Sunday, April 14, 2019

Nuisance value

डेक्कन जिमखान्यावर सध्या नवीन रुजु झालेले सिक्यूरिटी गार्ड हा आम्हा आयांचा हिरीरीने चघळण्याचा विषय आहे.
हे काका आल्या गेल्या प्रत्येकाला काही ना काही कारण  काढून धारेवर धरतात. आमच्या 5 वर्षांच्या सोडण्या , थांबण्या, आणण्याच्या रूटीन मध्ये आम्ही गेट वर एन्ट्री घेताना कार्ड लावतो मग कधी कार्ड स्वतःजवळ कधी मुलांच्या बॅगेत असं करतो. कधी मुलांना ग्राऊंड वर गेट पाशी सोडून बाहेरची कामे करून येतो, कधी तिथेच कट्ट्यावर बसतो.
या काकांना कार्ड मुलांकडे देऊन आया बाहेर गेलेल्या चालत नाहीत. आयांनी कार्ड आपल्याकडे ठेवावं असा त्यांचा आग्रह असतो. सावनी ला सोडून तडक एरोबिक्स ची वेळ गाठायला मला रोज उशीर होतो कारण दोन्ही वेळा क्लॅश होतात. त्यात स्कूटर पार्क करून तिला गेट वर कार्ड लावून आत सोडून तिच्याकडून ते कार्ड माझ्याकडे घेऊन परत स्कूटर पाशी येऊन मग पुढे जिम ला निघणं या सगळ्याला खरोखर वेळ नसतो. त्यामुळे मी कार्ड तिलाच देते, ती उतरल्यावर मी तशीच गाडी वळवते आणि जिम गाठते. त्यावरून  ते काका रोज कटकट करतात. इतकी की इरीटेट व्हायला होतं. सगळ्या आयांना थोड्या फार फरकाने हाच अनुभव आलाय. त्यामुळे मीच काय तो कर्तव्यदक्ष हा त्यांचा अॅटिट्यूड सगळ्यांच्या डोक्यात जातोय.
असे दोन तीन प्रसंग घडल्यावर एक दिवस ग्राऊंड ला जाताना मी सावनी ला म्हणाले कि आज जर तो मला परत नडला तर मी त्याची कंपलेंट करेन किंवा भांडेन त्याच्याशी.
सावनी मला शांत करत म्हणाली कि नको अगं भांडू वगैरे त्याच्याशी.
तिची हे सांगण्यामागची काळजी मला लगेच कळली. कारण रोड रेज हा अतिशय संतापजनक अनुभव आपण सर्वच रोजच्या धकाधकीत घेत असतो आणि आपणच आपल्या मुलांना त्याबद्दल हेही सांगितलेलं असतं कि ट्रॅफिक चे नियम वाकवणारे मुजोर असतात, आपल्या सारख्यांनी त्यांच्या नादी लागायचं नसतं. असाच काहीसा धोका तिला जाणवला आणि तिने मला भांडू नको म्हणून सांगितलं.
त्यावर मी तिला जे ऊत्तर दिलं ते देतादेताच मला माझ्या विचार आणि आचरणातला फोलपणा जाणवला आणि मी भांडणाचा विचार सोडून दिला.
मी तिला म्हणाले , अगं घाबरू नकोस चांगला कामधंदा करणारी, स्वतःचं कमवून स्वाभिमानानं जगणार्या माणसांपैकी आहेत ते सिक्यूरिटी काका, त्यांच्याशी भांडणं बिल्कुल डेंजरस नाही.
..........................................................

हे बोलता बोलताच मला बापाचा रस्ता आणि बापाची गाडी समजून बुंगाट जाणार्यांपुढे नांगी टाकलेली मी, जिथे जिथे पैसा आणि सत्ता मुजोरपणे एकवटली आहे त्या सर्वांपुढे हतबल झालेली मी, काहीच करू न शकणारी मी दिसू लागले.
जिथे खरोखर बोलायला हवंय अश्या आजूबाजूला घडणार्या घडामोडींवर केवळ आपल्या जिवाला घाबरून चूप बसणार्या मला हे काका नक्की धोकादायक नाहीत हे माहीत असल्यामुळे बोलायला एवढा चेव यावा याची खरंच लाज वाटली.
असं अनेकदा नकळत आपण आपल्या जवळच्या माणसांच्या बाबतीत करतो नाही का?
ती आपलीच असतात गृहीत धरावीत अशी, गेला एखादा शब्द ऊणा अधिक तोंडातून तर काय त्याचं एवढं?
आपलं मन किती साफ आहे हे जोवर आपले शब्द ग्वाही देत नाहीत तोवर ते आपल्या माणसांना कसे पटतील हा विचार आपल्याला शिवत नाही.
तेच तिर्हाईतासमोर आपण असतील नसतील ते मॅनर्स वापरायचा सपाटा लावतो आणि सौजन्याचा कळस गाठतो.

मला जो विचार काकांच्या बाबतीत जाणवला हाच विचार समोरचा आपल्या बाबतीत करेल याची  अपेक्षा करणं चूकच नाही का?
मी सतत एखाद्यासाठी डाफरायला ईझी आणि निरूपद्रवी टारगेट  बनत असेन तेव्हा तो, आपण ऊपद्रव मूल्य बाळगणार्या वर कसे रियॅक्ट होतो हे तपासून बघण्याचं औदार्य दाखवेल तो सुदीन.

Shala

#मज_आवडते_हि_मनापासूनी_शाळा#

लेक : " आई , काल आपल्याला त्या आजी भेटल्या बघ रस्त्यात ?"
आई : "  हो, त्या !.... काय त्यांचं ?"
लेक : " त्या काहीतरी सांगत होत्या त्यांच्या नाती बद्दल, कि ती शाळेत जात नाही, काय भारी ना?"
आई : " हम्म , आहे खरं भारी. " " तिला तिचे आई बाबा घरी शिकवतात . होम स्कुलिंग  म्हणतात याला. "
लेक : " म्हणजे? अभ्यासातून सुटका नाहीच? शी !!! मग काय मजा?"
आई : " अगं , थोडीफार सुटका, पूर्ण नाही काही, म्हणजे तुमच्या सारखी फिक्स शाळेची वेळ नाही, होमवर्क नाही, ठराविक ७/८ विषय ठराविक वर्षी, त्याची कंपलसरी परीक्षा असं  सगळं नाही .
तिचे आई बाबा आणि ती मिळून तिला हवा तो विषय, त्याची हवी ती, झेपेल ती  लेव्हल निवडतात, त्याची तयारी करतात आणि त्यावर परीक्षा देते ती ."
लेक : " ओके , ते बरंय , पण शाळा नाही म्हणजे दिवसभर घरीच असणार ती, बोअर नसेल होत का तिला? "
आई : " काय माहित? तिला लौकर उठून, शाळेत ५ तास बसून, घरी आल्यावर होमवर्क मग ट्युशन या सगळ्यापेक्षा घरी बरं वाटत असेल. "
लेक : " अगं पण मैत्रिणी भेटणार नाहीत, स्कुल च्या , ट्युशन च्या, शाळेत किती मजा असते माहीतच नाही तिला"
आई : " हो का?"
लेक : " मग काय, आल्या आल्या किती सांगायचं असतं मला ,आज काय  झालं शाळेत ते , रिया  ने काय नवीन तारे तोडले,  विश्वजित ने व्हॅन मध्ये कोणता नवीन शब्द सांगितला आणि मी आणि अजून  दोघी सोडून सगळे कसे फिदी फिदी त्यावर हसले, टीचर शी आज माझ्या कोणत्या गप्पा रंगल्या !
आई : " हो माहितेय, काल त्या  म्युसिक टीचर  ना रिटायरमेंट नंतर आजोबांच्या ग्रुप मध्ये गायला  या सांगितलंस ते."
लेक : " आणि आमच्या फेवरीट टीचर्स रोज भेटणार नाहीत हि आयडिया तर खूपच  हॉरिबल आहे. मोनिशा मॅम च्य पाया पडल्याशिवाय मी कुठल्याच स्पर्धेत उतरत नाही, माहितेय ना तुला ?  आणि व्हॉट अबाउट गॅदरिंग आणि स्पोर्ट्स? त्या शिवाय कशी राहू शकते ती? "

चला........ म्हणजे फार काही अन्याय वगैरे करत नाही आहोत आपण मुलांवर, असं एकूणच जाणवून आईने परत एकदा स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतली आणि उद्याच्या शाळेच्या डब्याच्या तयारीला लागली.

KehnekoBahutkuchtha

#केहनेको_बहोत_कुछ_था#

कुणीतरी विचारलं कि बऱ्याच दिवसात नवीन काही लिहिलं नाहीस का बरं ?
खरंच, विषय संपले , शब्द गोठले कि जी अल्प  प्रतिभा होती ती आटली ?

प्रतिभा म्हणा किंवा उर्मी म्हणा ती आत धगधगत असतेच . विषय तर  रोज हरघडी आदळत असतात . एखाददुसरी विशेष घटना घडताच त्यातले एक एक पदर बाजूला सारत त्यातील अनेक कंगोरे , सूक्ष्म धागेदोरे लक्ख सामोरे येत राहतात .
हो , शब्द मात्र  अशावेळी हमखास गोठतात .
कधी त्यावर वाढीव जबाबदारीचा दबाव पडतो म्हणून किंवा अजून कशाने पण शब्द फुटेनासे होतात खरे .

आपण स्वस्थ नसतोच आतून , खूप काही घडत असताना आपली कामे यांत्रिक पणे होत राहतात , पण डोक्यात विचारांचा उद्रेक चालूच असतो एकीकडे . मग सावकाश वेळ मिळतो , सगळ्या कल्लोळाकडे तटस्थ पणे बघत असताना , विचारांचा गुंता सोडवत असताना , एकेका घटनेचे अवलोकन करत  असताना चित्र सुस्पष्ट होत जातं , पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील मिळालेली असतात , पण हात मात्र थबकलेलेच राहतात .
लिहावं कि न लिहावं या द्वंद्वात अडकून पडलेले असतात .

घडामोडीं चा वेग इतका प्रचंड असतो कि त्या सोबत लोकांच्या प्रतिक्रिया , सवयी , सल्ले सर्व झेलता झेलता प्रचंड मानसिक थकवा जाणवतो पण काही केल्या लेखणीत मात्र उतरत नाही . ज्या लेखणीमुळे मन मोकळं होतं त्याच लेखणी मुळे आपल्या माणसांबद्दल आजवर वाटलेली काळजी , तळमळ , त्या साठी केलेले निस्पृह प्रयत्न एका क्षणात मातीमोल ठरू शकतात .

"केहनेको बहोत कुछ  था अगर केहने पे आते 
दुनिया कि इनायत हैं के हम कुछ नहीं केहते
कुछ केहने पे तूफ़ान उठा लेती हैं दुनिया
अब इसपे  कयामत हैं के हम कुछ नहीं केहते
उनको ये शिकायत हैं के हम कुछ नहीं केहते "

- मीनल 

Sunday, March 17, 2019

एका नाटकाची गोष्ट

#एका नाटकाची गोष्ट #
" कोणतं माध्यम तुम्हाला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटतं ?" नट - नट्यांना हा ठरलेला प्रश्न विचारला जातो. आणि त्यावर त्यांचं ठरलेलं उत्तर असतं ते म्हणजे - नाटक . खरोखर नाटक या माध्यमाची नशाच वेगळी . कुठलंही  रंगमंचीय सादरीकरण हे सादर करणाऱ्याला किंवा पाहणाऱ्याला विलक्षण भारावून टाकतं .
निवेदक या भूमिकेतून ऑन स्टेज माझा अल्प सहभाग झाला असला तरी ऑफ स्टेज काम करण्याचा नुकताच एक रोमांचकारी अनुभव मला घेता आला . निमित्त होतं , स्पोकन इंग्लिश टीचर या नात्याने अंगावर आलेली एक जबाबदारी , ती म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलना प्रित्यर्थ  इयत्ता १ ली आणि २ री च्या मुलांना घेऊन एक इंग्लिश नाटुकले बसवण्याची . गेल्या  दोन महिन्यात  आम्हा ४ टीचर्स चा आणि २५ छोटुकल्यांचा गोड़ ऋणानुबंध जुळून आला .
इंग्लिश स्किट करता आमच्याकडे गोष्ट तयार होती. सर्वप्रथम आम्ही चौघींनी एकत्र बसून ती गोष्ट खुलवली , त्यातली पात्रं ठरवली  , संवाद लिहिले आणि एक पटकथा आकाराला आली . मग आपापल्या गटातील मुलांना बोलावून ऑडिशन्स घेतल्या . प्रमुख ४ पात्रांकरता सुयोग्य निवड केली. तसंच इतर पात्रसंयोजन देखील पार पडलं . दिवाळी सुट्टी लागायच्या आधी एक महत्वाचे काम आम्ही केलं.   आम्ही  प्रत्येक पात्राच्या वहीत त्याची त्याची वाक्य लिहून चिकटवून दिली . उद्देश हा कि सुट्टीत पालक मुलांकडून वाक्य घोकून घेतील .
दिवाळी सुट्टी संपून मुले आली तेव्हा आमच्या तालमींना खऱ्या अर्थाने सुरवात झाली . सुरवातीला सूचना देऊन , प्रसंगी करून दाखवून काय अपेक्षित आहे ते मुलांना सांगितलं गेलं . काही मुलं ते लगेचच अमलात आणत , काहींनी शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला काळजीत टाकलं . तालमींच्या बरोबरीने एक नवी शोध मोहीम उघडली गेली - बॅकग्राउंड म्युजिक आणि स्किट नंतरचा छोटा डान्स साठी लागणारं गाणं - याची . गूगल सर नेहमीप्रमाणे मदतीला धावून आले . मधेच लक्षात येई कि एक दोन मुले त्यांची वाक्य नीट वठवू शकत नाहीयेत . त्यांना थोडे सोपे  कमी लांबीचे संवाद दिले गेले. त्याच्या त्यांच्यात पात्रांची अदलाबदल करताना त्यांना अंजारत  गोंजारत न  दुखावता केलं जाईल याची खबरदारी घेतली गेली . त्यानंतर गूगल व्हिडीओ बरहुकूम डान्स च्या स्टेप्स बसवल्या .
आता वेळ आली ड्रेस ठरवायची . त्यासाठी पालक सभा बोलावली .पात्रानुरूप प्रत्येकाचा ड्रेस काय आणायचा ते समजावले . रंगांची थिम असल्यामुळे ब्लू जीन्स आणि त्यावर त्या त्या रंगाचा टी -शर्ट असा सुटसुटीत मामला होता. मुख्य ४ पात्रांना विशेष वेशभूषेच्या सूचना दिल्या . मेकअप , कानात गळ्यात हातात , हेरबॅन्ड , सॉक्स  सगळं तपशीलवार समजावून दिले.
तालमींदरम्यान मजा मस्ती चालू असे हे म्हणणे म्हणजे भयंकर अंडर स्टेटमेंट ठरेल . जरा ब्रेक मिळाला कि २५ फटाके चौफेर फुटत आणि त्यांना आवरता आवरता आम्हा चौघींच्या नाकी नऊ येत. काही नाठाळ गुंड्या भाऊंनी त्यांना आपण का बरं घेतलं , असा सवाल वेळोवेळी आम्हाला पाडला . आता राहिलं होतं काम प्रॉप्स बनवण्याचं . त्यात एका मोठ्या स्पेस शिप चं कट आउट बनवायला लागणार होतं . हे अवघड काम एका छोटीच्या ९वि तल्या ताईने सुबकरीत्या करून दिल्यामुळे आमचा मोठाच भार  हलका झाला. दुसरे छोटे प्रॉप्स आम्ही एका दिवसात तयार केले. आता प्रॉप्स सोबत देखील तालमी करता आल्या .
एका प्रॅक्टिस ची  ट्रायल रन प्रिन्सिपॉल मॅडम ना दाखवली गेली. त्यात एक बारीक सुधारणा सुचवण्यात आली . त्या नुसार मुलांच्या हालचालींत गतिमानता यावी म्हणून शक्कल लढवली. एका छोटीने तर कमालाच केली . मैत्रिणीने इंग्लिश स्किट मध्ये नाव दिले म्हणून  हि पठ्ठी ऑडिशन ला न येताच आपले हि नाव दिलेय असे वर्गशिक्षिकेला आणि पालकांना सांगून मोकळी झाली. ती कधी नाटकात नव्हतीच हे तिला , तिच्या शिक्षिकेला आणि आईला समजावणे इतके कठीण होऊन बसले कि त्यापेक्षा तिला पटकन आयत्या वेळी कुठेतरी सामावून घेणे सोपे असे आम्हाला कळून चुकले . मग एका टीचर ने तिला डान्स मध्ये स्पेशल रोल आणि स्पेशल स्टेप्स देऊन खुश करून टाकले आणि स्वतः सुटकेचा श्वास घेतला.
तालमींना अडथळे काही कमी नाही आले. मुले  गैरहजर राहणे, मधेच इतर स्पर्धांना बोलावले जाणे, मधेच MR लसीकरणाचा दिवस असणे, अशा व्यत्ययांसकट तालमी चालू होत्या. शेवटी शेवटी मुलांना गाणे थांबल्यावर प्रेक्षकांना पाठ न दाखवता कसे हळू मागे मागे यायचे ते शिकवले. शेवटच्या ३ तालमी कुठल्या ही सुचने , सुधारणे शिवाय त्यांना सलग करू दिल्या आणि कंटिन्युइटी चा फील येऊ दिला. अगदी शेवटच्या दिवशी प्रत्येकाला तुम्ही कसे आउट ऑफ द वर्ल्ड परफॉर्मन्स करताय हा खोटा का होईना पण त्या क्षणाला कामी  येणारा कॉन्फिडन्स बूस्टर चा जालीम डोस दिला.
१५ डिसेंबर , गॅदरिंग चा दिवस उजाडला. ठरल्या वेळी पालक मुलांना आमच्याकडे सुपूर्द करत होती. स्टेज वर आपला नंबर येईस्तोवर २५ उत्साहाचे झरे आम्हाला पडझडी, रडारडी,भांडाभांडी पासून हाती पायी धड सांभाळायचे होते. दोघीं कडे मुले , एकीकडे प्रॉप्स आणि एकीकडे साउंड अशा जबाबदाऱ्या आम्ही वाटून घेतल्या होत्या. आमच्या इव्हेंट ची घोषणा होऊन ब्लॅकआऊट होताच, आम्ही तिघींनी पटापट प्रॉप्स मांडले, डान्स च्या जागा दर्शवणाऱ्या गोलाकार रेघा पटापट आखल्या, आणि लाईट्स ला ओके दिले. ४थी साउंड सिस्टीम पाशी आपल्या कामावर सज्ज होती. एकदाचा इव्हेंट सुरु झाला. विंगेत एंट्री आधी आमची प्रत्येकला कौतुकमिश्रित  सूचनेची पेरणी सुरूच होती. सर्व मुलांनी अपेक्षेपेक्षा बहारदार परफॉर्मन्स सादर केला. आमची २ महिन्यांची धास्ती १० मिनटात संपुष्टात आली आणि तिचे अतीव समाधानात रूपांतर झाले.
या सर्व प्रवासात ४ डोकी अथक नाटका  भोवती नाटका  साठी चालत होती. आयडिया फुलत होत्या, कधी उचलून धरल्या जात होत्या कधी मोडीत काढल्या जात होत्या. पण कुठेही पर्सनल इगो आड येऊ न देता, घेतलेला डिसिजन लगेच  स्वीकारला जात होता. उत्तमोत्तम सादरीकरणाचा १०० टक्के प्रयत्न या मूळ उद्देशाला कुठेही धक्का न लावता आमची हीटेड डिस्कशन्स चालू होती. आमच्या  डिपार्टमेंट हेड ने अतिशय उपयुक्त इनपुट्स दिले.
नशा हि नुसती ऑन स्टेज नाही तर ऑफ स्टेज देखील असते, लहान मुलांना हाताळताना किंबहुना काकणभर जास्तच याची प्रचिती आली. त्याच बरोबर आजवर कधी न लक्षात आलेले  आमच्या तसेच आमच्या मुलांच्या शिक्षकवर्गाचे ज्ञानदाना व्यतिरिक्त शाळेतील सर्व उपक्रमांकरता खर्ची पडलेले कष्ट लक्खपणे जाणवले. आम्ही केलेल्या छोट्याश्या इव्हेंट पेक्षा कितीतरी पटीने भव्य दिव्य सादरीकरणाची जबाबदारी लीलया पेलताना त्यांच्या नखांची  देखील आम्हाला सर नाही, हे आम्ही जाणतो. तरीही मिळालेला आनंद, समाधान काही औरच होतं .

- मीनल.

Tuesday, March 12, 2019

रिक्षापुराण

#रिक्षापुराण#

ऑटोरिक्षा चालक संघटना, पुणे ,वार्षिक सभा.
नमस्कार मंडळी.....
"आजच्या सभेमधी आपल्या तरूण चालक संघटनेचे बच्चू भाऊ तेंचे मणोगत सांगनारै, तैंच्या सूचना आपल्या भावी चालकां साटी फायद्याच्या पडतील. या बच्चू शेट ."

" भाऊ राम राम , आज मला येवड्या शिनिअर लोकांमदे बोलायला भेटलं .....
थँक यु बरका .
तर मॅटर बिटर काय नाय , येक दोन सूचना बोलतो. पयले म्हंजे आपली गाडी जर खाली असल तर तसा शिग्नल बसवायचा ......
च्या मायला मागून पीर पीर करनारे गप तरी बस्त्याल . ते नाय का हाटील मंदी रूम भायेर डिशटर्ब् करू नका असलं कार्ड दावंत्यात टीवीत , तसलं कार्ड पण भेटलं तर कामच झालं . येकदा का शिग्नल अन कार्ड बशिवलं का .........हे मनमौजी गत रस्ता अडवून गेलं तरी कोन काय बोलल !.

" आर काय बोलतुस " " डोसकं हाय का ठिकानावर ?"

" भाऊ, ऎका तर आनी पुढं .....
दुसरं म्हंजी आपल्या हार्न ला भारीतला शेंशर लावू . "

"आं , तेचं आनि काय करायचं ?"

"ऎका कि , आता ते लेडीज आन पोरी तोंडाला वाढनी बानत्यात आन फुल्ल स्पीड मारून आपल्या गाडी पुढं जात्यात , तवा पार डोस्क्याला शॉट बसतो.......
आता त्या शेंशर न काय व्हतंय , येकदा का त्या शिग्नल आन ट्राफिक ला थांबल्या , का अटोमॅटिक फुल व्हाल्यूम हार्न वाजल आन आपल्या बोटाला आराम भेटल . "

" आर ए बाबा , चल बास झालं तुझं . धंदा बशिवशिल आमचा . "

" बास का भाऊ , अजून म्हत्वाच हाय ना ...... शिग्नल लागला का नाय , का आपुन गाडी च्या साईड ला दुसरी गाडी येऊ द्यायची नाय रिक्षा सोडून . "

" आता दर टायमाला ते आन कसं जमायचं ? आन का वो शेट ते तरी बोला ?"

" हां मंग , आता तोंडातलं थुकायला शिग्नलच भेटतो कि आपल्याला . तिकडं पन दुसरे गाडीवाले असं बगत्यात का त्येंच्या अंगावरच थुकतोय  , आता रिक्षावाला असल साईड ला तर समजून घेतंय , दोगांचं बी काम भागतंय , न्हाई का !"

" झालं का , का हाय अजून काय तुजं ?"

" ओ भाऊ , थांबा कि, लाष्ट बोलू द्या .
आता स्टॅन्ड म्हंजी घरच कि आपलं दुसरं . आता तिकडं पेपर हाय, पानी  हाय , पन वाय फाय कुटंय ? चार्जिंग पाईंट कुटंय ? ते तर मश्ट हाय आताच्याला .
आनी येक , आता स्टॅन्ड वर आपन बसतोय, जमतोय , गप्पा होत्यात , ते बी पाशिंजर ला बघवना . आता म्हनलं कुनाला न्हाई ट्रिप ला , तर काय कालवा करत्यात . जनु ते मालक अन आपन शेवक  .
शिनेमात कुणी न्हाई म्हणताना दाखिवलं  तर पाशिंजर त्यो शिनेमा डोक्यावर घेत्यात . अमिताभ बोलतो का नई " पिंक " शिनेमात " नो म्हंजी नो " तर भारी वाटतं का न्हाई त्येंना , मंग आमाला पन नो बोलायचा हक्क पायजेल . "

" बच्चू शेट , लै बोल्लात .
कसंय दिस बदलत्यात त्ये निसते मोबाईल पायी न्हाई, तर तुमच्या इचारांनी पन .
ओला , उबर ची नावं आमच्या बी कानी आलीत . त्ये लांबच्या साईड लाच न्हाई हितल्या हित पन करतात पाशिंजर .
आन सायकली पायल्या का  नई, येक येक रुपयाच्या .
लोक धावत्यात , पळत्यात सायकली चालवत्यात , तब्बेत कमवत्यात .
तुमच्या नादी लागायला त्येंचा काय अडत नाय तुमच्या बिगर . जरा पैसा आला का बस न जाणारं पब्लिक लागलीच स्कुटर घेत्यात .
आज मला येकच बोलायचंय ,
आमचं दिस नई राहिलं ,
लै माज केला, पन तेवा चालून गेलं ,
आता तुमी पुडचे लोक ......
मापात ऱ्हावा तर मापात भेटल ."

- मीनल.

Friday, March 8, 2019

झगडे

#झगडा 

एकाच वेळी दोन झगडे
नेहमीचेच, तरीही तगडे
एक स्वतःशी, एक जगाशी
खुळच ते, कवटाळले उराशी
छुपे त्यांचे गनिमी कावे,
बेसावध जीवास पकडीत घ्यावे
याचे पाहावे कि त्याचे ऐकावे
मी मी म्हणती दोन्ही बापडे
जगा कडे केला काणाडोळा जरी
आतला भुंगा सदैव भुणभुण करी
आधी त्यालाच सामोरे जावे
आपलाच आहे, समजावून सांगावे
जगाला तर काय अगणित हात
लावतील बोल,  आणतील वात
आतले शमले तसेच बाहेरचे हि विझेल
दोघांना केले माफ तर प्रश्नच मिटेल.
- मीनल देवस्थळे 

Tuesday, December 25, 2018

EkaNatakachiGoshta

#एका नाटकाची गोष्ट #

" कोणतं माध्यम तुम्हाला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटतं ?" नट - नट्यांना हा ठरलेला प्रश्न विचारला जातो. आणि त्यावर त्यांचं ठरलेलं उत्तर असतं ते म्हणजे - नाटक . खरोखर नाटक या माध्यमाची नशाच वेगळी . कुठलंही  रंगमंचीय सादरीकरण हे सादर करणाऱ्याला किंवा पाहणाऱ्याला विलक्षण भारावून टाकतं .

निवेदक या भूमिकेतून ऑन स्टेज माझा अल्प सहभाग झाला असला तरी ऑफ स्टेज काम करण्याचा नुकताच एक रोमांचकारी अनुभव मला घेता आला . निमित्त होतं , अभिनव प्राथमिक मराठी माध्यम शाळेत स्पोकन इंग्लिश टीचर या नात्याने अंगावर आलेली एक जबाबदारी , ती म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलना प्रित्यर्थ  इयत्ता १ ली आणि २ री च्या मुलांना घेऊन एक इंग्लिश नाटुकले बसवण्याची . गेल्या  दोन महिन्यात  आम्हा ४ टीचर्स चा आणि २५ छोटुकल्यांचा गोड़ ऋणानुबंध जुळून आला .

इंग्लिश स्किट करता आमच्याकडे गोष्ट तयार होती. सर्वप्रथम आम्ही चौघींनी एकत्र बसून ती गोष्ट खुलवली , त्यातली पात्रं ठरवली  , संवाद लिहिले आणि एक पटकथा आकाराला आली . मग आपापल्या गटातील मुलांना बोलावून ऑडिशन्स घेतल्या . प्रमुख ४ पात्रांकरता सुयोग्य निवड केली. तसंच इतर पात्रसंयोजन देखील पार पडलं . दिवाळी सुट्टी लागायच्या आधी एक महत्वाचे काम माझ्या ३ कलिग्जनी केलं . त्या वेळी २ दिवस आईच्या आजारपणमुळे माझा सहभाग कमी पडला . त्या तिघींनी प्रत्येक पात्राच्या वहीत त्याची त्याची वाक्य लिहून चिकटवून दिली . उद्देश हा कि सुट्टीत पालक मुलांकडून वाक्य घोकून घेतील .

दिवाळी सुट्टी संपून मुले आली तेव्हा आमच्या तालमींना खऱ्या अर्थाने सुरवात झाली . सुरवातीला सूचना देऊन , प्रसंगी करून दाखवून काय अपेक्षित आहे ते मुलांना सांगितलं गेलं . काही मुलं ते लगेचच अमलात आणत , काहींनी शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला काळजीत टाकलं . तालमींच्या बरोबरीने एक नवी शोध मोहीम उघडली गेली - बॅकग्राउंड म्युजिक आणि स्किट नंतरचा छोटा डान्स साठी लागणारं गाणं - याची . गूगल सर नेहमीप्रमाणे मदतीला धावून आले . मधेच लक्षात येई कि एक दोन मुले त्यांची वाक्य नीट वठवू शकत नाहीयेत . त्यांना थोडे सोपे  कमी लांबीचे संवाद दिले गेले. त्याच्या त्यांच्यात पात्रांची अदलाबदल करताना त्यांना अंजारत  गोंजारत न  दुखावता केलं जाईल याची खबरदारी घेतली गेली . त्यानंतर गूगल व्हिडीओ बरहुकूम डान्स च्या स्टेप्स बसवल्या .

आता वेळ आली ड्रेस ठरवायची . त्यासाठी पालक सभा बोलावली .पात्रानुरूप प्रत्येकाचा ड्रेस काय आणायचा ते समजावले . रंगांची थिम असल्यामुळे ब्लू जीन्स आणि त्यावर त्या त्या रंगाचा टी -शर्ट असा सुटसुटीत मामला होता. मुख्य ४ पात्रांना विशेष वेशभूषेच्या सूचना दिल्या . मेकअप , कानात गळ्यात हातात , हेरबॅन्ड , सॉक्स  सगळं तपशीलवार समजावून दिले.

तालमींदरम्यान मजा मस्ती चालू असे हे म्हणणे म्हणजे भयंकर अंडर स्टेटमेंट ठरेल . जरा ब्रेक मिळाला कि २५ फटाके चौफेर फुटत आणि त्यांना आवरता आवरता आम्हा चौघींच्या नाकी नऊ येत. काही नाठाळ गुंड्या भाऊंनी त्यांना आपण का बरं घेतलं , असा सवाल वेळोवेळी आम्हाला पाडला . आता राहिलं होतं काम प्रॉप्स बनवण्याचं . त्यात एका मोठ्या स्पेस शिप चं कट आउट बनवायला लागणार होतं . हे अवघड काम एका छोटीच्या ९वि तल्या ताईने सुबकरीत्या करून दिल्यामुळे आमचा मोठाच भार  हलका झाला. दुसरे छोटे प्रॉप्स आम्ही एका दिवसात तयार केले. आता प्रॉप्स सोबत देखील तालमी करता आल्या .

 एका प्रॅक्टिस ची  ट्रायल रन प्रिन्सिपॉल मॅडम ना दाखवली गेली. त्यात एक बारीक सुधारणा सुचवण्यात आली . त्या नुसार मुलांच्या हालचालींत गतिमानता यावी म्हणून शक्कल लढवली. एका छोटीने तर कमालाच केली . मैत्रिणीने इंग्लिश स्किट मध्ये नाव दिले म्हणून  हि पठ्ठी ऑडिशन ला न येताच आपले हि नाव दिलेय असे वर्गशिक्षिकेला आणि पालकांना सांगून मोकळी झाली. ती कधी नाटकात नव्हतीच हे तिला , तिच्या शिक्षिकेला आणि आईला समजावणे इतके कठीण होऊन बसले कि त्यापेक्षा तिला पटकन आयत्या वेळी कुठेतरी सामावून घेणे सोपे असे आम्हाला कळून चुकले . मग एका टीचर ने तिला डान्स मध्ये स्पेशल रोल आणि स्पेशल स्टेप्स देऊन खुश करून टाकले आणि स्वतः सुटकेचा श्वास घेतला.

तालमींना अडथळे काही कमी नाही आले. मुले  गैरहजर राहणे, मधेच इतर स्पर्धांना बोलावले जाणे, मधेच MR लसीकरणाचा दिवस असणे, अशा व्यत्ययांसकट तालमी चालू होत्या. शेवटी शेवटी मुलांना गाणे थांबल्यावर प्रेक्षकांना पाठ न दाखवता कसे हळू मागे मागे यायचे ते शिकवले. शेवटच्या ३ तालमी कुठल्या ही सुचने , सुधारणे शिवाय त्यांना सलग करू दिल्या आणि कंटिन्युइटी चा फील येऊ दिला. अगदी शेवटच्या दिवशी प्रत्येकाला तुम्ही कसे आउट ऑफ द वर्ल्ड परफॉर्मन्स करताय हा खोटा का होईना पण त्या क्षणाला कामी  येणारा कॉन्फिडन्स बूस्टर चा जालीम डोस दिला.

१५ डिसेंबर , गॅदरिंग चा दिवस उजाडला. ठरल्या वेळी पालक मुलांना आमच्याकडे सुपूर्द करत होती. स्टेज वर आपला नंबर येईस्तोवर २५ उत्साहाचे झरे आम्हाला पडझडी, रडारडी,भांडाभांडी पासून हाती पायी धड सांभाळायचे होते. दोघीं कडे मुले , एकीकडे प्रॉप्स आणि एकीकडे साउंड अशा जबाबदाऱ्या आम्ही वाटून घेतल्या होत्या. आमच्या इव्हेंट ची घोषणा होऊन ब्लॅकआऊट होताच, आम्ही तिघींनी पटापट प्रॉप्स मांडले, डान्स च्या जागा दर्शवणाऱ्या गोलाकार रेघा पटापट आखल्या, आणि लाईट्स ला ओके दिले. ४थी साउंड सिस्टीम पाशी आपल्या कामावर सज्ज होती. एकदाचा इव्हेंट सुरु झाला. विंगेत एंट्री आधी आमची प्रत्येकला कौतुकमिश्रित  सूचनेची पेरणी सुरूच होती. सर्व मुलांनी अपेक्षेपेक्षा बहारदार परफॉर्मन्स सादर केला. आमची २ महिन्यांची धास्ती १० मिनटात संपुष्टात आली आणि तिचे अतीव समाधानात रूपांतर झाले.

या सर्व प्रवासात ४ डोकी अथक नाटका  भोवती नाटका  साठी चालत होती. आयडिया फुलत होत्या, कधी उचलून धरल्या जात होत्या कधी मोडीत काढल्या जात होत्या. पण कुठेही पर्सनल इगो आड येऊ न देता, घेतलेला डिसिजन लगेच  स्वीकारला जात होता. उत्तमोत्तम सादरीकरणाचा १०० टक्के प्रयत्न या मूळ उद्देशाला कुठेही धक्का न लावता आमची हीटेड डिस्कशन्स चालू होती. आमच्या AIEL डिपार्टमेंट हेड सीमा मॅडम ने अतिशय उपयुक्त इनपुट्स दिले.