही त्यात ? अपत्य जन्मल्या पासून त्याच्या खायच्या प्यायच्या वेळा सांभाळणं हे सगळ्यात आधी  सुरु होतं . स्वतः पलीकडे जाऊन दुसऱ्या एका जीवाला खाऊ पिऊ घालायची जबाबदारी करणारी प्रत्येक व्यक्ती हि मदर ड्युटी करत असते . त्या पाठोपाठ येते एका दुसऱ्या जीवाची स्वच्छता . आपले शरीर धर्म स्वतः सांभाळायची क्षमता येईपर्यंत केले जाणारे कर्तव्य हि देखील मदर ड्युटी . त्या खालोखाल पहिली जाते ती आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांची सुरक्षितता .

या सर्व झाल्या बेसिक जबाबदाऱ्या . काम नेमून दिलेली एखादी पगारी व्यक्ती देखील वेळे प्रसंगी या जबाबदाऱ्या पार पडू शकते .  या व्यतिरिक्त काही संस्कार , थोडी शिस्त , वागण्याचे नीती नियम मुद्दाम आपल्या पाल्या  मध्ये रुजवावे लागतात . चांगलं चुंगलं खाऊन , नीट नेटकं राहून सर्व सुखं पायाशी देऊन  मुलं कोड कौतुकात आपसूक वाढतात , पण ती उत्तम नागरिक आपोआप होत नाहीत . मैत्रीभाव जपणे  , मिळून मिसळून वावरणे , खरे बोलणे आणि वागणे , दुसऱ्याचे चांगले स्वीकारणे , असे समाजात वावरताना लागणारे बहू उपयुक्त गुण आपल्या पाल्याच्या अंगी बाणवणे हि एक आद्य मदर ड्युटी आहे .
आपल्या पाल्याच्या मागे खंबीरपणे पालकांनी उभं असणं , हे अगदी स्वाभाविक आहे . पण याची  गल्लत आपण त्यांच्या चुकांवर पांघरून घालून करत असू , तर हा आपला सर्वात मोठा प्रमाद ठरेल .
लालयेत पंच वर्षाणि , दश वर्षाणि ताडयेत
प्राप्तेषु षोडशे वर्षे , पुत्रं मित्रवदाचरेत
हे उगाच नाही आपल्या कानांवर पडत आले .
समवयस्कांसोबत वावरताना मुलांच्या भांडणं तक्रारीं मध्ये वारंवार आपल्या पाल्याकडे बोट दाखवलं जात असेल , शाळेत , घरात , भावंडात , शेजारी पाजारी सगळीकडून आपल्या पाल्याच्या वर्तवणुकीबद्दल उलट सुलट बोललं जात असेल , तर आपण पालक म्हणून तो लाल बावटा किंवा धोक्याची घंटा समजून सावध होणं हे देखील आपलं आद्य कर्तव्य आहे . त्यात कमीपणा वाटून , तसं काही नाहीच आहे , मुले मुद्दाम आपल्या बाब्या/बबडी  ला एकटं पाडतात  , त्याला उद्युक्त करतात , सगळं जग खोटं आणि आपला बाब्या / बबडी तेवढे  खरे  .......
या गैरसमजुतीची झापडं लावून पालकांनी वागणं या सारखी अक्षम्य चूक नाही .
चूक ती चूकच . ती तिथल्या तिथे दुरुस्त करणे व त्यातून आपल्या पाल्याला योग्य धडा घ्यायला लावणे हे प्रसंगी कोड कौतुक पेक्षा देखील जास्त मोलाचे आहे . आपल्या लाडाने त्यांचं बालपण रम्य होतं , पण हि शिस्तीची शिदोरी त्यांना जन्मभर पुरणारी आहे . पुढे अनेक मोहाच्या आणि इतर कसोटी पाहणाऱ्या क्षणी हि शिदोरी च त्यांच्या कामी येणार आहे . आपल्या व्यतिरिक्त त्यांनी जोडलेल्या इतर नातेसंबंधात हीच शिदोरी त्यांना योग्य वर्तवणुकीची दिशा दाखवेल .
शेवटी आपले मूल  हे आपलेच प्रतिबिंब असते . एखाद्या पाल्याच्या वर्तवणुकीतून त्याच्या पालकांच्या व्यक्तिमत्वाचा ढोबळ अंदाज बांधणं अजिबात कठीण नाही .
पानात भरमसाठ अन्न टाकणारी , श्वास घ्यावा इतक्या सहजतेनं खोटं बोलणारी , कोणी तक्रार केली कि निष्पापप चेहरा करून आपण तसे वागलोच नाही हे बेमालूमपणे सांगणारी मुले पाहण्यात आली .......
तर आपण पालकांनबद्दल बांधलेले अंदाज सहसा खोटे ठरत नाहीत .
तर लेखाचा उद्देश हा कि जन्म देणं हे आई होण्यामधलं सर्वात सोप्पं काम आहे . त्या पुढे आयुष्यभर ते आईपण निभावणं , त्यासाठी स्वतःच्या सवयींना मुरड घालणं , आणि सतत आपल्याला कोणी तरी बेमालूमपणे फॉलो करत आहे  या जाणिवेतून कमीत कमी चुका करत पालकत्व पार पाडणं हि आयुष्यभराची तपश्चर्या आहे.






Friday, April 27, 2018

Introspection

#introspectionanyone#

निकालाचा दिवस . नवीन भाषा थर्ड लँग्वेज म्हणून कुठली मिळाली हि सर्वांना उत्सुकता .
कुणाला जर्मन कुणाला संस्कृत कुणाला मराठी इत्यादी चर्चा रंगल्या . लगोलग शाळेच्या ग्रुप वर जर्मन क्लासेस  च्या जाहिराती आदळायला लागल्या .नवीन विषयाचा क्लास लावून पालक आता मोकळे होतील .
 छान मार्क म्हणजे उत्तम क्लास . कमी मार्क म्हणजे भंगार टीचर .
 त्याचे  फंडे 'क्लिअर 'आहेत .
 एका ओळखीच्यांनी मुलाला कमी मार्क मिळाल्याचे खापर ट्युशन टीचर वर फोडले . का तर इतके पैसे भरून पदरात मार्क नाहीत म्हणजे काय ? अमुक एका क्लास च्या टीचर मार्कांची हमी देतात . चला धावा  तिकडे .
शाळाबाह्य उपक्रमांचे देखील तेच . एखाद्या खेळात किंवा कलेत आपले मूल प्रवीण असणे किंवा नसणे याला देखील बऱ्याचदा शिक्षक अथवा कोच लाच जबाबदार धरले जाते .
या सगळ्यात सोयीस्कर पणे विसरले जाते ते आत्मपरीक्षण . पालक म्हणून स्वतःचे आणि आपल्या पाल्याचे  .
सर्वात ढोबळ मानाने लावला जाणारा निकष म्हणजे आपल्यासारखेच आपले मूल  एखाद्या उपक्रमात निपजणे हा आग्रह . आपल्याला अनुकूल असे आपले गूण मुलात उतरले आहेत का नाही हे तपासून घ्यायला थोडा अवधी तरी हवा .
बरं आवड आहे , इच्छा आहे अमुक उपक्रम करण्याची तर अनुभव म्हणून करून पाहूदे , मजा घेउदे , जमल्यास नवीन शिकता येउदे . इतकी बेसिक उद्दिष्ट साध्य झाली तरी खूप झालं . पण छे , आपल्याला सगळ्यात अचिव्हर्स च हवेत . मार्कांची तर आहेच , ती कमी म्हणून आता उपक्रमां मध्ये देखील स्पर्धा चुरस हवीच . आपण हि उतरतो आणि मुलांना देखील उतरवतो . बरं अपेक्षित रिझल्ट मिळवण्यासाठी लागणाऱ्या परिश्रमांची तरी मुलांची मानसिकता आहे का ? आपली तर आहेच हो . पालक म्हणून आपली ध्येय तर आकाशालाच पोचली आहेत . पण मुलांचं काय ? आपण चारी ठाव खुराक देऊ , पोषक वातावरण देऊ , ने आण करू , थोडक्यात घोड्याला पाण्यापाशी नेऊ ....... ...... पण पाणी प्यायचं का नाही हे आपण नाही ना ठरवू शकत .

आपले मूल अभ्यासात सिन्सिअर नसेल , शाळेत ट्युशन ला टिवल्याबावल्या करत असेल , खेळाचा वर्कआउट मस्ती करत कोच ची बोलणी खात उरकत असेल , कलेत एकाग्र होत नसेल , कुठलीच स्वयंशिस्त ना पाळता जुलमाचा रामराम ठोकत असेल , उलट  या पैकी कुठलीच हयगय आपण मुळीच करत नाही , हे वर भासवत असेल आणि वरील कुठलीही शक्यता नाकारून  आपण डोळे झाकून मुलांचंच खरं मानून त्यांच्या कामगिरी चं खापर शिक्षक , कोच वरच फोडणार असू , तर आपण स्वतःलाच फसवत आहोत , नाही का ?
नुसतं क्लास बदलून , कोच बदलून मार्क , मेडल्स अथवा कुठलच प्राविण्य पदरात पडत नाही , हे आपल्याला कधी कळणार . बऱ्याचदा अंगभूत कौशल्य बाहेर व्यक्त व्हायला ठराविक काळ जाऊ द्यावा लागतो , या मधल्या काळात बरेचदा मुलांना आपोआप समज येते , शहाणपण येतं , वय मोठं होतं तसं शारीरिक मानसिक बळ देखील आपसूक वाढतं .
आणि अचानक एक दिवस आपल्याला अपेक्षित ते 'यश 'लक्खपणे समोर येऊन ठाकतं . पण त्यासाठी थोडं थांबायची , वाट पाहायची , योग्य वेळ येऊ देण्याची गरज असते . एखाद्या तळमळीच्या शिक्षिका कडे आपल्या उतावीळपणामुळे हकनाक नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ शकतं याचं भान आपण ठेवलं पाहिजे .
या वर्षीच्या निकालातून आपण या गोष्टीची  थोडीफार  जाण ठेऊन वागू शकतोय का ते पाहूया . 

Thursday, March 22, 2018

Lingering faces

#lingering faces


कामावर जाणारी आई नेहमी धास्तावलेली असते .
कितीही चोख व्यवस्था केली , तरी तिच्या मनात मुलांच्या सुरक्षिततेची धाकधूक असतेच .

 हि धाकधूक कुठल्याही स्तरातील आई ला चुकत नाही , याचा एक हृद्य प्रत्यय नुकताच आला .

स्थळ होतं मुंबईतील एक अद्ययावत बँक्वेट  हॉल . निमित्त होतं तिथे पार पडलेलं एक कौटुंबिक लग्न कार्य .
दोन दिवस त्या कार्याकरिता लग्नघराकडून  बुकिंग झालं होतं .

हॉल च्या लेडीज वॉशरूम मध्ये २ संध्याकाळी मला विलक्षण दृश्य पाहायला मिळालं .
वॉशरूम ची एकमेव लेडीज अटेंडंट आपल्या ७/८ वर्ष्यांच्या मुलाला बरोबर घेऊन ड्युटी वर येत असे आणि वॉशरूम अटेंड करत असे . तिची ड्युटी बहुदा २ऱ्या शिफ्ट मध्ये असावी . पूर्ण संध्याकाळ ती व तिचा लेक वॉशरूम मध्ये बसून असत .

एरवी आपल्या डोळ्यांना लेडीज अटेंडंट ची उपथिती बोचा यचं काही कारण च नाही . किंबहुना ते आपल्या अंगवळणी पडलेलं असतं . वॉशरूम ची चकचकीत स्वच्छता त्यांच्या उपस्थितीने अधोरेखित च होत असते .

 पण या वेळी हे माय लेक पाहून आत कुठेतरी चर्र होत होतं .

पूर्ण २ संध्याकाळ जवळपास ६ ते रात्री १० आमचा त्या हॉल मध्ये वावर होता . अधून मधून  २/३ दा  तरी त्या वॉशरूम मध्ये चक्कर टाकायला लागत होती .
 दर वेळी आत गेल्यावर ते छोटुकलं लुकलुकत्या नजरेनं आल्या गेल्या कडे बघत बसे . तोच त्याचा विरंगुळा . वॉशबेसिन च्या लांबलचक कठड्यावरच्या एका कोपऱ्यात शांत  बसून त्याचं  निरीक्षण चालू असे .
ते त्याचं शांत बसणं ,..... ......
 दार ढकलून कुणी आत आलं ,
 कि नवं खेळणं मिळाल्यागत त्याच्या चेहऱ्यावरची रेष बदलणं ... ..... .
 आतल्या आत कालवाकालव करून जात असे .

एका खेपेला माझा आई ला वॉशरूम मध्ये सोबत करायला गेले . त्या वेळी आईने तिची कवळी तोंडातून काढली ,  बेसिन मध्ये नळाखाली धुतली व परत तोंडात बसवली .
अशी विलक्षण गम्मत त्या छोट्याने बहुदा पहिल्यांदाच पहिली असणार . अतिशय आश्चर्याने त्याने आपल्या आईशी त्या बाबतीत केलेले हितगुज पाहून आम्ही त्याला हसून पोच दिली . त्यावर भयंकर कॉन्शस होऊन अशक्य लाजला तो छोटू .

अश्या कित्येक संध्याकाळी ते पोरगं आईच्या ड्युटी च्या या जागेवर घालवत असेल . त्याच्या कित्येक बालसुलभ क्रिया संध्याकाळी मोकळ्या हवेत खेळण्या बागडण्या ऐवजी या बंदिस्त जागेत विरून जात असतील .

निम्न स्तरातील असून देखील त्याच्या सजग आईच्या दक्षतेचं कौतुक करावं कि तिच्या हतबलतेची कीव करावी हे मात्र न सुटलेलं कोडं आहे .