Tuesday, December 3, 2019

Target audience

 आई : अरे क्लास ला नवीन टी शर्ट घालतोयस?   बाहेर कुठे जाताना मग एकही बरा टी शर्ट राहात
 नाही. तोवर हे जुने होऊन जातील.

लेक : जाऊ दे न आई. Its ok.

अजून काही आईचं सुरू व्हायच्या आत , लेक तिथून कल्टी मारतो. आई आपल्या कामाला लागते. यथावकाश फेसबुक वर आपल्या पेज चे लाईक्स वाढले आहेत का, आपण टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोचतोय का हे बघत असते.......आणि.....
या विचारासरशी काहितरी लख्खपणे तिला जाणवून जातं. खरंच की , हेच ते नवीन टी शर्ट घालायचे कारण.
टा र्गे ट .........ऑ डि य न्स .
तो कुठे मिळणार आणि त्याकरता कसं प्रेसेंटेबल रहावं हे लेकाला बरोबर कळलं होतं.

Tuesday, November 19, 2019

100 words story.....tuch mazi lifeline.

तुझ्याशिवाय दिवस सुरू होत नाही आणि संपत ही नाही.  तू आहेस नव्या युगाचे प्रतीक. तू आहेस नव्या तंत्रज्ञानाचं फलित.  तू आहेस म्हणून आम्ही अपडेटेड राहतो, तू आहेस म्हणून आम्ही स्वतःला सर्वज्ञ म्हणवतो.  तुझ्या भरवशावर आम्ही आमच्या छंदांना वाट खुली करू शकतो.
तू शिरलास आमच्या आयुष्यात दोन घटका विरंगुळा  म्हणून,  पण आता मात्र तुझ्याशिवाय पान हलत नाही.
शाळेची नोटीस,  ऑफिसचे निरोप, परिक्षा नोंदणी, तिकीट बुकिंग,  बॅंक व्यवहार सगळं  तुझ्यामुळे सुकर होतं.
तू एक दिवस नसलास तर आमची पंचाईत होते.  आम्ही इतके अवलंबून आहोत तुझ्यावर कि तुझा क्षणिक विरह देखिल आम्हाला कासावीस करतो.
इंटरनेट........ होय, तूच आहेस आमची लाईफलाईन.
तुझे खूप खूप धन्यवाद.  

Sunday, November 3, 2019

Cancer


Cancer- बस नाम ही काफी हैं
या नावाशी जोडली गेलेली माणसं आणि त्यांच्या कुटुंबियांना वेगळे काही सांगायला नकोच.  प्रत्येकाची केस वेगळी . कॅन्सर ग्रस्त ते कॅन्सर मुक्त हा प्रवास धडकी भरवणारा असतोच.  त्यानंतर देखिल हा विळखा सुटता सुटत नाही,  आणि कॅन्सर मुक्त व्यक्ती ही आयुष्यभर पेशंट बनूनच राहते .
या रोगाचा जालीम ईलाज असणारे किमीथेरपी नामक दुधारी अस्त्र कॅन्सर मुक्त शरीरात आपला ठसा कायमचा उमटून जाते.  हे दुधारी शस्त्र जसं कॅन्सर पेशींचा खातमा करतं,  तसंच निरोगी पेशीं सुद्धा याच्या तावडीतून सुटत नाहीत.  या निरोगी पेशींनी बनलेले अवयव एकदा का या शस्त्राच्या अमलाखाली आले कि त्या अवयवांची क्रियाशीलता कायमची बाधित होते. 
ह्रदयासारखा महत्त्वाचा अवयव या किमीथेरपी च्या वावटळीत सापडला कि त्या पेशंटला कॅन्सर मुक्त का म्हणावे हा प्रश्न पडतो.  ह्रदयाच्या पंपिग या कार्याची शक्ती मंदावणे हा त्या आघाताचा ठळक परिणाम.
याचा सर्वात त्रासदायक उपपरिणाम म्हणजे वाॅटर रिटेंशन म्हणजे शरिरात साठलेल्या पाण्याचा निचरा आपोआप न होणे . त्या मुळे शरीर भर येणारी सूज. यावरचा उपाय आपल्या स्वतःच्या terms and conditions घालतच येतो . यावर दिल्या जाणार्या diuretics या स्वरूपाच्या गोळ्या हे साचलेले पाणी लघवी वाटे बाहेर काढून टाकतात. 
या गोळ्या रोज नियमित डोस वाटे कायम घ्यायला लागणार्या पेशंटला दर तासाला प्रचंड प्रमाणात लघवी होते आणि त्या करता कोणत्या ही स्थिती त अगदी आजारी असला तरी लघवी करता जावंच लागतं.
ह्रदयाने कमकुवत शक्ती ने का होईना पण निर्विघ्नपणे  ( म्हणजे अचानक बंद न पडता ) कार्य करत राहावे म्हणून इतर cardiac medicines सुद्धा दिली जातात.  ही औषधे देखिल आपले काम करत असताना नको ते उद्योग करून ठेवतात.  यांच्या कृपेने पेशंटचे बी पी कायम लोअर साईड ला राहते. 
या सगळ्या सोपस्कारावर 'कॅन्सर मुक्त ' पेशंट उर्वरित आयुष्य व्यतीत करतो.  या मोठमोठ्या side effects च्या जोडीला अशक्तपणा,  मंदावलेली हालचाल या कुरबुरी ठाण मांडून बसलेले असतात. अशा परिस्थितीत पेशंटची साधारण जीवन शैली म्हणजे स्वतःचे विधी करून इतर वेळी आराम अशा स्वरूपाची असते.
या मधे जेव्हा तुम्हा आम्हा कोणालाही वर्षातून एकदा होणारा viral/flu सारखा किरकोळ परकीय हल्ला या पेशंटला होतो तेव्हा खुडत खुडत का होईना पण सुरळीत चालू असलेलं त्यांचं शरीर इंजिन पार कोसळून जातं .
ही infections तापा सोबतच पेशंटच्या आधीपासून लो असलेल्या बी पी ला पार रसातळाला नेऊन ठेवतात.  पेशंटला hypotension ( extreme low bp ) मुळे आकडी यावी तशी चक्कर येत राहते. पेशंटला complete bedrest जेवण/ विधि सर्व जागेवर देऊन सुद्धा या चकरा थांबत नाहीत तेव्हा अखेर हाॅस्पिटल ची पायरी चढावीच लागते .
ही केस स्टडी आहे माझ्या  ' कॅन्सर मुक्त '  आई ची . 2014 साली पूर्ण झालेल्या कॅन्सर ट्रीटमेंट नंतर अजूनही सरासरी वर्षातून एकदा या minor infections करता आमच्या हाॅस्पिटल वारी ने यंदा दिवाळीचा मुहूर्त साधला. 
Mediclaim cover ची पुरेपूर वसुली करणारा पेशंट असं आम्ही on a lighter note म्हणत असतो.
त्याच lighter note वर काढलेला हा दिवाळी स्पेशल सेल्फी विश
Happy Diwali

Monday, September 23, 2019

Ttmm

#TTMM

तसं त्यांचं बरं चालायचं एकूणच. 
ती घरात येऊन 20 वर्ष होऊन गेली होती.
त्यांनाही ज्येष्ठ नागरिक होऊन 20 वर्ष होऊन गेली होती .
त्यांच्या अपेक्षांवर त्यांच्या दृष्टीने घरची मंडळी 100% कधीच खरी  ऊतरू शकत नाहीत हे ती पुरेपूर जाणून होती. त्यामुळेच 'सुपर...सून' होण्याचा तिने कधीच आटापिटा केला नाही .
एव्हाना त्यांचा रौद्रावतार पाहणं तिच्या अंगवळणी पडून देखिल काळ लोटला होता.  त्यांच्या स्वभावाचे सारे मूड्स सर्व छ्टा तिला माहीत होत्या.  आजवर तिने कधी मुद्दाम त्यांना जाणून बुजून दुखावले नव्हते .
 हो , 3/4 दा त्यांच्या आक्रस्ताळेपणा ला ठामपणे मोजकी ऊत्तरे दिली होती. पण तो विषय कुठे थांबवायचा हे तिला ठाऊक होतं.  त्यांनीही या 3/4 प्रसंगांचे कधी 5/6 होऊ दिले नाहीत.
त्यांना स्वच्छता,  टापटिपीची OCD आहे . घरातील कुठलंच डिपार्टमेंट आपलं नाही असं त्यांना मुळीच वाटत नाही.  सगळीकडे त्यांचं जातीने लक्ष असतं. तिच्या हाताला नीटनेटकेपणा चं वळण आहेच,  पण तिला टाईम मॅनेजमेंट वर भर द्यावा लागतो. तिच्या प्रायोरीटी ज वेगळ्या आहेत.  आत्ता लगेच , जरा वेळाने , सवडीने या तीन कॅटेगरीत तिला घरची कामं वाटून करायची असतात. पण त्यांना ते मान्य नसतं.
 दोघेही एकमेकांना नीट ओळखून आहेत.
 पण कधीच इतक्या वर्षांत 1/2 प्रसंग वगळता यावर चकार शब्दाने ते एकमेकांना बोलले नाहीत.  त्यांना पसारा दिसला कि त्यांचं समाधान होईपर्यंत ते आवरत राहतात.  तिला निराळे व्यवधान असेल तर त्या कडे ती सपशेल दुर्लक्ष करते.
 बाईने भांडी घासली कि किमान अर्धा पाऊण तास बाहेर निथळून झाली कि ती लावायला घेते . पण त्यांना तेवढा धीर धरवत नाही.  ते लगोलग ती लावायला लागतात.  फरशी पुसून होईपर्यंत काढलेलं कार्पेट खूपदा पुसून होण्यापूर्वीच त्यांनी पुन्हा घातलेलं असतं. 
भांडी लावायच्य त्यांच्या जागाही ठरलेल्या आहेत.  त्या सुनेच्या सोईच्या आहेत नाहीत याचं त्यांना काही देणं घेणं नसतं. 
सून पण बिलंदर !!!
 तिचा वावर असताना तिच्या सोईच्या ठिकाणी तिची भांडी ती ठेवून देते. परत काही वेळाने आल्यावर बघते तर भांड्यानी त्यांची जागा पुन्हा बदललेली असते.  दोघांच्या या हट्टापायी हा पाठशिवणीचा खेळ बिचार्या भांड्याना दिवसातून अनेकदा खेळावा लागतो.  गंमत म्हणजे या खेळा दरम्यान एका ही वावग्या शब्दाची देवाणघेवाण,  रुसवे फुगवे,  आदळआपट, नाराजी, शेरेबाजी याला दोघेही थारा देत नाहीत. 
शांतीत क्रांती........😁
त्यांना मिरची लोणचं आवडतं म्हणून त्यांचा लेक दोन तीन बरण्या भरून करून ठेवतो . कपाटात दोन आणि टेबलावर एक अशा ठेवलेल्या असतात.  कपाटात शिल्लक आहे असं 2/3 दा सांगून देखिल लक्षात न राहिल्या ने टेबलावर ची बरणी तळाला गेली कि ते बाजारातून एक किलो मिरच्या आणून ठेवत . मग तिने डोकं लढवलं,  टेबलावर ची बरणी तळाला जायच्या 8 दिवस आधी च कपाटातली बरणी ती बाहेर काढून ठेवू लागली. 
ते आता समजून जातात . पुन्हा सगळं न बोलून.
तिचं रूटीन काही त्यांच्या दृष्टीने आदर्श नसतं.  तरीही तिने स्वतःला लावून घेतलेली व्यवधानं,  अधूनमधून ची आऊटिंग्ज याबद्दल ते कधीच तिला टोकत नाहीत.  तिच्या आईला घरी कायमचं ठेवून घेताना ना तिने त्यांची वेगळी परवानगी मागितली,  ना त्यांनी कधी त्यावर आडकाठी केली. 
एकमेकांना न दुखावता,  घरात वादाचे प्रसंग न आणता,  एकमेकांच्या न आवडणार्या सवयींकडे कानाडोळा करत आपल्या मर्जीने जगण्याचं तंत्र तिला जमू लागलं आहे. 

TTMM हे तू तू ....मैं मैं न होता, 
तुमचं तुम्ही ....माझं मी करण्याचा सूज्ञपणा दोघेही बाळगून आहेत. ( touchwood ) 🙂

Tuesday, September 3, 2019

Dodpanch

#दो_और_दो_पांच#

लहानपणी जेव्हा अमिताभ चा हा सिनेमा पाहिला तेव्हा च या नावाबद्दल कुतुहल वाटलं  होतं . चित्रपटातील दोन नायक छोटी सरधोपट सुरवात करून अनपेक्षित उत्तरा पर्यंत येतात आणि
 हम वो है जो दो और  दो पांच बना दे ..... करत मिरवतात.
काहींच्या आयुष्याचं गणित देखिल असंच असतं. 
ठराविक गोष्टी जुळून आल्या कि सगळ्यांना साचेबद्ध ऊत्तरे मिळतात असा आपला समज असतो. पण मुठभर लोकांच्या बाबतीत तसे होत नाही.  त्यांच्या 2+2 चं ऊत्तर नियतीने 5 दिलेलं असतं.
एकुलत्या एक नवसाने झालेल्या व्यक्ती ची जडणघडण कशी असेल? याचे ठोकताळे आपण बांधून टाकलेले असतात.  अती लाडात वाढलेली , माणसांची आवड नसलेली अशीच असणार हा अंदाज लावून आपण मोकळे होतो. सुशिक्षित, सामाजिक संस्कार असलेल्या घरातून मुलांना अत्यंत सुरक्षित आणि मोकळे वातावरण मिळणार च असं आपण गृहीत धरतो.
 कधीकधी वरवर सुरळीत वाटणार्या परिस्थिती त काहींना वेगळे च अनुभव वाट्याला येतात  .
असे  वेगळे अनुभव घेऊन वाढलेल्या व्यक्ती मूळ स्वभावानुसार एकतर बंडखोर तरी होतात किंवा सतत दबून राहिल्यामुळे स्वत्व तरी हरवून बसतात.  मी आणि अभिजीत दोघेही या दुसर्या कणाहीन अवस्थेत मोठे झालो.  बालपण तसंही भाबडंच असतं. पण वय वाढत जाते तसे आपल्या आणि इतरांच्या घरातील तफावत जाणवायला लागते. त्याच्याशी दोन हात करता येत नाही हे लक्षात येते.  त्याच्या शी शक्य तितके जुळवून घेण्यात मग व्यक्तीमत्वाची असंख्य शकलं उडतात आणि त्याची दाहकता एखाद्या अनिष्ट छायेसारखी आयुष्यभर घिरट्या घालत राहते. 
ही आमची दो और दो  पांच ची गणितं अवघड जागेची दुखणी असतात.
ती सहज कुणालाही सांगण्याजोगी नसतात. मुळात ती आहेत हे मान्य करायलाच काही वर्षे लागतात.  मान्य करायचं धाडस जमलं कि ऊरलेली उमेदीची वर्षे त्याच्याशी नमतं घेण्यात निघून जातात . आपल्या अवतीभवती बरंच काही घडून जातं तोवर.  बरंच काही हातून निसटून ही जातं . आपण मात्र या चक्रात गटांगळ्या खात राहतो .
40 शी पार करेपर्यंत या अवघड दुखण्यांशी झगडत बाहेर पडून आपलं अवकाश चाचपडून स्वत्व कमावलेलं असतं.  झाल्या गेल्या परिस्थिती ला , त्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेल्या माणसांना एव्हाना मनातल्या मनात माफ ही करून टाकलेलं असतं . आपण पालक झाल्यावर या गढूळ वातावरणाचा लवलेश ही आपल्या मुलांना जाणवू नये म्हणून आपण कमालीचे दक्ष असतो .
पण क्वचित प्रसंगी जुन्या खपल्या निघाल्या कि उघड्या जखमेतून क्लेशकारक आठवणी भसकन बाहेर येतात. 
मित्रांच्या गप्पांमधे अगदी गृहीत धरल्यागत आईवडिलांबाबत  उदो उदो करणारे  किंवा सासूसासर्यांबाबत नाकं  मुरडणारे विषय चघळले जातात. आम्ही अशावेळी कसनुसं हसून वेळ मारून नेतो.
सोशल मीडिया वरच्या ' भरलेलं घर' , ' माहेरची माया' , ' बाप नव्हे मित्र' टाईप साखरेच्या पाकात बुडवलेल्या पोस्ट्स चा भडिमार न वाचताच आम्ही पुढे जातो. 
आईवडिलांच्या महत्त्वाच्या समारंभाला मुले त्यांच्या शी निगडीत आठवणी शेअर करतात तेव्हा हलकेच एक  असूयेची लहर उमटून जाते .
नियती काही अगदीच निष्ठूर नसते . एक पारडं कमी भरलं तर दुसर्या पारड्यात भरभरून देते.  आणि या अनुभवातून जाउन देखिल आपल्या माणसांबद्दल जराही कडवटपणा न धरण्याची शक्ती बाप्पा देतो.
और क्या चाहिए.........


Saturday, June 29, 2019

Podbean

#podbean_palmacres#


कुठलीही नवा बदल स्वीकारायला आपण सहसा पटकन तयार होत नाही .
त्याच न्यायाने हि गोष्ट मीही टाळत होते .

 खूप करणं होती माझ्याकडे . तीही अगदी व्हॅलिड .
आहे ते काय वाईट आहे , कुठे झेंडे फडकवायचेत , आहे ते कोणी वाचत नाही ,
नेहमी वाचणारे इथेच वाचणार आहेत , ते कुठे तिथे येणार आहेत , वगैरे वगैरे.

सांगणारे नुसतं काहीतरी किडा डोक्यात सोडतात , त्यांना काय होतं मराठी वाचायला .... वगैरे वगैरे .
तर या मंडळींनी , म्हणजे माझ्या शाळा मित्रांनी मला माझे मराठीतले लिखाण (?) ....ब्लॉगपोस्ट्स सगळं ऑडिओ फाईल्स मध्ये रूपांतरित करायला उद्युक्त केलं .
"गो विथ द  टाइम्स " असल्या सगळ्या शेंड्या लावून घोड्यावर बसवून ,
अगं तुझं लिहिलेलं वाचायची खूप इच्छा असते गं ..... पण .....
असं म्हणून प्रसंगी हरबर्याच्या झाडावर चढवून झालं .
आणि शेवटी हो नाही करता करता .... त्यांचं ऐकायचं ठरवलं .
 आणि लागले कामाला ( कि नसत्या उद्योगाला ?)
जाणकारांना आधी विचारलं , काय बुआ आहे हि पॉडकास्ट नावाची भानगड ?
 गूगल केलं तरी नक्की कोणतं ऍप आपल्या गरजेपुरतं सुटेबल आहे या दृष्टीने मग स्वतःच शोधाशोध सुरु केली . एका मैत्रिणीने पण तिच्या परीने  मदत केली. थोडी दिशा मिळाली .
आणि मग पॉडबीन नावाचं हे ऍप सापडलं .
इन्स्टॉल केलं , पहिली एक ट्रायल पोस्ट रेकॉर्ड केली , आणि एकूण प्रकार जमतोय असं आता वाटायला लागलंय. 
तर सोशल मीडिया च्या परंपरेला अनुसरून ...  ....
पॉडबीन वरील palmacres या ऑडिओ ब्लॉग  ला देखील फॉलो आणि आवडल्यास लाईक करा हे आवाहन माझ्या इकडच्या मित्रपरिवाराला करते .
शंभर च्या वर लाईक्स किंवा हजाराच्या वर फ्रेंड्स असा जरी किमान बेसिक पॉप्युलॅरीटी चा निकष असला आणि त्यात दूर दूर तक मी कुठे बसत नसले तरी माझ्या थोडक्या पण मोलाच्या माणसांच्या  कौतुकाने आणि उभारी च्या शब्दांनी मला सगळं भरून पावलं आहे . 

Thursday, June 27, 2019

DusreBalpan

#दुसरे_बालपण#

घरातील ज्येष्ठ वृद्धत्वाकडे झुकू लागले, कि त्याच्या खालोखालच्या पिढीने खूप साऱ्या गोष्टींची मनोमन तयारी करून ठेवावी . घरात पुनश्च बालपण अवतरणार याची खात्री बाळगावी . फक्त मुलांचे बालपण संपून ज्येष्ठांचे चालू झाले एवढाच काय तो फरक . आपल्या मुलांचे नखरे , त्रागा , हट्ट , इत्यादी थरार आपण ज्या संयमाने (?) हाताळले , अगदी तितकाच किंवा त्या हि पेक्षा पराकोटीचा संयम दाखवायची वेळ पुन्हा आपल्यावर येऊन ठेपली आहे हे ओळखावे . संयमाचा कडेलोट झाला कि मुलांवर खेकसण्याचे अथवा एक रट्टा घालण्याचे हत्यार तरी बाहेर काढता येत होते , इकडे ती हि सोय नाही .
ज्येष्ठांचं बालपण जपताना मात्र असली हत्यारं म्यानात गप पडून राहतात . उलट जास्तीत जास्त काळजीने ज्येष्ठांची हि फेज सांभाळावी लागते . कधी कधी एकटेपणामुळे , किंवा एखाद्या आजारपणामुळे , किंवा कधी आयुष्याची वजाबाकी करून आलेल्या वैफल्यामुळे आधीच हळवे  झालेले  यांचे मन कधी कोणाच्या इतक्याश्या बोलण्याने दुखावेल सांगता येत नाही . आपल्या आवाजातील बारीकशा चढउताराने किंवा आपल्या देहबोलीत झालेल्या फरकाने देखील ज्येष्ठांना नाकारलेपणाची जाणीव होऊ शकते .
अगदी आपल्याच दोन मुलांमध्ये जसा दोन टोकांचा फरक असतो , अगदी तसाच फरक या ज्येष्ठांमध्ये असतो . त्यामुळे प्रत्येकाला समजून घ्यायची पद्धत एकसारखी असूच शकत नाही .
काही ज्येष्ठ अगदी उत्साहाचे झरे असतात . त्यांना आयुष्य भरभरून जगण्याचे गमक गवसलेले असते . ते सदैव स्वतःच्या डोक्याला , मनाला आणि शरीराला चालना मिळतील अश्या छंदात , उद्योगात रममाण असतात . त्यांची सदा सर्वदा सकारात्मक वृत्ती अतिशय कौतुकास्पद असते .
 यातल्या काहींना मात्र गमतीदार सवयी असतात . समोर श्रोता मिळाला कि आपल्या उद्योगांचा पाढा त्याच्या समोर सतत वाचत राहायचा मोह यांना आवरत नाही . एवढा एकच विषय चवी चवीने चघळण्याच्या नादात ते इतके मग्न होतात कि समोरचा कंटाळला असेल याचे भान अनेकदा सुटत जाते . किंवा इतर काही ज्येष्ठ सतत स्वकौतुकात रममाण असतात . आपले आजवरचे कर्तृत्व , आपण कमावलेले मान मरातब याची सतत समोरच्यापुढे उजळणी चालू असते .
असल्या छोट्या मोठ्या गमती त्यांच्या हातून अगदी अनावधानाने किंवा वयपरत्वे आलेल्या  असुरक्षिततेमुळे हि घडत असतील , अगदी मान्य आहे . उद्या आपण देखील असेच विनोदी वागणार आहोत हि देखील जाणीव आहेच , पण शेवटी त्यांचे निकटवर्तीय म्हणून लोकांपुढे त्यांचे हसे होत आहे हे आपल्याला बघवत नाही . आपला हेतू कितीही शुद्ध असला तरी बऱ्याचदा तो त्यांच्यापर्यंत पोचतच नाही , पोचला तरी कधी विपर्यास होऊन पोचतो आणि आपल्याच पदरी कटुता येते . त्यापेक्षा आपण निमूट गप्प राहणं पत्करतो . या बारीक सारीक गोष्टी सोडल्या तर यांची हि फेज कोणालाच फारशी त्रासदायक नसते.
त्रास होतो तो वेगळी च  मानसिकता बाळगणाऱ्या ज्येष्ठांचा.
 हि मंडळी अगदी मुळात नकारात्मक नसतीलही . पण आयुष्यातील पहिल्याच आलेल्या वादळाने हे लोक जे हेलकावतात ते त्यातून कधी उभारी घेतच नाहीत . आयुष्य सरळसोट नसतेच, त्यात चांगले वाईट दिवस असणारच हे सोपे गणित त्यांना सोडवायचे नसते . त्यांच्या कल्पनेपलीकडचं आयुष्य देखील त्यांच्या वाट्याला येऊ शकतं हेच त्यांना मान्य नसतं  . आणि काहीच मनासारखं घडत नाही या समजुतीला घट्ट चिकटून ते नकारात्मकता उराशी बाळगून जगत राहतात. इतकंच नाही तर या सर्व मनाविरुद्ध मिळालेल्या जगण्याचं खापर आयुष्यभर दुसऱ्यावर फोडत राहण्यात यांचं आयुष्य खर्ची पडतं . त्यासाठी स्वतः जबाबदारी घ्यावी आणि प्रयत्न करावेत हे काही त्यांना करायचं नसतं . किमान बिकट परिस्थितीतून सावरण्यासाठी  आपल्या माणसांना उभारी देणं सोडाच , त्यांना सतत टोचून बोलत राहणं , त्यांचं मानसिक खच्चीकरण करणं इतकंच त्यांनी आयुष्यभर केलेलं असतं  .
हीच नकारात्मकता घेऊन जेव्हा ते वृद्धत्वात प्रवेश करतात , तेव्हा ना ते स्वतः सुखी होतात ना त्यांना संभाळणाऱ्यांना सुख देतात . म्हणूनच मग मुलं नातवंडांनी भरलेल्या घरात सुद्धा यांचे सदैव मूड गेलेले असतात . आपल्या रुटीन ची बारीकशी जरी गोष्ट इकडे तिकडे झाली तरी यांना संकट कोसळल्यासारखं  वाटतं . कुठलाही विषय वळवून हे सतत स्वतःच्या केविलवाण्या (?) परिस्थितीकडे नेत  राहतात आणि उसासे टाकीत राहतात .
यांच्या  असल्या नैराश्याने भरलेल्या सान्निध्यात  एका मर्यादे नंतर यांना संभाळणाऱ्यांना मग फार काळ राहणं अशक्य होऊन जातं . त्यांचं सगळं कर्तव्यभावनेने करत असताना , त्यांच्या पाशी बसून कुठल्याही प्रकारे शेरिंग मात्र घरातले करू शकत नाहीत. हि खंत राहतेच मनात पण आपली मनस्थिती पॉसिटीव्ह राहण्याकरता अगदी नाईलाजाने घरातल्यांना त्यांच्या पासून अलिप्त राहावंच लागतं .
"मरे एक त्याचा , दुजा शोक वाहे , अकस्मात तोही पुढे जात आहे "
 समर्थांच्या या श्लोका  प्रमाणे आपल्या वर देखील वयाचा असा आघात होणार आहे , आपण देखील आपल्या दुसऱ्या बालपणात नवनवीन गमती जमती करणार आहोत , याचे भान ठेऊन आत्तापासूनच आपल्या सवयी तपासात राहूया , किमान आपले दुसरे बालपण सावरताना आपल्या मुलांना सकारात्मक ऊर्जा आपण देऊ शकू इतके तरी स्वतःला आत्ताच बजावत राहूया .