Tuesday, May 10, 2011

शुभेच्छा

#नवी पहाट

काल आपण भेटलो तेव्हा
नव्हता मोकळेपणा पूर्वीचा
पण जपत एकमेकांच्या भावना
चाचपडत गेलो भाव मनीचा

अवघडलेपण कधी नव्हे ते
का आले अपुल्या मध्ये
तुला मला जोडणारा धागा
का असा तुटला अर्ध्यामध्ये

आज असे नवी सुरवात तुझी
का पाणावती सारख्या कडा
हि खंत नव्हे रे जाणतोस तू हि
मला हि ना लागे मनाचा छडा

धागा जरी तुटला तरी
वीण आहे घट्ट अजुनी
क्षितिजावर हि पहाट नवी
देतेय साद पुन्हा नव्यानी

- मीनल देवस्थळे 

Wednesday, May 4, 2011

तुझे आहे तुजपाशी......

स्थलांतर हि आपल्यापैकी बहुतेक जणांना कमी अधिक प्रमाणात करावी लागलेली अशी गोष्ट आहे. त्यातही वर्गवार स्थलांतर हि पूर्णपणे ऐच्छिक अशी बाब समाजात फोफावल्याचे सध्या चित्र आहे. ह्या अतिशय केविलवाण्या अट्टाहास ला काही जण बळी पडल्याचे आपल्या आजूबाजूला दिसते. त्यात सर्वात आघाडीवर आहे तो निम्न वर्ग.
गडी, मोलकरणी ह्यांची पोरे,बाळे आपापल्या आई-वडिलांना "मम्मी-पप्पा" संबोधतात. माझी कामवाली, सावनी ला तान्हेपणी, नुकते शब्द उच्चारायला लागल्यावर, मला "मम्मी" म्हणायला शिकवीत असे. मी त्यापासून तिला तत्काळ परावृत्त करायला म्हटलेले मला चांगले आठवतेय " बाई ग, आमच्यात मम्मी-पप्पा नाही आई-बाबा "च" म्हणतात." तेव्हा तिचा चेहरा "काय मागासलेली मालकीण भेट्लीये" असे भाव स्पष्ट दर्शवित होता.
माझ्या घरी वास्तव्यास असलेली दुसरी मदतनीस मुलगी मला दर आठवड्याला ना चुकता ५ रुपयाचे "फिरली" क्रीम आणायला सांगायची. पाहिल्या वेळेस मला ह्या शब्दाचा काहीच अर्थबोध होईना. मी ५ वेळा तेच तेच विचारल्यावर तिने माझ्याकडे एकवार कीव करीत न्याहाळून पाहिले आणि म्हणाली," ताई, ते गोरं व्हायचं, टीवीत दाखवतात कि सारखं." मग माझी एकदाची ट्यूब पेटली आणि मी निमूट तिच्यासाठी" फेर अन्ड लवली" क्रीम आणू लागले.
हल्ली त्यांच्या लग्नात हि " दाजींचे" बूट लपवतात. त्याही पटापट रात्रीचे स्वैपाकपाणी आटोपून "उत्तरान" आणि बालाजी फिल्म च्या 'एक से बढकर एक' मालिका बघायला सरसावून बसतात. हि अशी अनेक उदाहरणे आसपास आढळतील. तरीही ह्यातील बरीचशी तशी म्हटली तर निरुपद्रवी आणि क्षणिक का होईना करमणूक करणारी म्हणायला हवीत.
पण माझ्या भुवया खर्या अर्थाने उंचावतात ते ह्याच अशिक्षित परंतु थोड्या सधन गटाकडे पाहून. ह्या मंडळींकडे घरी उच्च शैक्षणिक कारकीर्द, सुसंस्कारित बालपण नसते पण दारी किमान दोन तरी "फोरीन" चारचाक्या असतात. ह्यांच्या बायका टीवी वरील एकूणेक सिरिअल्स फॉलो करतात. एपिसोड गणिक बदलणाऱ्या लेटेस्ट वेशभूषा त्या परिधान करतात. आपापल्या अति "बीजी" नवर्यान शिवाय "माय फेर लेडी " टूर्स ला आदेश भावजी न बरोबर मज्जा करतात. ह्यांची पोरे ओन्ली कोन्वेंत शाळांमध्ये जातात. तिकडे शिकवलेले समजत काहीच नाही, त्यामुळे केजी टू पीजी ट्युशन क्लासेस चे चांगलेच फोफावते. पण हे सगळे करण्याचा त्यांचा मूळ हेतू सुसंकरीत, सुशिक्षित जीवन जगण्याचा नसून केवळ मध्यम वर्गीयांशी बरोबरी करीत उच्च वर्गात स्वतःला जाऊन बसवण्याचा अट्टाहास असतो. हाच गट आपल्याला जमले नाही म्हणून आपल्या पोरांना विविध रिअलिटी शोज मध्ये भाग घ्यायला लावतात. त्यात खरे नैपुण्य असणारे अगदी हाताच्या बोटावर सापडतील. पण त्या चिमुकल्या वयात त्यांना नखरेल लावणीचे अथवा आईतेम डान्स चे हावभाव तंतोतंत जमतात हे पाहूनच माझे काळीज तुटते. आणि हे बघून त्यांचे " मम्मी-पप्पा" भरून पावतात हे पाहून डोके सुन्न होते.
असो........त्यांच्या बौद्धिक पातळीची कीव करण्यापलीकडे आपल्या हातात खरेच काही नाही. आणि तसेही त्याबद्दल काही खेद आणि खंत हि नाही.

पण मध्यम वर्ग जेव्हा " हाय-प्रोफाईल" होण्याचा प्रयत्न करताना आढळतो, तेव्हा खरच काळजी वाटते. कारण जगात कुठेही जा, काहीही करा, हि मध्यमवर्गीय मूल्येच लांबवर तारून नेणारी आहेत. आणि हीच जेव्हा आजूबाजूला कात टाकल्यासारखी लोक फेकून देताना दिसतात तेव्हा खरेच वाईट वाटते. आपल्या ह्याच मूल्यांनी आपल्याला आजवर नितीमत्तेची शिकवण दिली, दुसर्यांना आदर-भाव द्यायला शिकवले, वाईट संगत आणि सवयीन पासून दूर ठेवले. पण हीच मुल्ये आज "बिलो-दिग्निती" समजली जातायत. मुक्त हस्ते आज आपण घरात वाईट सवयींना वावरू देतो. आपल्याला वाटते काय हरकत आहे, थोडी मजा करूयात, काय बिघडले. वयाच्या ह्या टप्प्यावर आपण काही आता वाया जाणार नाही. आता नाही तर काय म्हातारपणी मजा करणार? पण आपण हे विसरतो, कि आपली मजा आपल्या आजूबाजूला असलेली भावी पिढी बघत बघत मोठी होणार आहे.
घरात मातृभाशे चा वापर कमीत कमी ते अजिबात न करणे. का तर कॉन्वेंत मधली मुले गोंधळून जातील ना, कुठली संस्कृती आपली (?) म्हणून. ह्यांच्या जिभेला वळण "मम्मी-पप्पा" पेक्षा जरा वरचा श्रेणीचे" mom-dad " म्हणण्याचे. ह्या मुलांचे वाढदिवस मग mac -D मधेच साजरे होतात. ओवाळून घेणे आणि मोठ्यांच्या पाया पडणे बहुदा ह्यांना माहीतच नसावे. पालकांच्या सुद्धा ह्या मुलांकडून असल्या 'फालतू' अपेक्षा मुळीच नसतात. आपण फक्त त्यांच्या 'ऑल-राउंड' विकास साठी त्यांना उद्युक्त केलं कि झाले. पण ह्यात फक्त अभ्यास, खेळ, स्पर्धा परीक्षे साठी तयारी, एवढेच येते असं बहुदा यांचा समज असतो. त्याला शिस्तीची, लवचिकतेची , नकार पचवण्याची आणि संस्कारांची जोड द्यायची गरज या होतकरू उच्चभ्रूंना वाटत नाही. ह्यांच्या घरात सणासुदीचे दिवस सुद्धा 'जस्ट अनदर डे' म्हणूनच येतात नि जातात. पण क्रिसमस मात्र सेलेब्रेत करावाच लागतो. यांच्या घरात दिवेलागणीला 'एकंच प्याला' , कंपनी असो व नसो ,सर्रास घेतला जातो. इथे मराठी मालिकांना नाके मुरडली जातात, पण 'बिग बॉस', रोडीज' डोळे फाडून पाहिले जातात. मुलांच्या शाळेत सुद्धा ह्या आया वेशभूषेचे कुठलेच संकेत पाळताना दिसत नाहीत. अप-टू-डेट हे फक्त राहणीमाना करिता वापरले जाणारे विशेषण आहे हा यांचा ठाम समज झालेला दिसतो.
वरील सर्व मुद्दे पूर्णतः वैयक्तिक आहेत. पण चांगले वाचन, चांगली संगत आणि जबाबदारीची जाणीव हे कधीच आपसूक होत नाहीत. या गोष्टी मुद्दाम आपल्या जगण्याचा भाग बनवाव्या लागतात आणि तरच आयुष्याला परिपूर्णता येते असे माझे मत आहे.

Monday, April 4, 2011

पारोसे घर

आज ६ वर्षात प्रथमच " यशोधन " गुढीविना ओके बोके राहिले. तसे ते त्या आधी जवळ जवळ १५ एक वर्ष पर्यंत ओके बोकेच होते. पण आम्ही राहायला गेल्यापासून त्याचे घर झाले होते. अगणित आठवणींचा खजिना बनलेले घर. ज्या घराने आम्हा दोघांना आमची स्वतंत्र ओळख दिली, आपापले स्वतंत्र विश्व निर्माण केलेले पाहिले, जिथे अनेक कटू सत्यांना आम्ही सामोरे गेलो आणि त्यातून तावून सुलाखून बाहेर हि निघालो, जिथे आमच्या दुसर्या अपत्याचा जन्म झाला, आणि जिथे थोरल्याच्या मुंजीचा सोहळा अत्यंत दिमाखात राबवला गेला, असे आमचे घर आज पारोसेच राहिले.
ज्या दिवशी ठरवले आता " यशोधन" मध्ये बस्तान हलवायचे तो क्षण आठवतोय. खूप विचार विनिमय, करून घेतलेला तो निर्णय अतिशय योग्य आणि सर्वांच्याच दृष्टीने हितकारक असा ठरला याचे आज समाधान वाटते. सर्वांचा होकार अगदी मनातून आला नाहीये हि सल घेऊन काहीशा अपराधी भावनेनीच आम्ही "जगन्नाथ" चा उंबरा मागे टाकला आणि "यशोधन" मध्ये प्रवेश केला. तिथली ती पहिली अनोळखी रात्र आम्ही दोघांनी अस्वस्थ चित्त आणि भरलेल्या डोळ्यांनीच काढली.
मग सुरु झाला अंधारात चाचपडण्याचा प्रवास. वयाची २५ शी ओलांडून आणि एक अपत्य पदरात असूनही म्हणावे तसे संसारिक शहाणपण आम्हा दोघांकडे नव्हते. "जगन्नाथ" मधील ५ वर्षात दूध पिशवी चा रेट, वर्तमानपत्राचे बिल, बाईचा पगार, आणि अशा इतर गोष्टींशी अमचा सुतराम संबंध आला नव्हता. चुकत माकत, सगळी अक्कल आलीच हळू हळू.
खर्या अर्थाने स्वतःच्या आयुष्याचा गांभीर्याने विचार करायला मी त्या सुमारास लागले. घराबाहेर चे जग कुठल्यातरी स्वरूपात निर्माण करायचे मनात पक्के केले. आणि करून पाहू म्हणून रानडे मध्ये जर्मन भाषा सर्तीफिकेत कोर्स ला प्रवेश घेतला. तो क्षण माझ्या कल्पने पलीकडचा टर्निंग पोईंत ठरला. एकतर जे १०, १२, पदवी पर्यंत उमगले नव्हते ते आत्ता उमगले. माझी आवड, माझी गती भाषा विषयात आहे हे उलगडले. शिकवलेले पटापट आत्मसात होत गेले. आणि मनावर कसलेही दडपण न घेता मी प्रथमच अभ्यास करत होते. कोणाच्या माझ्याकडून कसल्याच अपेक्षा नव्हत्या. अभ्यास बरोबर कोर्स मधल्या एक्स्ट्रा करिकुलर उपक्रमान मध्ये हिरीरीने भाग घेऊ लागले. इथे पुन्हा मला प्रथमच कोणाचीही आडकाठी नव्हती. बक्षिसे मिळवली. नाटक बसवले. समवयस्क नसला तरी माझा प्रथमच मित्रा- मैत्रिणींचा ग्रुप जमला. जे जे निसटले ते ते अनुभवण्याची सुवर्णसंधी या वेळी अजिबात सोडली नाही.
सेर्तीफिकेत नंतर डिप्लोमा केले. त्यात चक्क तिसरी आले. माझ्यातल्या ह्या बदलाने मीच चक्रावून जात होते. पण माझा हा न्यूनगंदातून आत्मभानाकडे झालेला प्रवास मी " यशोधन" मधेच अनुभवला. तो तिथेच घडायचा होता. हे विधिलिखित होते.
अभिजित मध्ये हाच आत्मविश्वास फुलून आलेला ह्याच घराने पहिला. नवीन विचार, नवीन शक्यता पडताळून पहायचे बळ ह्याच घराने त्याला दिले.
दुसर्या अपत्याचा विचार आणि आमच्या बाळाचे स्वागत ह्याच घराने केले. राजस चे मित्रमंडळ ह्याच घराने वाढवले. त्याचे रिक्षातील मित्रं, ग्राउंड चे मित्रं, आसपासचे मित्रं, असे वर्तुळ निरंतर फोफावत गेले. त्याच्या दृष्टीने तेव्हाही नवी पेठ हेच घर त्याच्या मनात कायम होते. कारण तिथे त्याच्या लाडाची माणसे होती. पण तो "यशोधन" मध्ये रमला होता हे निश्चित. आता इकडे आल्यावर त्याला "यशोधन" सुटल्याची जाणीव अस्वस्थ करते यातच सगळे आले.
राजस च्या मुंजीचे ग्रहमक आणि देवक हट्टाने मी "यशोधन" मधेच बसणार हे जाहीर केले. ४ दिवस घर नव्या नवरिगत नटले होते. येणाऱ्या जाणार्यांची वर्दळ, दारी मांडव, जेवणाच्या पंगती, सगळं कसं मस्त जमून आलं होता. तेव्हा ठाऊक नव्हते त्या घरातले ते शेवटचे मंगल कार्य असणार आहे ते. कार्य दणक्यात पार पडले. श्रम-परिहार होऊन जेमतेम वर्ष होते न होते तोवर तिथून गाशा गुंडाळण्याची वेळ आली. आणि अशी आली कि धडपणे त्या वास्तूला अखेरचा दंडवत हि करायचे राहून गेले.

Monday, March 21, 2011

नसते परोपकार ................

आज एका परिचित व्यक्तीने माझा चक्क पंचिंग bag म्हणून उपयोग केला. घरातल्या प्रोब्लेम्स चा पाढा वाचत, आपल्या मनातली सगळी मरगळ सांगत सांगत जाता जाता मला यथेच्छ पणे एक दोन टोमणे हि मारून गेल्या.
मला राग नाही आला. उलट बरे वाटले. ५ मिनटा का होईना पण मी त्या काकूंना मोकळं करून गेले. साचलेला गाळ थोडा का होईना वाहता झाला. कोणाला तरी लागेल असे बोलल्या चे तात्पुरते आणि फसवे का होईना समाधान त्यांना मिळाले.
आता पुढचे काही दिवस झगडायला नवे बळ त्यांना मिळेल.
खूप वेळा असा अनुभव मी घेते आणि पुन्हा पुन्हा देवाचे आभार मानते. मला अशी empathetic दृष्टी दिल्या बद्दल. तसेच मला अशा परिस्थिती हाताळण्यास वेगळ्या क्षमता दिल्या बद्दल.

Saturday, March 19, 2011

अणि स्मृति ठेवुनी जाती.............

१९ आणि २० या दोन तारखा,

येतात दर महिन्यात न चुकता,

पण चुकवून जातात हृदयी ठोका,

आठवणीच त्या.... सोडत नाहीत आपला हेका.


वाढदिवस बाबांचा आज अन मंगलमय होळीचा सण,

न उरली मजा ती आता, गेले कायमचे घरपण.

१९ ला गेली सोडून सासू नव्हे आईच,

अवघे ६२ वय झाली थोडी घाईच,

माझे एक ठीक आहे पण नातवंडांचे काय....................................

कुणी काढावी दृष्ट आता, कुणी घालावी पांखर,

कौतुकात चिंब भिजवण्यासाठी कुणी सजवावे मखर.

२० ला गेली सोडून मैत्रीण कसली ती बहीणच,

पुसून गेले कायमचे सोनेरी क्षणांचे ते पानच,

शब्दाविण नेहमीच समजलो एकमेकींची भाषा,

एकीचे दुःख पचवता वाटले आहे अजून अशा,

पण ५ महिन्यातच घातला दैवाने पुनश्च घाला

गेलीस सोडून तुही उरले कोणी नाही मला


कुणाच्या भरवशावर टाकावे घर, कुणा सांगावे गाऱ्हाणे

पोरकेपण हे जीवघेणे, आणू कुठून अवसान पुराणे........आणू कुठून अवसान पुराणे.

Wednesday, March 16, 2011

सिक्स्थ सेन्स ................

साम्भाशानाविना भाषा विशेषतः आपण स्त्रियांना उपजतच समजते असे मला वाटते.
जेव्हा पासून कळायला लागले तेव्हापासून लोकांची हि भाषा मला समजायला लागली आपसूक. म्हणजे इयत्ता ८ वी पासून मी खर्या अर्थाने बाहेरचे जग म्हणजे काय ते ह्याच भाषेमार्फात शिकले. आपले सुरक्षित परीघ घर आणि शाळेबाहेर संपते ह्याची जाणीव मला लोकांच्या नजरेतून व्हायला लागली. मग कोलेज मध्ये हि ह्याच भाषेमुळे कोण आपल्याशी जास्त जवळीक साधायचा प्रयत्न करू पाहते आहे, हे पटकन उमजायचे आणि त्याला तिथेच थोपवणे ते हि ह्याच भाषेत सहज शक्य व्हायचे. म्हणूनच कि काय माझे असे प्रामाणिक आणि पूर्णतः वैयक्तिक मत आहे कि मुलाने मुलीला प्रत्यक्ष प्रोपोज करायचा आधी अनेक सिग्नल्स दिलेले असतात, ते सिग्नल्स ओळखून त्याला प्रोपोजल पर्यंत पुढे येऊ द्यायचे का नाही हे सर्वस्वी मुलीचा हातात असते.
बरेचदा आपल्याला देहबोलीतून कोणाकडे पाहुणे म्हणून गेल्यावर आपल्याला अनुभव येतो कि आता निघायची वेळ आलेली आहे. यजमानांचे दुसरे काम असू शकते.
माझ्या सासूने कधीही कोणापुढे माझ्यावर स्तुतिसुमनांची उधळण नसेल केली, पण तिच्या अनेक कृतींमधून तिचा आपलेपणा मला स्पर्शून गेला आहे.
आपल्या लहानग्यांचे सूक्ष्म शारीरिक बदल आपण आया साम्भाशानाशिवायाही अलगद टिपू शकतो. आज डोळे बारीक दिसतायत, सर्दीची सुरवात होणार, शाळेतून आल्या आल्या चिडचिड म्हणजे दाबा नित संपवला नाहीये.....इ इ

थरार...............

आमची टी.वाय. बी.एस्सी. ( प्राणीशास्त्र ) ची फिल्ड ट्रीप त्या वेळच्या मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानात गेली होती. एक अतिशय विलक्षण असा तो पूर्ण अनुभव होता.
तिथे रोज सकाळी ६-७ तसेच संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत अशा २ फेर्या आम्ही उद्यानाच्या आत मारून येत असू. जायला-यायला उघडी जीप असे. बरोबर एक फोरेस्ट गाईड असे.
काही नियम आम्हाला काटेकोरपणे पाळावे लागत. सर्वप्रथम म्हणजे कपडे फिकट,मळकट रंगाचे घालणे. भडक लाल,हिरवे,पिवळे,निळे असे घालण्यास मज्जाव होता. त्याचे कारण पशु उत्तेजित होऊ नयेत म्हणून.
तसेच एकदा उद्यानाच्या हद्दीत शिरल्यावर बाहेर पडेपर्यंत केवळ कुजबुज करता येईल इतपतच आवाज ठेवणे, एकमेकांना काही दिसले जसे एखादा पक्षी अथवा एखाद्या पशूच्या पायाचे ठसे वगैरे तर अतिशय शांतपणे फक्त हावभाव करणे...इ.इ.
गाईड अधे मध्ये वाघाच्या पायाचे ठसे दाखवून सांगत असे कि आत्ताच काही मिनटा पूर्वी स्वारी इथून गेली वगैरे तेव्हा अक्षरशः अंगावर काटा उभा राहत असे. अशा ट्रिप्स मध्ये प्रत्यक्ष वाघ दिसणे वाटते तेवढे सोपे अजिबात नसते. आपल्या ४-५ दिवसांच्या मुक्कामात समोर असा वाघ आलेला वगैरे क्वचितच होते.
असा दुर्मिळ योग आमच्या तीन जीप्स पैकी एकालाच आला. चालकाने आपली जीप निमूट हळू हळू रिवर्स घेतली तसे व्याघ्र महाराज हि हळू हळू पुढे सरकू लागले. जोवर वाघोबा थोड्या अंतरापर्यंत पुढे-पुढे येत राहिले, तोवर चालकाने मागे जाणे चालू ठेवले. मग जणू मूड गेल्यागत वाघोबांची स्वारी वळली आणि सावकाश झाडीत गुडूप झाली.
मग गाईड सांगू लागला हे इथले 'जंगलाचे' असे वेगळे कायदे आहेत. आपण इथे उपरे असतो, त्यामुळे जास्त गमजा चालत नाहीत. जसे फ्लाश मारून फोटो बिटो घेतलात तर संपलातच. मग तुम्ही आणि तुमचे नशीब. पिकनिक मूड मध्ये येऊन गाणी-बिणी म्हणणे ,टाळ्या शिट्या मारीत दंगा वगैरे सगळे हद्दीच्या बाहेर.
तिथे अजून एक विलक्षण गोष्ट अनुभवली ती म्हणजे कॉल्स. लंगुर जातीच्या माकडांच्या विशिष्ट आवाजातल्या आरोळ्या म्हणजे हे कॉल्स. शिकारीला निघालेल्या भक्षकापासून इतर प्राण्यांना सावध करायला दिलेले हे कॉल्स.
एका रात्री आमच्या विश्रामगृहाबाहेर रात्रभर असे कॉल्स येत होते. आमचे सर म्हणाले याचा अर्थ एखाद्या भक्षकाला दिवसभर एकही शिकार मिळालेली नाही आणि असा उपाशी भक्षक उद्यानाच्या हद्दीबाहेर आमच्या आसपासच वावरतोय. आमची बोबडीच वळली.
आणि आमचे रात्रीचे जेवण हि अजून व्हायचे होते. जेवण आम्हाला थोडे अंतर चालून असलेल्या डायनिंग हॉल मध्ये घ्यावे लागे. मध्ये मिट्ट काळोख. आम्ही सर्वांनी जेवण नको असे सरांना सांगितले. पण सर म्हणाले नको आपल्यासाठी केलेले जेवण वाया जाईल. मग सरांनी आमच्या पूर्ण ग्रुप ला एकत्र बाहेर यायला सांगितले. एक घट्ट गोलाकार अशा वर्तुळात आम्ही बाहेर चालत गेलो. त्याच्या सीमेवर टोर्च घेतलेले ४-५ सर, त्याच्या आत मुले आणि सगळ्यात आत मुली अशी आमची वरात त-त-प-प करीत एकदाची हॉलपर्यंत पोचली. मग कसेबसे जेवल्यावर परत सगळी वरात तशीच विश्रामगृहेत आली.
काॅल्स काही थांबेनात. आम्हाला काही झोप येईना. मग आम्ही एका मोठ्या डाॅर्म मधे एकत्र जमलो. सर , मॅडम आणि मुलं मुली. नाहीतरी जागेच आहोत तर गेम खेळत बसलो. गेम मधे मूड पालटतोय असं वाटू लागतं तोवर कर्कश काॅल्स कानावर येऊन आवळत असा सगळा माहौल होता. कोणीतरी पायरीवर भक्षकाच्या  पायाचे ठसे पाहिल्यामुळे बाथरूम ला जाऊन यायची सुद्धा भिती वाटत होती.