Monday, January 22, 2018

Better half

पाककलेतील # Better half # ची आवड व गती सर्वश्रुत आहेच .
त्याच्या आवडीची सुरवात engineering च्या दिवसात आजी च्या किचन मधे आमलेट करण्यापासून झाली .
ठाणे जिल्ह्यातील पडघा या पहिल्या जाॅब साईट वर मात्र ती त्याची गरज बनली .
परत येऊन पुण्यात सेटल झाल्यावर पहिल्या सारखंच आईच्या हातचं सर्व असल्यामुळे आवड व गरज दोन्ही मागे पडलं .
लग्न झाल्यावर माझ्या एन्ट्री ने चित्र फार काही बदललं नाही . आईच्या हातचं जेवणारी मी, सासू च्या हातचं जेवायला लागले . स्वैपाक करण्याची वेळ माझ्यावर 2 वर्ष तरी आली नाही .
माझी स्वैपाकातील गती त्या वेळी शून्याहून खालीच होती . आमटी फक्त करता येत होती .
एक तर 21 व्या वर्षी म्हणजे त्या वेळच्या मानाने देखील बालवयातच लग्न झालं होतं . रोजचा स्वैपाक सोडून इतर पाककृती माहेरी फारशा केल्या जात नव्हत्या . विशेष कधी काही किचन मधे आकार घेताना पाहिल्याची किंवा घरी जेवणावळी झडल्याच्या किंवा सणासुदी ला गोडधोड केल्या च्या कुठल्याच आठवणी माझ्यापाशी नव्हत्या म्हणा ......किंवा मलाही विशेष आवड निर्माण झाली नाही म्हणा.......
या प्रांतात खर्या अर्थाने ज्येष्ठ बाळाच्या आगमना नंतरच माझा प्रवेश झाला . बाळा साठी खिरी , सूप्स तत्सम पदार्थांचे विविध प्रकार शिकणं आणि करणं तेंव्हा सुरू झालं . त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्या सरशी मीही पाककलेत एक एक पायरी वर सरकत होते . जबाबदारीची जाणीव आता पूर्ण आली होती . ती संपूर्ण पणे अंगावर पडली ती मात्र स्वतंत्र राहण्याच्या 6 वर्षात .
इकडे आम्ही दोघेच होतो . जवळ सासूबाई नव्हत्या . खवय्येगिरी एव्हाना दोघांच्या अंगात भिनली होती . सासूच्या हातचं चांगलंचुंगलं जिभेवर रेंगाळत होतं . तेंव्हा पुनश्च #  better half # ची गरज व आवड उफाळून आली . मग काय त्याच्या पुढाकाराने चटपटीत चमचमीत पदार्थ करण्याचा आम्ही सपाटा लावला . ' खवय्ये ' टाईप कार्यक्रम मी नेमाने पाहू लागले . बेसिक केक ची रेसिपी मी शिकून घेतली . पंजाबी प्रकार होऊ लागले .
तरीही पारंपारीक गोडधोड किंवा ठेवणीच्या पदार्थांकडे मी वळण्यास फारशी उत्सुक नव्हते .
# better half # ने एक दोनदा सांगून पाहिलं , मी दाद देत नाही म्हटल्यावर आपल्या आवड व गरजेची गाडी फुल गियर वर टाकून सुटलेच या वाटेवर . पहिला प्रयोग केला रव्याच्या लाडवांचा . तो पहिल्या वेळी बत्त्याने कुटावा लागला, तर दुसर्या वेळी त्याची खीर प्यावी लागली . पण गडी हरला नाही . परत एकदा प्रयोग केला, आईला परत नीट विचारून घेतलं , व पुढचा प्रयोग यशस्वी करून दाखवला .
मग # better half # नां कमालीचा हुरूप आला . पुढची मोहीम ठेवणीचे पदार्थ . त्याच्या हातची कैरीची, लिंबाची व मिरचीची लोणची ( भले मसाला तयार का असेना, घाट घालणं महत्वाचं ) खाऊन अनेकांनी बोटं चाटली आहेत .
दर ऊनहाळ्यात त्याला फोन येतात.....वाट बघतोय....बरणी आणून तयार आहे. 😉
नाॅन व्हेज हा त्याचा वीक पाॅईंट . त्यात तर तो मास्टर शेफ आहे .
दरम्यान मी एकीकडे मुलांच्या schedule नुसार आणि त्यांच्या indivisual गरजेनुसार चारी ठाव सर्वांच्या पोटी पौष्टीक खुराक जात राहील इतपत बेसिक ( पण माझ्या दृष्टीनं ' लई ' झालं) 😆 पारंगत झाले होते . त्यात अधे मधे # better half # च्या डोक्यात येणार्या exercise आणि डाएट प्लॅन बरहुकूम करणे ही आलेच .
स्वतःची पाठ थोपटायची हुक्की आली कि # better half# नवीन पदार्थां ची नावं सुचवून माझी complacency आटोक्यात ठेवत असतो. 😁
मजल दर मजल करत आमची गाडी मग सणवार स्पेशल मधे ही लुडबूड करू लागली . गणेश चतुर्थी च्या दिवशी order चे पण त्या पाच दिवसात एकदा कधीतरी घरी मोदक , संक्राती ला वड्या..... नाही पडल्या तर लाडू , 😃 दसर्या चं श्रीखंड , असं आम्ही करत असतो.
मटार सीझन मधे करंज्या, भोपळ्याचे घारगे ,
असे घाट आम्ही घालतो ते त्याच्याच पुढाकाराने .
आता तर लेक सुद्धा mini chef चे workshops करत असते अधून मधून . मग आम्ही दोघी brownies , cup cakes करतो .
लेकाला बाबाचं बघून स्वावलंबनाची शिकवण मिळाली आहे . आई च्या वरताण बायको मिळाली तर काय घ्या😂😅😃 या भितीने बहुतेक तो ही माझ्याकडे वरण भात, पोहे, आमलेट करायला पटकन शिकला आहे . मध्यंतरी शाळेत जेव्हा लेकीने घारगे short recess साठी नेले व बाबांनी आणि तिने मिळून केले असं मैत्रिणींना सांगितलं, तेव्हा मैत्रिणिंचे चेहरे नक्कीच बघण्यासारखे झाले असतील .
असो.....तर हा सगळा......( झाकली मूठ सव्वा लाखाची....जाहीर खुली करण्याचा ) खटाटोप कशासाठी ?
तर.....एक म्हणजे.... आजूबाजूला बोट दाखवायची पाळी आली कि लिहायला भरपूर विषय दिसतात.....पण तेच बोट जरा स्वतःकडे रोखून पहायचं होतं.
दुसरं म्हणजे बाईला स्वैपाकाची नावड ही जरी प्रौढी मिरवायची बाब नसली , तरी लाज वाटण्याजोगी देखिल निशचित नाही हे ही नमूद करायचं होतं .
तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे # better half # ने या बाबतीत मला सांभाळून घेतल्याबद्दल त्याला जाहीरपणे कडक salute ठोकायचं होतं .