Wednesday, February 28, 2018

bhashaprem

#Iloveboth

काल मराठी भाषा दिवस 'साजरा 'झाला . म्हणजे नक्की काय झालं ?
निवडक ठिकाणी चर्चासत्र , करमणुकीचे कार्यक्रम सादर झाले , कुठे मराठी अभिमान गीत गायले  गेले , न्यूज चॅनल वर वाद विवाद रंगले इत्यादी इत्यादी .

सोशल मीडिया तर हल्ली कोणी शिंकलं तरी दखल घेतो .हा तर सोनियाचा दिन .  तिथे काय सीन होता ?
ओढून ताणून घडवून आणलेला तोच तो घिसा पिटा 'इंग्रजी विरुद्ध मराठी ' सामना . इंग्रजी कशी वाईट , इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलं कशी बिचारी , त्यांचे पालक किती मूर्ख . ज्या गोष्टी , ज्या कलाकृती इतकंच काय जी लोकं , ज्याला ज्याला म्हणून इंग्रजी चा स्पर्श झाला असेल त्या सर्वांवर यथेच्छ ताशेरे ओढले कि झाला यांचा मराठी भाषा दिन साजरा .

दुसऱ्याला कार्ट ठरवल्यावरच आपला तो बाब्या ठरतो का ?
इंग्रजी ला नावं ठेवल्यावरच तुमचं मराठी प्रेम सिद्ध होतं का ?
त्रास होतो या वृत्ती चा . हे डावं उजवं करण्याचा .
मुलाला विचारलं कि आई जास्त आवडते कि बाबा तर तो गडबडून जातो , माझं हि काहीसं तसंच होतं .
जितकं प्रेम मी मराठी वर करते तितकाच त्रास कुणी इंग्रजी ला नावं ठेवली तर मला होतो .

माझं शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं . त्याच्या जोडीला घरातलं वातावरण अस्सल मातृभाषिक होतं .
माझ्या बाबांचं इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांवर सारखंच प्रेम आणि प्रभुत्व . त्यांनी माझा इंग्रजी व्याकरणाचा बेस पक्का केला . त्याच बरोबर मला मराठी वाचायची देखील गोडी लागली . पुलं च्या कॅसेट्स पुस्तकं वाचत ऐकत , जुनी भावगीतं भक्तिगीतं सिनेगीतं ऐकत मोठी झाले . गदिमा , बाबूजी , आशा , लता , रफी , मुकेश , तलत ही दैवतं व गीतरामायण हे धार्मिक ग्रंथ हे संस्कार झाले . तितकाच आनंद सिक्रेट सेव्हन , फेमस फाईव्ह , नॅन्सी ड्रु , शेरलॉक होम्स यांनी दिला . पुढे पी जी वूडहाऊस नि humor आणि wit च्या प्रेमात पाडलं .

आमचं मुंबईतील वास्तव्य मुलुंड ठाणे पार्ले आणि बांद्रा अश्या अनेक ठिकाणी झालं . त्यात मुलूंड ठाणं एकसारखं पण पार्ल्याची संस्कृती वेगळी , बांद्रा ची अजूनच वेगळी . कॉस्मोपॉलिटन कल्चर शी उंबऱ्या आतून का होईना पण परिचय झालाच . सासर पुण्यात नवी पेठेत . तिथली अस्सल पुणेरी संस्कृती . सर्व प्रकारचं एक्सपोजर मिळाल्यामुळे हेच चांगलं , तेच वाईट , आमची तेवढी अस्मिता , दुसरा कस्पटासमान हि वृत्ती कधी शिवली नाही .
माझे शाळासोबती पार्ल्या सारख्या संपन्न उपनगरातील . आज ते जगभर विखुरले आहेत . त्यांच्या कक्षा रुंदावल्या . मराठी शी त्यांचा संबंध दुरावला .  अनेकांचे जोडीदार वेगळ्या मातृभाषेचे . त्यांना भेटल्यावर मी बरेचदा एक अक्षर देखील मराठी बोलत नाही किंवा आमचं संभाषण इंग्रजी मिश्रित मराठीत होतं  . पण मला त्याने काही फरक पडत नाही . त्यांना देखील माझ्या मराठी शी जोडलेल्या नाळेचं , माझ्या मराठी लिखाणाचं कौतूक आहे . ते माझ्या मराठी प्रेमाला कधी कमी लेखत नाहीत .

मराठी चॅनल वरचे 'नक्षत्रांचे देणे 'किंवा पूर्वीच 'सारेगम 'कार्यक्रम मी तन्मयतेने पाहिले आहेत . तितकीच तन्मयतेची अनुभूती मला मुलांना जर्मन किंवा इंग्रजी ग्रामर शिकवताना येते . मराठी शाळेतील मुलांना स्पोकन इंग्लिश शिकवताना खरं समाधान मिळतं . तितकंच झपाटलेपण संगीत कार्यक्रमांचं मराठीतून निवेदन लिहिताना येतं . सुदैवाने एक धरलं आणि दुसरं सुटलं असा माझं झालं नाही .

अशुद्ध मराठी बोललं किंवा लिहिलं कि जे खटकतं तेच चुकीचं इंग्लिश लिहिलं बोललं कि वाटतं . चुकीची दुरुस्ती करून द्यायला हात आणि तोंड शिवशिवतात . पण स्वतःला यावर घालावा लागतो कारण माणसं तोडायची नसतात . बऱ्याचदा एखादी व्यक्ती इंग्रजी बोलते म्हटल्यावर काहींच्या चेहऱ्यावर तिडीक उमटते , त्याला/तीला वेगळ्या नजरेने पाहिलं जातं , संस्कृती बाह्य म्हणून हिणवलं जातं  .

अश्या लोकांनी जरा स्वतःपुढे आरसा धरावा , आपण एका सो कॉल्ड परकीय भाषेच्या सुंदर अनुभवाला मुकलो आहोत हे मान्य करावं . त्याही पुढे जाऊन जमल्यास त्या भाषेशी दोस्ती चा हात पुढे करावा .

शेवटी एकंच नमूद करावंसं वाटतं .
साहित्य संगीत कला यांचे आविष्कार भाषातीत आहेत . त्यांना खुलेपणाने स्वीकारुया . जगभरात ज्ञानेश्वर अवतरले आहेत . त्या सर्वांपुढे कर जोडूया , नतमस्तक होऊया.
देणाऱ्याचे हात हजारो..... दुबळी माझी झोळी .



Monday, February 26, 2018

valentine diaries

#valentinediaries


 हम भी कभी जवान थे .
 वयानुरूप दोन चार नजरा आपल्याकडे हि वळतायत याचे भान आले होते.
त्या नजरांना उलट नजरेने पोच द्यायची का दुर्लक्ष करून तिथंच थोपवायचं हे हि भान आलं होतं  .

म्हणजे , आजूबाजूला मैत्रिणींना धडादड प्रपोजल मिळत असत , काही फळत ,काही फसत .
पण आपल्याला साधं प्रपोजल देखील मिळू नये याचं मला कधी फारसं वाईट वाटल्याचं आठवत नाही .
कारण या वळणाऱ्या नजरांना तिथल्या तिथे जोखून , पोच देण्या इतका तरी खटाटोप करावा का , या फंदात पडावं का, हा सवालच आत कुठेतरी लगाम घालायचं काम करत असे .

स्वतःला असं अति धारेवर धरण्याचे फायदे होते तसेच तोटे देखील होते .
फायदे असे ,  कि केवळ आत हॉर्मोन्स धुडगूस घालतायत म्हणून कधी वहावत गेले नाही .
हव्या हव्याश्या वाटणाऱ्या प्रत्येक नजरेचे आवाहन कधी स्वीकारायचा मोह झाला नाही .
आत्ता बघू पाऊल पुढे टाकून , मग वाटलं तर घेतलं मागे , असं तर मुळीच झालं नाही .
ज्या रस्त्यावर जायचं नाही , त्याचा पत्ता कधी विचारलाच नाही .

हा फायदा आता अधिक प्रकर्षाने जाणवतो , जेव्हा अनेक प्रेम लग्नातील जोडपी खूप वर्ष लोटल्यावर " कुठे अक्कल गहाण टाकली होती त्या वेळी " अशा मानसिकतेत आढळतात . किंवा आधी पाऊल पुढे केलेली पण काही कारणाने फसलेली अशी मंडळी एकमेकांच्या समोर यायला देखील कचरतात .

तसंच या टोकाच्या सेल्फ कंट्रोल ची दुसरी बाजू आहेच .

हम  भी कभी जवान  थे . हमारे सीने में  भी दिल धडकता  था .
पण नुसतं दिल  में अरमान जागे होऊन भागत नाही हे त्यावेळी उमगत नव्हतं .
त्या बरोबरीने किंबहुना त्याही पेक्षा जास्त हुशारी हि योग्य वेळी योग्य बकरा गटवता येणं यात  आहे , याची सुतराम कल्पना नव्हती . त्या वेळी यश चोप्रा ने दिलेल्या आश्वासनावर सारी भिस्त होती " कहीं ना कहीं , कोई ना कोई तुम्हारे लिये बना हैं"

आणि मग लक्षात आलं , लव मॅरेज चा थरारक प्रवास  काही आपल्यासाठी नाही .
ऍरेंज्ड मॅरेज च्या  नियोजित यात्रेचे आपण प्रवासी . या सो कॉल्ड नियोजित यात्रेचा सहप्रवासी कसा निपजेल हे शोधण्यातच मुळी कमालीचा थरार आहे .

प्रथम भेटल्यावरचे आम्ही,  आणि 21 वर्षानंतर चे आम्ही यात खूप फरक पडत गेला.
ॲरेंज्ड मॅरेज मधे एक दोन भेटींमधे खेळळेला जुगार हा पुढे आयुष्यभर खरं म्हणजे सांभाळून घ्यायचा असतो. तो सांभाळून घेताना आपली व्यक्ती म्हणून  प्रगती होते कि अधोगती हेच त्याच्या यशस्वीतेचं मोजमाप असतं.
आमचीही तीच अवस्था होती.  कोर्टशिप चालू असताना आमची भेट म्हणजे वेगवेगळ्या नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या गाठी भेटी . रोमॅन्स चा र काय असतो हे मला माहीत नाही , असं सुरवातीलाच #betterhalf ने डिक्लॅर केल्यामुळे परत कधी त्यावर चकार शब्द मी काढला नाही. मीही ही संधी साधून माझ्या कडून ज्या गोष्टी मुळीच होणं शक्य नाही त्या सांगून टाकल्या. तसंच आमचे अडनिड्या वयातले क्रश, ( आम्हा दोघांचीही मजल क्रश पर्यंतच ) एकमेकांना सांगून टाकले, त्यामुळे एक बरं झालं,  त्यानंतर एकमेकांच्या मित्र मैत्रिणींना खुलेपणाने भेटत राहता आलं,  सगळीकडे दोघांनी जायचा अट्टाहास कोणीच ठेवला नाही, कारण एकमेकांबद्दल कोणतीच शंका घ्यायला जागा नव्हती.

आज मी मोकळेपणाने माझं अवकाश शोधून माझ्या आवडीचे काम करते, तो देखिल  त्याचे सगळे छंद व्यवस्थित चालू ठेवतो. आपापली प्रगती साधताना सगळंच काही सरळसोट नव्हतं. इतक्या वर्षांत भरपूर वादविवाद झाले,  अगदी बॅग भरून चालू लाग पासून घटस्फ़ोट देऊन मोकळे होऊ इथपर्यंत.  पण एक पक्कं माहीत होतं,  कि आपण काही सर्व गुण संपन्न आणि परफेक्ट नाही,  मग समोरचा असेल असा आग्रह कधीच धरला नाही.  म्हणूनच माणूस आहे,  दोघेही चुकणारच, चुकले कि भांडणार, मग अबोला, मग राग शांत होणे मग एकाने ईगो बाजूला सारत साॅरी म्हणणे, दुसर्याने माफ करणे, हे सगळं आपसुक स्वीकारलं गेलं .

आता इतक्या वर्षांनी म्हणता येईल कि सहप्रवाशाची पुरेपूर ओळख पटली  आहे .
एकमेकां सोबत इतर सर्वांची काळजी घेत कौटुंबिक प्रवास करण्याचं गमक उमगलं आहे .
व्हॅलेंटाईन डे आजवर कधी आला कधी गेला आम्हाला कळलं सुद्धा नाही .
ना कधी ऍनिव्हर्सरी मुद्दाम सेलिब्रेट केली .
गिफ्ट्स चं अप्रूप असतंच पण अट्टाहास दोघांनाही नव्हता .
पण एकमेकां साठी केलेल्या छोट्या मोठ्या कृतीतून , आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याच्या पद्धतीतून कधीतरी एकमेकांचे व्हॅलेंटाईन होऊन गेलो खरे .


Friday, February 2, 2018

whatsapp moms

व्हॉटस ऍप क्रांती घडल्यापासून शाळकरी मुलांचे पालक विशेषतः आया यांना अल्लदिन चा जादुई दिवा मिळाला आहे . हि क्रांती घडण्यापूर्वी , मूल आजारी पडून त्याची शाळा बुडली , तर आयांचे हाल असत . खुद्द मी , लेका  च्या वेळी बुडलेला अभ्यास उतरवून घेण्याकरता जवळच्या लांबच्या वर्गमित्रांच्या घरचे उंबरे झिजवल्याच्या आठवणी आहेत . पण व्हॉटस ऍप  आलं , शाळा पालकांचे ग्रुप्स तयार झाले , आणि आयांची मोठी चिंताच मिटली .
मूल गैरहजर राहिलं , कि घरबसल्या बुडलेल्या अभ्यासाच्या इमेजेस ऑन रिक्वेस्ट ग्रुप वर मिळायला लागल्या . एखादं मूल शाळेत हजर राहून देखील नीट क्लास वर्क होमवर्क उतरवून घेत नाही , ती हि काळजी मिटली . अमुक वहीतलं तमुक पानावरचं अमुक प्रश्नाच्या तमुक उत्तराची शेवटची ओळ , बंड्या / बबडी ने अर्धवट लिहिली ? वांदा नाई . व्हॉट स ऍप  झिंदाबाद . 
काही छोटे मोठे निरोप जसं आज हे आणा , उद्या ते आणा , पोरं घरी येऊन नीट सांगत नाहीत त्याची खातरजमा करायला हा ग्रुप सज्ज असतो . शाळाबाह्य उपक्रम झाले , आंतरशालेय क्रीडा स्पर्धा झाल्या , ऑलिम्पियाडस झाल्या , त्यात कोण चमकले , अगदी फोटो , मेडल , ट्रॉफी सकट  सर्व अपडेट्स पालकांना घरबसल्या / ऑफिसबसल्या मिळतात .  मूलं शाळेत बरेचदा काही ना काही विसरून येतात , अथवा एकमेकांच्या पेन पुस्तकांची अदलाबदल देखिल  होते . वर्गाबाहेरील एखाद्या उपक्रमात कधी कधी चक्क एका पायात आपला बूट तर दुसऱ्या पायात दुसऱ्याचाच बूट अशा अवस्थेत मूल घरी येतं . तीही शहानिशा ग्रुप वर  होऊन लगेच दुसऱ्या दिवशी मुलं आपापल्या वस्तू परत मिळवतात . 
तर एकूण रामराज्य आहे म्हणा ना ! 
पण कितीही सोयी आल्या , गॅजेट्स आली , त्याचा उपयोग करताना आपण जर ताळतंत्र सोडून दिलं , तर त्याचा त्रास च होताना दिसतो . या व्हॉट स ऍप ग्रुप्स च्या जगात एक एक पालक असे रथी महारथी सापडतात कि त्यांच्यावर हसावं कि रडावं असा प्रश्न पडतो . मुळात हल्ली झालंय काय , कि शाळा - शिक्षक म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर आणि पालक - मुलं म्हणजे कन्ज्युमर अशी धारणा बऱ्याच पालकांनी करून घेतलीय . त्यामुळे यांच्या सतत काही ना काही तक्रारी असतात .
 शाळेकडून एखाद्या उपक्रमाचा एस एम एस आला , कि लगेच ग्रुप वर पालक त्याची चिरफाड करतात . हे असंच का केलं , तसंच  का ठरवलं ....वगैरे वगैरे .  सगळ्यात आधी शाळेचा एस एम एस आला , कि ग्रुप वर लगेच तो शेर केला जातो . इथवर ठीक आहे , कारण काहींना वेळेवर मेसेज पोचत नाहीत . त्यावर कढी म्हणजे काही आया एकमेकींना विचारतात , "कोणाकोणाला आला मेसेज ? तुला आला का, मला नाही आला " मग या ला उत्तर देणं सुरु होतं  . एक एक आयांचे हात वर येतात , मला आला , नाही आला, आला , नाही आला . दरवेळी यातून काय हशील होतं , हे मला ना सुटलेलं कोडं आहे . खूपदा त्यांना सांगावंसं वाटतं , बायांनो , नसतील येत शाळेचे मेसेज , तर शाळेत जाऊन सांगा , इथे डोकी लढवण्यातून काय होणारे ? 
बरं , आता ग्रुप वरच्या सर्वच आया काही एकमेकांना ओळखत नसतात , पाहिलं देखील नसतं वर्ष वर्ष , मग कुणीतरी अति उत्साही मेम्बर टूम काढते , आपापले फोटो टाका . साधारण ३०-३५ इमेजेस येऊन आदळतात ग्रुप वर . नशीब ऑटो डाउनलोड ऑफ केलय म्हणून , नाहीतर रोजच्या रोज गॅलरी रिकामी करावी लागली असती . 
ग्रुप नवीन होता तेव्हा अशाच अति उत्साही मातेने प्रत्येकीला आपापली आणि आपल्या मुलांची बर्थडेट टाकायला सांगितली . आता शे दीडशे आया असलेल्या ग्रुप वर रोज किमान एका छोट्याचा किंवा आईचा वाढदिवस निघतोच . मग रोज कोणा  कोणाला ५० एक आया तरी बर्थडे विशेस पाठवत राहायच्या . त्यात व्हायचं काय , कि महत्वाचे निरोप , नोटिसेस पार दबून लपून जायच्या . माझ्या सकट  काही समविचारी आयांनी हे थांबवायला सांगितलं तर आमचं  कोणी ऐकेना . उशिरा का होईना , आता त्यांना हे पटलंय म्हणा किंवा सुरवातीचा उत्साह आता मावळलाय म्हणा , ती पीडा आता बंद झालीय . 
तीच गत जोक्स , पोलिटिकल फॉरवर्ड्स असलेल्या पोस्ट्स . या देखील स्कुल ग्रुप वर नसाव्यात हा प्रस्ताव मांडला गेला होता . तो हि सुरवातीला धुडकावला गेला .त्यामुळे इतर कुठल्याही ग्रुप आणि हा ग्रुप यात काही वेगळा वाटत नव्हतं . ज्या  गरजेपोटी या ग्रुप ची निर्मिती केली जाते , तो उद्देश साध्य होतंच नव्हता . या पोस्ट्स च्या गर्दीतून महत्वाचे अपडेट्स शोधात बसायला फार त्रास पडायचा . कालांतराने ते हि पटलं म्हणून आता ती भाऊगर्दी देखील आटोक्यात आहे .
या सगळ्यावर कहर म्हणजे परीक्षे च्या आदल्या रात्री जाग्या होणाऱ्या आया . नियमित पणे राहिलेलं मिळण्याची सोय असताना तेव्हा गायब असणाऱ्या , कधी काही न विचारणाऱ्या आणि दुसऱ्याला पाठवणाऱ्या , निवांत असणाऱ्या अथवा सो कॉल्ड बिझी असणाऱ्या आया , एक्झाम च्या एक दिवस आधी अचानक जाग्या होतात , मुलांच्या वह्या तपासल्यावर त्या अपूर्ण आहेत असा साक्षात्कार झाल्यावर , त्या क्षण पासून ग्रुप वर त्यांचे रिक्वेस्ट्स पडायला लागतात . बरं , एखादा प्रश्न किंवा २/३ पानं यावर त्यांचं भागणार नसतं . २/३ विषयांचे धडे च्या धडे त्यांना इलेव्हन्थ अवर ला हवे असतात . एकदा अशा एका आई ला उर्मट वाटेल इतक्या स्पष्टपणे मी न राहवून सांगितलं , " प्लिज अशी लास्ट मिनिट मदतीची अपेक्षा करू नका . आमच्या मुलांना त्यांच्या अभ्यासातून उठवून तुम्हाला इमेज पाठ्वण्या करता त्यांच्या वह्या हातातून घेण्याची हि वेळ नाही . "
काही आयांना शे दीडशे मेम्बर्स एका ठिकाणी मिळाले कि ओपन मार्केट मिळाल्याचा फील येतो . मग पडायला लागतात टप्परवेर प्रोडक्ट्स च्या , ड्रेस मटेरिअल्स च्या ऑनलाईन मार्केटिंग च्या , इमेजेस आणि जाहिराती .
हा उद्देश देखील आता हणून पडला आम्ही तो भाग वेगळा .
तर मंडळी सांगण्यास आनंद होतो आहे कि सर्व निगेटिव्ह गोष्टींची चाळणी होऊन आता खऱ्या अर्थाने आमचा शालेय ग्रुप मार्गावर आला आहे .