Friday, March 8, 2019

झगडे

#झगडा 

एकाच वेळी दोन झगडे
नेहमीचेच, तरीही तगडे
एक स्वतःशी, एक जगाशी
खुळच ते, कवटाळले उराशी
छुपे त्यांचे गनिमी कावे,
बेसावध जीवास पकडीत घ्यावे
याचे पाहावे कि त्याचे ऐकावे
मी मी म्हणती दोन्ही बापडे
जगा कडे केला काणाडोळा जरी
आतला भुंगा सदैव भुणभुण करी
आधी त्यालाच सामोरे जावे
आपलाच आहे, समजावून सांगावे
जगाला तर काय अगणित हात
लावतील बोल,  आणतील वात
आतले शमले तसेच बाहेरचे हि विझेल
दोघांना केले माफ तर प्रश्नच मिटेल.
- मीनल देवस्थळे 

Tuesday, December 25, 2018

EkaNatakachiGoshta

#एका नाटकाची गोष्ट #

" कोणतं माध्यम तुम्हाला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटतं ?" नट - नट्यांना हा ठरलेला प्रश्न विचारला जातो. आणि त्यावर त्यांचं ठरलेलं उत्तर असतं ते म्हणजे - नाटक . खरोखर नाटक या माध्यमाची नशाच वेगळी . कुठलंही  रंगमंचीय सादरीकरण हे सादर करणाऱ्याला किंवा पाहणाऱ्याला विलक्षण भारावून टाकतं .

निवेदक या भूमिकेतून ऑन स्टेज माझा अल्प सहभाग झाला असला तरी ऑफ स्टेज काम करण्याचा नुकताच एक रोमांचकारी अनुभव मला घेता आला . निमित्त होतं , अभिनव प्राथमिक मराठी माध्यम शाळेत स्पोकन इंग्लिश टीचर या नात्याने अंगावर आलेली एक जबाबदारी , ती म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलना प्रित्यर्थ  इयत्ता १ ली आणि २ री च्या मुलांना घेऊन एक इंग्लिश नाटुकले बसवण्याची . गेल्या  दोन महिन्यात  आम्हा ४ टीचर्स चा आणि २५ छोटुकल्यांचा गोड़ ऋणानुबंध जुळून आला .

इंग्लिश स्किट करता आमच्याकडे गोष्ट तयार होती. सर्वप्रथम आम्ही चौघींनी एकत्र बसून ती गोष्ट खुलवली , त्यातली पात्रं ठरवली  , संवाद लिहिले आणि एक पटकथा आकाराला आली . मग आपापल्या गटातील मुलांना बोलावून ऑडिशन्स घेतल्या . प्रमुख ४ पात्रांकरता सुयोग्य निवड केली. तसंच इतर पात्रसंयोजन देखील पार पडलं . दिवाळी सुट्टी लागायच्या आधी एक महत्वाचे काम माझ्या ३ कलिग्जनी केलं . त्या वेळी २ दिवस आईच्या आजारपणमुळे माझा सहभाग कमी पडला . त्या तिघींनी प्रत्येक पात्राच्या वहीत त्याची त्याची वाक्य लिहून चिकटवून दिली . उद्देश हा कि सुट्टीत पालक मुलांकडून वाक्य घोकून घेतील .

दिवाळी सुट्टी संपून मुले आली तेव्हा आमच्या तालमींना खऱ्या अर्थाने सुरवात झाली . सुरवातीला सूचना देऊन , प्रसंगी करून दाखवून काय अपेक्षित आहे ते मुलांना सांगितलं गेलं . काही मुलं ते लगेचच अमलात आणत , काहींनी शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला काळजीत टाकलं . तालमींच्या बरोबरीने एक नवी शोध मोहीम उघडली गेली - बॅकग्राउंड म्युजिक आणि स्किट नंतरचा छोटा डान्स साठी लागणारं गाणं - याची . गूगल सर नेहमीप्रमाणे मदतीला धावून आले . मधेच लक्षात येई कि एक दोन मुले त्यांची वाक्य नीट वठवू शकत नाहीयेत . त्यांना थोडे सोपे  कमी लांबीचे संवाद दिले गेले. त्याच्या त्यांच्यात पात्रांची अदलाबदल करताना त्यांना अंजारत  गोंजारत न  दुखावता केलं जाईल याची खबरदारी घेतली गेली . त्यानंतर गूगल व्हिडीओ बरहुकूम डान्स च्या स्टेप्स बसवल्या .

आता वेळ आली ड्रेस ठरवायची . त्यासाठी पालक सभा बोलावली .पात्रानुरूप प्रत्येकाचा ड्रेस काय आणायचा ते समजावले . रंगांची थिम असल्यामुळे ब्लू जीन्स आणि त्यावर त्या त्या रंगाचा टी -शर्ट असा सुटसुटीत मामला होता. मुख्य ४ पात्रांना विशेष वेशभूषेच्या सूचना दिल्या . मेकअप , कानात गळ्यात हातात , हेरबॅन्ड , सॉक्स  सगळं तपशीलवार समजावून दिले.

तालमींदरम्यान मजा मस्ती चालू असे हे म्हणणे म्हणजे भयंकर अंडर स्टेटमेंट ठरेल . जरा ब्रेक मिळाला कि २५ फटाके चौफेर फुटत आणि त्यांना आवरता आवरता आम्हा चौघींच्या नाकी नऊ येत. काही नाठाळ गुंड्या भाऊंनी त्यांना आपण का बरं घेतलं , असा सवाल वेळोवेळी आम्हाला पाडला . आता राहिलं होतं काम प्रॉप्स बनवण्याचं . त्यात एका मोठ्या स्पेस शिप चं कट आउट बनवायला लागणार होतं . हे अवघड काम एका छोटीच्या ९वि तल्या ताईने सुबकरीत्या करून दिल्यामुळे आमचा मोठाच भार  हलका झाला. दुसरे छोटे प्रॉप्स आम्ही एका दिवसात तयार केले. आता प्रॉप्स सोबत देखील तालमी करता आल्या .

 एका प्रॅक्टिस ची  ट्रायल रन प्रिन्सिपॉल मॅडम ना दाखवली गेली. त्यात एक बारीक सुधारणा सुचवण्यात आली . त्या नुसार मुलांच्या हालचालींत गतिमानता यावी म्हणून शक्कल लढवली. एका छोटीने तर कमालाच केली . मैत्रिणीने इंग्लिश स्किट मध्ये नाव दिले म्हणून  हि पठ्ठी ऑडिशन ला न येताच आपले हि नाव दिलेय असे वर्गशिक्षिकेला आणि पालकांना सांगून मोकळी झाली. ती कधी नाटकात नव्हतीच हे तिला , तिच्या शिक्षिकेला आणि आईला समजावणे इतके कठीण होऊन बसले कि त्यापेक्षा तिला पटकन आयत्या वेळी कुठेतरी सामावून घेणे सोपे असे आम्हाला कळून चुकले . मग एका टीचर ने तिला डान्स मध्ये स्पेशल रोल आणि स्पेशल स्टेप्स देऊन खुश करून टाकले आणि स्वतः सुटकेचा श्वास घेतला.

तालमींना अडथळे काही कमी नाही आले. मुले  गैरहजर राहणे, मधेच इतर स्पर्धांना बोलावले जाणे, मधेच MR लसीकरणाचा दिवस असणे, अशा व्यत्ययांसकट तालमी चालू होत्या. शेवटी शेवटी मुलांना गाणे थांबल्यावर प्रेक्षकांना पाठ न दाखवता कसे हळू मागे मागे यायचे ते शिकवले. शेवटच्या ३ तालमी कुठल्या ही सुचने , सुधारणे शिवाय त्यांना सलग करू दिल्या आणि कंटिन्युइटी चा फील येऊ दिला. अगदी शेवटच्या दिवशी प्रत्येकाला तुम्ही कसे आउट ऑफ द वर्ल्ड परफॉर्मन्स करताय हा खोटा का होईना पण त्या क्षणाला कामी  येणारा कॉन्फिडन्स बूस्टर चा जालीम डोस दिला.

१५ डिसेंबर , गॅदरिंग चा दिवस उजाडला. ठरल्या वेळी पालक मुलांना आमच्याकडे सुपूर्द करत होती. स्टेज वर आपला नंबर येईस्तोवर २५ उत्साहाचे झरे आम्हाला पडझडी, रडारडी,भांडाभांडी पासून हाती पायी धड सांभाळायचे होते. दोघीं कडे मुले , एकीकडे प्रॉप्स आणि एकीकडे साउंड अशा जबाबदाऱ्या आम्ही वाटून घेतल्या होत्या. आमच्या इव्हेंट ची घोषणा होऊन ब्लॅकआऊट होताच, आम्ही तिघींनी पटापट प्रॉप्स मांडले, डान्स च्या जागा दर्शवणाऱ्या गोलाकार रेघा पटापट आखल्या, आणि लाईट्स ला ओके दिले. ४थी साउंड सिस्टीम पाशी आपल्या कामावर सज्ज होती. एकदाचा इव्हेंट सुरु झाला. विंगेत एंट्री आधी आमची प्रत्येकला कौतुकमिश्रित  सूचनेची पेरणी सुरूच होती. सर्व मुलांनी अपेक्षेपेक्षा बहारदार परफॉर्मन्स सादर केला. आमची २ महिन्यांची धास्ती १० मिनटात संपुष्टात आली आणि तिचे अतीव समाधानात रूपांतर झाले.

या सर्व प्रवासात ४ डोकी अथक नाटका  भोवती नाटका  साठी चालत होती. आयडिया फुलत होत्या, कधी उचलून धरल्या जात होत्या कधी मोडीत काढल्या जात होत्या. पण कुठेही पर्सनल इगो आड येऊ न देता, घेतलेला डिसिजन लगेच  स्वीकारला जात होता. उत्तमोत्तम सादरीकरणाचा १०० टक्के प्रयत्न या मूळ उद्देशाला कुठेही धक्का न लावता आमची हीटेड डिस्कशन्स चालू होती. आमच्या AIEL डिपार्टमेंट हेड सीमा मॅडम ने अतिशय उपयुक्त इनपुट्स दिले.

नशा हि नुसती ऑन स्टेज नाही तर ऑफ स्टेज देखील असते, लहान मुलांना हाताळताना किंबहुना काकणभर जास्तच याची प्रचिती आली. त्याच बरोबर आजवर कधी न लक्षात आलेले  आमच्या तसेच आमच्या मुलांच्या शिक्षकवर्गाचे ज्ञानदाना व्यतिरिक्त शाळेतील सर्व उपक्रमांकरता खर्ची पडलेले कष्ट लक्खपणे जाणवले. आम्ही केलेल्या छोट्याश्या इव्हेंट पेक्षा कितीतरी पटीने भव्य दिव्य सादरीकरणाची जबाबदारी लीलया पेलताना त्यांच्या नखांची  देखील आम्हाला सर नाही, हे आम्ही जाणतो. तरीही मिळालेला आनंद, समाधान काही औरच होतं .


Saturday, December 8, 2018

चिंता


#चिंता#

बाळाच्या जन्माबरोबर एका आईचा हि जन्म होतो म्हणतात ते अगदी खरं आहे . असंही म्हणतात कि बाळाच्या ५वि च्या पूजेला त्याचं भाग्य कोरलं जातं . अगदी तसंच या नवीन जन्मलेल्या आईच्या भाळी कायमची एक गोष्ट कोरली जाते ती म्हणजे चिंता .

या चिंतेचं स्वरूप मात्र काळाच्या ओघात बदलत राहिलं आहे .

उदाहरण म्हणून दोन पिढ्या मागे जाऊन बघितलं तर हे  चिंतेचं स्वरूप कसं बरं होतं ?

त्या काळी गावी होणारा बाळाचा जन्म हा रोजची आन्हिकं पार पाडण्यासारखाच एक भाग होता . त्या काळच्या आई ला १०/१२ पोरं जन्माला घातल्याशिवाय या निसर्गचक्रातून सुटका नव्हती . अखण्ड कामात गढून गेलेल्या त्या माउली ला बाळाचा जन्म एकदा सुखरूप पार पडला कि त्याच्या तब्बेत पाण्याशिवाय दुसरी फारशी कुठली चिंता नसे . नाही म्हणायला सासरी गेलेल्या लेकी बद्दल अंधुकशी चिंता असे .

नंतरची मधली पिढी शिक्षण नोकरी निमित्त शहरात स्थिरावली . या पिढीतील आया मध्यमवर्गीय घर चालवायला  बऱ्याचदा नवर्याच्या बरोबरीने नोकरी करत . तिच्या डोळ्यासमोर सदैव नाचत ते ८. १० आणि ५. १४ हे घड्याळाचे काटे . घरकामात मदत करणारा नवरा हि जणू परग्रहावरची संकल्पना . या सगळ्या घरच्या बाहेरच्या धामधुमीत मूल सगळ्या इयत्ता नीट पास होतंय ना हीच चिंता तिला पुरून उरायची . एव्हाना दूरदर्शन आणि पेपर मासिकातून बाहेरच्या जगातील संभाव्य धोके तिला समजत असत . त्या मुळे  मुलाला संगत योग्य आहे ना किंवा मुलगी ७ च्या आत घरात येत्येय ना या कडे तिचे बारीक लक्ष असायचे .

आता येऊया आमच्या पिढीकडे . जी आता ४० शी ला  आल्यावर या सगळ्याकडे त्रयस्थपणे पाहायच्या आणि स्वतः वर हसायच्या मनस्थितीत आली आहे .

आमच्या पिढीच्या आयांच्या वाट्याला चहू बाजूंनी ज्ञानाचा भडीमार आला . हेच अतिरिक्त ज्ञान आम्हाला नवनवीन खाचखळगे दाखवतं , पॅनिक करून सोडतं . त्यामुळे आधीच चिंतेने भरून गेलेल्या कपाळावर इंच इंच जागा लढवत नवनवीन चिंतातुर रेषा उमटत असतात.

म्हणूनच जन्मतः ५ मिनिटांच्या आत बाळ रडलं का ?

दीड वर्ष सरायच्या आत ते चाललं / बोललं का ?

३ वर्ष्याच्या आत त्याचा बालवाडी प्रवेश झाला का ?

त्यात कुठे learning / reading / hyperactivity  disorder आढळली का ?

४ री ठाव त्याच्या पोटात पौष्टिक खुराक जातोय का ?

शाळे व्यतिरिक्त extra activity लावलीय का ?

या आणि अशा अनेक गोष्टींकरता आम्ही आया आमचं रक्त आटवत असतो . 
हे कमी म्हणून कि काय हल्ली बालपण सरल्याच्या खुणा देखील फार घाईघाईने दिसायला लागतात.
जणू पुढल्या ताणांची फ्रेश यादी घेऊन कोणीतरी आपल्यावर हसत असतं .
एव्हाना स्मार्टफोन शी मुलांची चांगलीच गट्टी झालेली असते . गेम्स खेळून कंटाळलेलं बालपण आता यु ट्यूब कडे वळत असतं . अभ्यासातून ब्रेक म्हणून हातात सतत फोन येऊ लागलेला असतो. मोठ्या मुलांना  तर स्वतःचाच फोन मिळालेला असतो . अशा वेळी आम्हा माऊलींची तारेवरची कसरत काय वर्णावी . सहजच म्हणून किंवा काहीतरी काम काढून मुलांच्या खोलीत डोकावत राहणं आणि त्यांचं फोनवर नेमकं काय चाललंय हे नकळतपणे हेरत राहणं  हे कौशल्य फार मेहनतीनं कमवावं लागतं  .
तर दर वेळी नवनवीन कल्पना लढवून , मुलांना भावनिक, सामाजिक , ध्येयनिष्ठ का काय ती वळणं लावून (?) एकदा का निर्विघ्न आणि अपेक्षेप्रमाणे मुलांची १२वि पार पडली , कि आम्ही आया सुटकेचा श्वास घेतो. स्वतःसाठी जगायचं ठरवतो (?)  थोडक्यात उधळतो .
आम्हा आयांचे स्वतःच्या वाढीच्या वयातले काही न भरलेले घाव असतात . आता पालक म्हणून आपल्या हातून त्या चुका घडू नयेत या करता आम्ही सदैव दक्ष असतो. हो पण त्या ओघात काही नवीन चुका आम्ही करून ठेवतो ते वेगळं . असो....
प्रत्येक पिढीचे चॅलेंजेस वेगळे , त्यामुळे पॅरेंटिंग चे फंडे वेगळे.

पण चिंता हि शाश्वत आहे .

सो...... कूल आई हा भ्रम आहे.

आणि असलंच तर मग काहीतरी गोम आहे .

        

Tuesday, December 4, 2018

Chinta

#चिंता#

बाळाच्या जन्माबरोबर एका आईचा हि जन्म होतो म्हणतात ते अगदी खरं आहे . असंही म्हणतात कि बाळाच्या ५वि च्या पूजेला त्याचं भाग्य कोरलं जातं . अगदी तसंच या नवीन जन्मलेल्या आईच्या भाळी कायमची एक गोष्ट कोरली जाते ती म्हणजे चिंता .
या चिंतेचं स्वरूप मात्र काळाच्या ओघात बदलत राहिलं आहे .

उदाहरण म्हणून दोन पिढ्या मागे जाऊन बघितलं तर हे  चिंतेचं स्वरूप कसं बरं होतं ?
 त्या काळी गावी होणारा बाळाचा जन्म हा रोजची आन्हिकं पार पाडण्यासारखाच एक भाग होता . त्या काळच्या आई ला १०/१२ पोरं जन्माला घातल्याशिवाय या निसर्गचक्रातून सुटका नव्हती . अखण्ड कामात गढून गेलेल्या त्या माउली ला बाळाचा जन्म एकदा सुखरूप पार पडला कि त्याच्या तब्बेत पाण्याशिवाय दुसरी फारशी कुठली चिंता नसे . नाही म्हणायला सासरी गेलेल्या लेकी बद्दल अंधुकशी चिंता असे .

नंतरची मधली पिढी शिक्षण नोकरी निमित्त शहरात स्थिरावली . या पिढीतील आया मध्यमवर्गीय घर चालवायला  बऱ्याचदा नवर्याच्या बरोबरीने नोकरी करत . तिच्या डोळ्यासमोर सदैव नाचत ते ८. १० आणि ५. १४ हे घड्याळाचे काटे . घरकामात मदत करणारा नवरा हि जणू परग्रहावरची संकल्पना . या सगळ्या घरच्या बाहेरच्या धामधुमीत मूल सगळ्या इयत्ता नीट पास होतंय ना हीच चिंता तिला पुरून उरायची . एव्हाना दूरदर्शन आणि पेपर मासिकातून बाहेरच्या जगातील संभाव्य धोके तिला समजत असत . त्या मुळे  मुलाला संगत योग्य आहे ना किंवा मुलगी ७ च्या आत घरात येत्येय ना या कडे तिचे बारीक लक्ष असायचे .

आता येऊया आमच्या पिढीकडे . जी आता ४० शी ला  आल्यावर या सगळ्याकडे त्रयस्थपणे पाहायच्या आणि स्वतः वर हसायच्या मनस्थितीत आली आहे .
आमच्या पिढीच्या आयांच्या वाट्याला चहू बाजूंनी ज्ञानाचा भडीमार आला . हेच अतिरिक्त ज्ञान आम्हाला नवनवीन खाचखळगे दाखवतं , पॅनिक करून सोडतं . त्यामुळे आधीच चिंतेने भरून गेलेल्या कपाळावर इंच इंच जागा लढवत नवनवीन चिंतातुर रेषा उमटत असतात.
म्हणूनच जन्मतः ५ मिनिटांच्या आत बाळ रडलं का ?
दीड वर्ष सरायच्या आत ते चाललं / बोललं का ?
३ वर्ष्याच्या आत त्याचा बालवाडी प्रवेश झाला का ?
त्यात कुठे learning / reading / hyperactivity  disorder आढळली का ?
४ री ठाव त्याच्या पोटात पौष्टिक खुराक जातोय का ?
शाळे व्यतिरिक्त extra activity लावलीय का ?
या आणि अशा अनेक गोष्टींकरता आम्ही आया आमचं रक्त आटवत असतो . 
हे कमी म्हणून कि काय हल्ली बालपण सरल्याच्या खुणा देखील फार घाईघाईने दिसायला लागतात.
जणू पुढल्या ताणांची फ्रेश यादी घेऊन कोणीतरी आपल्यावर हसत असतं .
एव्हाना स्मार्टफोन शी मुलांची चांगलीच गट्टी झालेली असते . गेम्स खेळून कंटाळलेलं बालपण आता यु ट्यूब कडे वळत असतं . अभ्यासातून ब्रेक म्हणून हातात सतत फोन येऊ लागलेला असतो. मोठ्या मुलांना  तर स्वतःचाच फोन मिळालेला असतो . अशा वेळी आम्हा माऊलींची तारेवरची कसरत काय वर्णावी . सहजच म्हणून किंवा काहीतरी काम काढून मुलांच्या खोलीत डोकावत राहणं आणि त्यांचं फोनवर नेमकं काय चाललंय हे नकळतपणे हेरत राहणं  हे कौशल्य फार मेहनतीनं कमवावं लागतं  .
तर दर वेळी नवनवीन कल्पना लढवून , मुलांना भावनिक, सामाजिक , ध्येयनिष्ठ का काय ती वळणं लावून (?) एकदा का निर्विघ्न आणि अपेक्षेप्रमाणे मुलांची १२वि पार पडली , कि आम्ही आया सुटकेचा श्वास घेतो. स्वतःसाठी जगायचं ठरवतो (?)  थोडक्यात उधळतो .
आम्हा आयांचे स्वतःच्या वाढीच्या वयातले काही न भरलेले घाव असतात . आता पालक म्हणून आपल्या हातून त्या चुका घडू नयेत या करता आम्ही सदैव दक्ष असतो. हो पण त्या ओघात काही नवीन चुका आम्ही करून ठेवतो ते वेगळं . असो....
प्रत्येक पिढीचे चॅलेंजेस वेगळे , त्यामुळे पॅरेंटिंग चे फंडे वेगळे.
पण चिंता हि शाश्वत आहे .
सो कूल आई हा भ्रम आहे.
आणि असलंच तर मग काहीतरी गोम आहे .


Saturday, November 24, 2018

वटवृक्ष

#वटवृक्ष#

हॉस्पिटल ची पायरी कुणी सहसा स्वखुशीने चढत नाही . आणि जर वेळ आलीच तरी मनात एक अनामिक असुरक्षितता जाणवत राहते . डॉक्टर , इतर स्टाफ आणि हॉस्पिटल मध्ये शिरलेले कॉर्पोरेट वातावरण या सर्वां बद्दल समज गैरसमज , आणि धास्ती वाटल्याशिवाय राहत नाही .
जेव्हा  एखाद्या  हॉस्पिटल मधील कर्मचारी वर्ग , डॉक्टर किंवा हॉस्पिटल  प्रॉपर्टी वर हल्ले झाल्याच्या बातम्या ऐकू येतात तेव्हा अतीव यातना होतात . कारण वैद्यकीय क्षेत्रातील मिळालेल्या सेवेचा आमचा अनुभव अगदी उलट आहे . अनेकप्रकारे नावं ठेवल्या गेलेल्या या क्षेत्रात आम्हाला आलेले सकारात्मक अनुभव चांगुलपणा वरील आपला विश्वास दृढ करून जातात .
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल शी आमचे असेच हृद्य नाते  आहे . फॅमिली हॉस्पिटल असं म्हटलं तर वावगे ठरू नये . कधी साधे रुटीन वार्षिक चेकअप , कधी तब्बेतीच्या बारीक सारीक कुरबुरी , मधूनच आलेला एखादा इन्फेक्शन चा अटॅक , पासून ते  knee replacement , hip joint replacement आणि अगदी संपूर्ण कॅन्सर ट्रीटमेंट पर्यंत चे नानाविध उपचार आमच्या कुटुंबाने याच वटवृक्षाच्या छायेत घेतले आहेत .

आजवर मंगेशकर हॉस्पिटल मधील अनेक लहान मोठी डिपार्टमेंट्स उपचारा निमित्त आम्ही पालथी घातली आहेत . ER , ओपीडी , admin section , फार्मसी , मेडिक्लेम , billing , diagnostics मधील X ray , सोनोग्राफी , ऑपरेशन थेटर्स , जनरल वॉर्ड , Chemo  चा day care वॉर्ड , सेमी प्रायव्हेट रूम , प्रायव्हेट रूम , ICU , आणि कॅन्टीन अशी जुन्या- नव्या बिल्डिंग मधील विविध सेवा सुविधांचा आम्ही लाभ घेतला आहे .
हॉस्पिटल चा एंट्री पॉईंट म्हणजे ER . इथल्या स्टाफ ची तारांबळ शब्दात व्यक्त करणं  निव्वळ अशक्य . पेशंट कोणत्या स्थितीत एंट्री घेतो त्यावर त्याची वर्गवारी होते . आपल्या पायावर चालत आलेल्या पेशंट ला बाहेरच्या रूम मधील डॉक्टर प्रथमोपचार देतात आणि त्याच्या रिस्पॉन्स वर त्याला ऍडमिट करून घ्यायचं का सोडायचं ते ठरतं .   बऱ्याचदा स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर वर आलेला पेशंट दाखल करून घेण्याच्याच स्थितीत असतो .
दाखल केला गेलेल्या पेशंट ला एकाच छताखाली सर्व सुविधा मिळतात हि  या हॉस्पिटल ची खासियत.

८०० बेड्स असलेल्या या अवाढव्य पसाऱ्याची धुरा ज्ञान प्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट चे निष्णात आणि तत्पर डॉक्टर्स सांभाळत आहेत . ज्ञान प्रबोधिनी ची नीतिमूल्यं हॉस्पिटल च्या कार्यक्षमतेत पुरेपूर भिनली आहेत . पेशंट फर्स्ट हे ब्रीदवाक्य समोर ठेऊन इथला प्रत्येक कर्मचारी वावरत असतो . इथले रेसिडेंट डॉक्टर्स आणि नर्सेस जेव्हा पेशंट अटेंड करत नसतात तेव्हा  कॉम्पुटराइज्ड  पेपरवर्क मध्ये आकंठ बुडलेले  असतात . पण एरवी ऍडमिट  पेशंट ची बारीक सारीक तक्रार नोंदवून त्यावर सोल्युशन सांगायला ते सदैव सज्ज असतात .

इथे प्रत्येक डिपार्टमेंट साठी  एक फीडबॅक फॉरमॅट आहे. त्या त्या डिपार्टमेंट शी तुमचा संबंध येऊन गेला कि पेशंट च्या रिलेटिव्ह कडून तो तपशीलवार भरून घेतला जातो . त्यात विस्ताराने आपण आपली नापसंती किंवा प्रशंसा नमूद करू शकतो . त्यामुळेच रेसिडेंट डॉक्टर्स पासून फार्मसी , नर्सेस , सेक्युरिटी , मामा/ मावशी सर्वच उत्तरदायी आहेत , त्याने प्रत्येकाच्या परफॉर्मन्स मध्ये लक्षणीय फरक पडतो .
शेवटी तीही माणसेच आहेत . अखंड कामाच्या घाईत त्यांना अनेकदा स्वभावाने किरकिरे पेशंट्स हॅण्डल करावे लागतात . मागे आम्हाला आलेला एखाद दुसरा कटू अनुभव या नव्या सिस्टीम ने खूपच आटोक्यात आला आहे .

मुद्दाम उल्लेख करायला हवा तो म्हणजे इथल्या होम केअर डिपार्टमेंट चा . काही पेशंट्स आपले आपले हॉस्पिटल मध्ये तपासणी साठी ये जा करू शकत नाहीत , पण ऍम्ब्युलन्स बोलवून दाखल करण्याइतकी काही त्यांची सिरिअस कंडिशन हि नसते . अशां  साठी हा उत्तम पर्याय हॉस्पिटल देतं . फिजिशियन कडून तपासणी किंवा नर्स कडून ड्रेसिंग किंवा लॅब च्या काही चाचण्या अश्या सर्व सेवा घरी येऊन पेशंट ला दिल्या जातात .

काही डिपार्टमेंट्स शी पेशंट्स चा प्रत्यक्ष संबंध कधीच येत नाही . येतो तो त्याच्या नातेवाईकांचा .
रिसेप्शन वर नवख्या माणसाला कुठे जायचं , कसं जायचं , कोणाला भेटायचं या बद्दल हार प्रकारे गाईड केलं जातं . इतकंच नाही तर तिथे जी चहा कॉफी मशीन ची टोकन्स मिळतात ती अगदी मशीन मध्ये घालून ऑपरेट करायची कशी इथवर चं प्रात्यक्षिक प्रसंगी रिसेप्शनिस्ट आपल्या डेस्क वरून उठून तुम्हाला देते .
नव्या बिल्डिंग मधील पासेस ची सिस्टीम सिक्युरिटी गार्डस काटेकोर पणे चालू आहे कि नाही या बद्दल दक्ष असतात . तसेच ICU च्या दालनाबाहेरील गार्डस नातेवाईकांना भेटण्या  बोलण्याचे कडेकोट नियम पाळायला लावतात .
ऍडमिशन डिपार्टमेंट मध्ये जो रूम टाईप हवा असेल त्यावर क्लेम ठेवायला सांगितला जातो . आलो आणि रूम मिळाली असे कधीच होत नाही , इतकं हॉस्पिटल पेशंट्स ने सदैव खचाखच भरलेलं असतं . गेल्या आठवड्यात २ दिवसांच्या अंतराने आमचे २ पेशंट एक जुन्या आणि एक नव्या ICU मध्ये ऍडमिट होते . ICU मधून एक पेशंट बाहेर येऊन ज्या मजल्यावरच्या रूम मध्ये दाखल झाला , त्याच मजल्यावरची  दुसरी  प्रायव्हेट रूम मिळावी म्हणून आम्ही क्लेम ठेवला . तेवढीच आमची धावपळ कमी हा त्यामागे हेतू होता . आमची हि नड ऍडमिशन डिपार्टमेंट नि लक्षात घेतली आणि आमची गरज भागवली. पण मिळाली ती रूम सेमी प्रायव्हेट होती . आम्ही पुन्हा प्रायव्हेट रूम साठी क्लेम ठेवला तर त्याची  देखील संध्याकाळपर्यंत दखल घेतली गेली .
२००९ साला पासून  मंगेशकर हॉस्पिटल शी पेशंट म्हणून असलेलं आमचं असोसिएशन आम्हाला कधीच नाराज करून गेलं नाही. हॉस्पिटल मधून पेशंट लाच काय नातेवाईकाला सुद्धा कधी एकदा आपल्या घरी परत जातोय असं  होतंच . पण तिथून डिस्चार्ज घेताना आम्ही नेहमीच हॉस्पिटल बद्दल कृतज्ञतेच्या  ऋणात राहून बाहेर पडतो  हे नक्की .

Saturday, September 29, 2018

आम्ही पेठी

#आम्ही पेठी#

आपण कुठे जन्म घ्यावा हे जसं आपल्या हातात नसतं तसंच आपण कुठल्या पत्त्यावर राहावं हे देखील कधी कधी आपल्या हातात नसतं . एखाद्याला त्याच्या पत्त्यावरून जज करणारी माणसं अनुभवली कि मौज वाटते . अमुक पत्त्यावर राहणारी उचभ्रु किंवा तमुक पत्त्यावर राहणारी सबर्बन आणि ठराविक पत्त्यावर राहणारी पेठी हे किती सहज बोलून जातो आपण .


अमुक अमुक पत्त्यावर राहिलो म्हणजे आपण मॉडर्न . अमुक एका गोतावळ्यात वावरलं  , अमुक प्रकारचा पेहराव केला , आपल्या राहत्या पत्त्याला  साजेशी बाह्य जीवनशैली अंगिकारली म्हणजे आपण फॉरवर्ड झालो असा काहींचा समज होत असावा . या उलट आमच्यासारखे पत्ताच तो असल्याने पेठी चा शिक्का  आणि त्यावरून इतरांची टीका या दोन्ही गोष्टी झेलणारे .


आम्ही मंडईत जाऊन भाजी आणतो , आम्ही ब्रह्मवृंद गुरुजींचे आमंत्रण न चुकता स्वीकारतो , दोन  चारच पण व्रत वैकल्य करतो , सहकुटुंब बादशाही मध्ये जेवायला जातो , शक्यतो २ चाकीनेच ये जा करतो , पिढ्यान पिढ्या चालत आलेली नाती आणि मैत्री अभिमानाने मिरवतो - या  आणि अशा  आमच्या  टिपिकल पेठी सवयी  .


यातील काही सवयी आमच्या बालपणीचा ठेवा आहेत , काहींमुळे घरात चैतन्य आणि प्रसन्नता भरून राहते , गावाच्या वेशीवर राहत असल्यामुळे २ चाकी वापरणे हा अतिशय व्यावहारिक चॉईस असतो , ज्या वास्तू ची विशिष्ट चव जिभेवर रेंगाळते तो मेस असला तरी आम्हाला त्याने काही फरक पडत नाही .
पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मैत्रीनेच आजवर रात्री बेरात्री हाकेला ओ देऊन आम्ही  आहोत' हा दिलासा दिलेला आहे . '


आमच्या या पेठी जीवनशैली चे हे नुसते वरवरचे चित्रण देऊन मी थांबणार नाहीये . त्यातील अंतरंग हि तितकेच रंजक आहेत .
माझ्या आजारी आई वडिलांना त्या त्या वेळी उपचारादरम्यान माझ्या याच पेठी घराने घरात सासरे असताना सुद्धा काही महिने ते वर्ष सामावून घेतलंय . हि शक्यता सो कॉल्ड उच्चभ्रू आणि उपनगरीय घरांमध्ये आजही स्वप्नवत आहे . 

माझा पेठी नवरा मला स्वैपाकात घरकामात हर प्रकारे मदत करतो , मला माझ्या वर्तुळात वावरताना त्याचे कसलेच दडपण नसते . माझे मित्र त्याला इंसेक्युर   करत नाहीत . तो माझ्याशी सर्व प्रकारचे वैचारिक आणि भावनिक शेअरिंग करतो . पाळी शी निगडित सर्व धार्मिक निर्बंध झुगारायला त्याने मला प्रोत्साहन दिले आहे . त्याला अनेक मैत्रिणी आहेत . ज्यांच्याशी तो गाठी भेटी चॅटिंग सगळं मला सांगून सवरून करतो . कारण जिथे मनात खोट  असते तिथेच माणूस लपवतो . नुकतंच त्याने सावनी च्या नावातील मधले नाव बदलून माझे नाव घातले . तो माझ्या आई बाबांची वेळोवेळी आर्थिक जबाबदारी घेतो.
आजवर नवरा बायको च्या नात्यात अनेकदा आम्ही भांडलो , टोकाच्या प्रतिक्रिया दिल्या . पण ती त्या त्या वयातली अपरिपक्वता होती. या माझ्या पेठी नवऱ्याने कालांतराने आपल्या स्वभावातील  उणिवा ओळखल्या , त्या मुळात आहेत हे स्वीकारलं , त्यावर काम करून स्वतःला जमेल तितकं रिफाईन केलं . हल्लीच्या भाषेत त्याला अचिंविंग कपल गोल्स असं गोंडस नाव आहे .


तर असे हे आम्हा पेठी न चे अंतरंग. त्यात डोकावून पाहणाऱ्याला लक्खपणे काहीतरी नक्कीच गवसेल . आचार विचार आणि व्यवहारात इतरांना लाजवेल असं पुरोगामीत्व वेळ प्रसंगी अंगिकारायला पत्ता कधीच आड येत नाही हे तरी निश्चित उमजेल .

Wednesday, September 26, 2018

diet pahave karun

#डाएट पाहावे करून #

सध्या बघावं तिकडे म्हणजे ( सोशल मीडिया वर ) दीक्षित - दिवेकर वाद सुरु आहे . या विषयावर टुकार जोक्स टाकत वॉट्सऍप वर विनोद निर्मिती चा वसा घेतलेले बहाद्दर आहेत , तर कुठे जाणकार तज्ञ् त्यावर हिरीरीने आपली मत - मतांतरे मांडत आहेत .
आपल्या ओळखीचे बरेच जण या दोन्ही पैकी एकाचे तरी अनुयायी असलेले आपल्याला दिसतात . त्यात हल्ली दीक्षितांचाच वरचष्मा जास्त . दोन्ही जीवनशैलींबद्दल मला आदर आहे . दोन्ही चे आपापले फायदे , विरोधाभास , त्यावर घडलेली डिस्कशन्स , शास्त्रीय उहापोह या सर्वच बाबतीत एव्हाना आपण सगळेच खूपच अपडेटेड आहोत.
हे सर्व असले तरीही माझ्यासारखे काही जण नक्की असतील जे या पैकी कुठल्याही एका शैली ला आपलेसे करण्याकडे कानाडोळा करीत असतील . प्रत्यक्ष उडी घ्यायला कचरत असतील. त्या सर्वांचे प्रातिनिधिक मत मला मांडायचे आहे .
माझ्या सारखे काही जण आत्ताशी चाळीशी ला पोचले असतील . वर्षानुवर्षे काठी सारखा अति शिडशिडीत बांधा लाभलेले आत्ताशी कुठे काठी न दिसता  खांब दिसू लागले असतील. जरा मूठ भर मांस अंगावर चढल्याच्या खुमारीत असतील. सध्याच्या या "तब्बेत सुधारलेली दिसते " फेज  मध्ये रमलेले आम्ही एवढ्यात तरी वजन कमी करणे या विषयापर्यंत अजून पोचलेले नसतो . हि फेज काही चिरकाल टिकणारी नाही याची जाणीव आम्हाला आहेच , त्यामुळे व्यायाम सुरु केलेला आहेच , पण तूर्तास डाएट या फंदात न पडण्याकडे आमचा कल असण्याचे हे एक मुख्य कारण आहे .
आता दुसरं कारण असं कि या दोन्ही गटाचे फॉलोअर्स यांची मुळातली जीवनशैली पाहता असं वाटतं -
या पैकी किती जण सकाळी लौकर उठून स्वतः घरातल्यांचे डबे , चहा , नाश्ते , स्वैपाक यावरून पूर्ण वेळ अथवा अर्धा वेळ बाहेरचे काम करून आल्यावर परत ओट्यापाशी उभे राहून किंवा पगारी बायका च्या कामांव्यतिरिक्त करण्याची घरातील अव्याहत कामे उरकून दीक्षित अथवा दिवेकर जीवनपद्धती फॉलो करू शकत असतील ?
यातील बहुतांश जणांना किमान सकाळचा नाश्ता करून दुपारचा डबा अथवा जेवण आणि रात्रीचे डायरेक्ट जेवण या तीन वेळा तरी नियमित आणि शांतपणे उपभोगता येतात कि नाही तो देव  जाणे .
तिसरा मुद्दा असा कि दीक्षित दिवेकर किंवा कुठलेही डाएट फॉलो करणाऱ्या किती व्यक्ती  स्वतःच्या हिमतीवर ती ती पद्धत फॉलो करतात? अनेकदा कुणीतरी पगारी मदतनीस / स्वयंपाकी / फॅमिली मेम्बर त्यांना त्या त्या पद्धती बिनचूक वेळेवर पाळण्यात मदत करत असतो . दर दोन तासांनी खायच्या पदार्थांची तजवीज अथवा दिवसातून दोनदाच जेवायच्या वेळी अन्न आणि त्या ५५ मिनिटातील सर्व घटक कुणीतरी दुसरा तुम्हाला सोय आणि सोबत म्हणून पाळणारा आणि बरेचदा स्वतः ना पाळणारा / री जय्यत तयारीनिशी हजर करत असतो .
यात अनेक सन्माननीय अपवाद असतील यात शंका नाही . पण बहुतांशी चित्र मात्र असंच आहे .
सध्यातरी या पैकी कुठल्याच गटात सामील व्हायला माझाकडे मोकळा वेळ , फौजफाटा आणि मुख्य करून आंतरिक इच्छा या पैकी काहीच नाही . त्यामुळे दिवसातून ४ ठळक भुका पाळणे आणि व्यायामात खंड न पडावा या कडे लक्ष केंद्रित करणे एवढ्या बाबींवर मी अल्पसंतुष्ट आहे.
या जीवनशैली फॉलो करणाऱ्यांचे कौतुक आहेच आणि त्या हि पेक्षा त्यांना त्यात अनाम साथ देणाऱ्या कुटुंब घटकांना शतशः नमन.