Sunday, March 8, 2020

Samaanta6

समानता माझा हक्क असला तरी ती एक जबाबदारी सुद्धा आहे. ही जबाबदारी कशी निभावून न्यायची?
तर मुलींनी देखिल जुन्या समजुतींना बगल द्यायची गरज आहे. समस्त पुरुष जातीला एका तराजूत तोलणं योग्य नाही. कुठल्याही स्टिरियोटाईप मधे न अडकता खुलेपणाने जगाला सामोरं जायला हवं.
 त्याची आई हाऊसवाईफ आहे म्हणजे तो आयतोबा असणार, त्याला बहिण नाही मग त्याला काय कळणार, अमुक पोटजात म्हणजे अमूक सवयी, यातून बाहेर यायला हवं. लग्नाच्या मॅट्रिमोनियल साईट्स वर मुलींना किती विस्तृत अपेक्षा नमूद करता येतात. त्यातही कधीकधी अति कीस काढला जातो, किती वस्त्रगाळ करा शेवटी अॅडजस्टमेंट चाच मामला असतो सगळा हे मुलींनी सुद्धा समजून घ्यायला हवं. आपल्यापेक्षा जास्त शिक्षण आणि जास्त पगार असलेला नवरा हवा यात मुलींना तडजोड नको असते. पण या वरचढपणाचा मान राखायची तयारी सुध्दा मुलींनी ठेवावी.
एक ठराविक माइंडसेट घेऊन मुलींनी सासरी प्रवेश करू नये. चार डोकी एकत्र आली कि कुठेही मतभेद होणारच. सासू चुकली तर त्याचा गहजब करणार्या किती मुली आईही चुकते हे लक्षात घेतात? सासूने संसारात ढवळाढवळ करू नये ही अपेक्षा रास्तच पण तेच आईने केलं तर त्याला प्रेम म्हणणं ही विषमता नाही का? समानता हवी तर आईची चूक सुद्धा ठळकपणे मान्य करता यायला हवी. तिच्या चुकीच्या सवयी तंतोतंत उचलून सासूच्या सवयींना नावं ठेवणं सोडून द्यायला हवं. सासूच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करणे, सासरच्या चांगल्या पद्धती खुलेपणाने अंगिकारणे म्हणजे समानता.
तेच आईलाही लागू पडतं. मुली आणि सुनेचे एकाच खुलेपणाने कौतुक करणे म्हणजे समानता. कधी एखाद्या प्रसंगी लेक चुकीची पण सून बरोबर असू शकते हे स्वीकारणे म्हणजे समानता. एकमेकींच्या वरचढ राहण्याचा खटाटोप नणंद भावजयींनी कधीच करू नये. आईच्या नजरेत भावजय खाली राहिली तरच आपला वरचष्मा राहील ही भावना लेकीने मनातून काढून टाकायला हवी. विहिणींनी देखिल आपली मुलं ही आपल्या आईपणाचं मापदंड न मानता मुलांना त्यांच्या स्वतंत्र विचारसरणी ने वागू द्यावं.
आपल्या पैकी इतक्या जणी इतकं सुंदर लिखाण करतात, कितीतरी जणी आज इकडे रॅन्क होल्डर आहेत. त्यांच्या बाबतीत कौतुक वाटायचं सोडून जर आपल्याला त्यांच्या गृहिणीपणावर शंका घ्यावीशी वाटली, कसं काय लिहितात सहा दिवसात सहा लेख , वेळ बरा मिळतो असे विचार शिवले तरी मनाला लगेच दटावता यायला हवं.
एकूणच बायकांनी एकमेकांना स्पर्धक न मानता निर्लेप दृष्टीने पाहिलं तर समानता आपोआप रुजेल. 

Samaanta5

आतापर्यंतच्या लेखमालेत आपण राहुल आणि रुचिता च्या रुपाने थोडं आजचं थोडं उद्याचं असं आपल्या घरातील नातेसंबंधांमधील समानतेचं प्रातिनिधिक चित्रण बघितलं. या श्रुंखलेतील शेवटच्या लेखात समाजाकडुन कोणत्या प्रकारची समानता स्त्रीला अपेक्षित आहे त्याचा परामर्श घेऊया.
आज घरी आई मारे ठरवते मुलामुलींना एक समान वाढवायचं. तसे प्रयत्न ही ती करते. मुलाला बेसिक स्वैपाक शिकवते, घर टापटीप ठेवायला प्रोत्साहन देते, घरातील इतर बारीक सारीक कामं करायला लावते. पण बाहेर अजूनही अशा आईला आळशीपणाचं लेबल लावलं जातं, मुलाला आपणच सगळं करतो बाहेर कोणी करत नाही अशी परिस्थिती दिसते. मुलाला दुसर्या मुलींशी वागाबोलायची रीत आई घरी लावू शकते. पण आपल्या मुलीशी बाहेर कोण कसं वागेल याची तिला खात्री देता येत नाही. घरी मुलींना सर्व मोकळीक देणारी आई बाहेरच्या जगापुढे मात्र हतबल होते. बाहेरचे जग अजून तसेच आहे,  समाजाची मुलींना बघायची नजर ना आजवर बदलली ना कधी बदलेल. त्यामुळे आजही मुलींनी करायचा पेहराव, बाहेर रहायच्या वेळा किंवा संगत या बाबतीत आईला फार पुरोगामित्व दाखवता येत नाही.
जेव्हा समाज पुरुषाला आणि स्त्रीला 'माणूस ' म्हणून बघेल तेव्हा येईल खरी समानता.

जेव्हा रात्री अपरात्री बाहेर रहायची भिती स्त्री इतकीच पुरुषाला ही वाटेल..
जेव्हा केलेल्या गुन्ह्याच्या शिक्षेची जबरदस्त दहशत वाटेल....
जेव्हा दुष्कृत्याची लाज पिडीते ला न वाटता गुन्हेगाराला वाटेल...
जेव्हा सर्व स्तरातील पुरुषांना नाही ऐकायची सवय लागेल ...
तेव्हा समानता येईल.

जेव्हा स्त्रीदेहाचे बिभत्स चित्रण विकलं जाणं थांबेल ...
जेव्हा जास्तीत जास्त विधवा आपल्या मुलामुलींची लग्न स्वतः लावतील...
जेव्हा सर्रास एकुलत्या एक लेकी आईवडिलांचं क्रियाकर्म करतील...
तेव्हा येईल खरी समानता.

पण आज बघावं तर वेगळंच चित्र आहे. साधं महिला दिन साजरा होत असताना बघा...
महिला दिनी व्हाॅट्सअॅप वर दर वर्षी एक पोस्ट सतत फिरत असते.
ज्यात स्त्रीवर्गाचं तिळमात्र कौतुक नसतं, किंबहुना खिल्लीच उडवली जाते.
' रोजच महिला दिन आणि रोजच पुरूष दीन.'
वाचून मौज वाटते आणि यात दडलेल्या विसंगती मनात फेर धरू लागतात.
इकडे पहावं तर चित्र काय आहे......
स्त्रियांना जेव्हा  स्वतःसाठी वेळ काढायचा असतो ....
( पार्लर, खरेदी, स्नेहभेटी, सहली, सोशल मिडिया, वाचन, लेखन, नुसतं शांत बसणं )
 ( यादी क्रमवारी प्रमाणे नाही याची नोंद व्हावी )
 त्या अगोदर करायच्या गोष्टींची भलीमोठी यादी मार्गी लावायची असते.
घरातल्या वयस्क, बाल ( यात बालपण कधीच न सुटलेला नवरा देखिल येतो ) वगैरे मंडळींच्या जायच्या यायच्या , खाण्या पिण्याच्या वेळा सांभाळूनच स्त्रियांचा प्रोग्रॅम ठरतो.
दीन पुरूषांची मात्र हक्काची रविवार ची भेेट , मनात आलं कि लंच डेट, मित्रांसोबत अचानक ठरलेलं आऊटिंग कधीच घरच्या व्यवधानांमुळे चुकत अथवा आपल्या सारखं फाॅरेवर रीशेड्यूल होत राहात नाही.
एखाद्या दिवशीची ही कथा तर मोठ्या गैरहजेरीचं विचारूच नका. एखादं मोठं आजारपण, कामानिमित्त टूर, अथवा लेडिज स्पेशल ट्रीप या पैकी काहीही घडायचं असेल तर आपल्याला हमखास विचारला जाणारा प्रश्न
 ' मग घरचं सगळं कोण बघेल ' दीन पुरूषांना विचारल्याचं कधीही ऐकिवात नाही.

'माझी एक गोष्ट जागच्या जागी नसते आणि ती मला मी स्वतः सोडून इतरांनी शोधून द्यावी' असं म्हणत घर डोक्यावर घेणारे दीन पुरूष जेव्हा त्यांच्या बायकांना ' तू कर की तुला हवा तो कोर्स , शीक त्यात पुढे, मी कधीच अडवलं नाहिए ' असं छातीठोकपणे सांगतात तेव्हा बायका का आपलेच पाय मागे खेचत राहतात हे कळतं. स्वैपाकात विशेष रस घेणार्या दीन पुरूषांच्या बायकोची मजाच मजा असा ही समज करून घेणारे असतात. पण त्या ही बायकांचा दिवस ओट्यापाशीच सुरू होऊन ओट्यापाशीच संपत असतो ही वस्तुसथिती आहे. 
असो....माॅमस्प्रेसो द्वारे या ह्रदयी चे त्या ह्रदयी करत राहू एकमेकींची पाठ थोपटत राहू
समानतेचा जागर चालू ठेवू......जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

Saturday, March 7, 2020

Samaanta1

#भाग_1_प्रियकर_प्रेयसी
"हॅलो,  आज भेटतोय न आपण?"
"हो, नेहमीच्या ठिकाणी आणि त्याच वेळी "
" ठीक आहे, ये वेळेवर. "
राहुल नेहमीप्रमाणे 10 मिनिटे ऊशीरा आला. तोवर रुचिता टेबल पकडून बसली देखिल होती.राहुल ने बसताना नोट केलं कि रुचिता ने तिची ऑर्डर सुद्धा दिली आहे. राहुल ला भूक लागली होतीच. त्याने ही स्वतःची ऑर्डर दिली आणि रुचिता कडे एक कटाक्ष टाकला. मॅडम फोन वर बिझी होत्या पण चिडलेल्या वगैरे काही वाटत नव्हत्या. राहुल ने अंदाज घेत संभाषण सुरु केलं.
"अगं निघालो आणि रवी ने थांबवले, त्याला इस्टेट एजंट चा नंबर हवा होता मग त्याच्या शंका निस्तरेपर्यंत 5/7 मिनिटे गेली. "
रुचिता ने मान वर करत फोन बाजूला ठेवून दिला. छान स्माईल देत राहुल ला म्हणाली, "अरे एवढं काही नाही, इट्स ओके, मी माझा ज्यूस मागवलाय, हा बघ आलाच."
" ओके, आता बोल, घरचे तयार आहेत ना आपल्या लग्नाला?" काय म्हणाले, कधी भेटायला येतायत आमच्या कडे?"
"राहुल, घरी सगळ्यांना तू पसंत आहेसच,  पण तुझ्या माझ्या घरच्यांना पुढे इनव्हाॅल्व करण्या आधी काही बाबी आपल्यातच आधी फायनलाईज करूया, म्हणजे नंतर गैरसमज नको."
"रुचिता, गेली 5 वर्ष ओळखतो आपण एकमेकांना, काय आहे तुझ्या मनात मला आहे अंदाज,  पण हरकत नाही, तुला माझ्या बद्दल खात्री नसेल तर एकदा सांगूनच टाक. "
"तसं नाही रे , पण आपल्या पालकांना जे सांगू त्यात आपल्यात तफावत नको  म्हणून फक्त एकदा सगळं क्लिअर करू. हे बघ, रजिस्टर लग्न करायचं तर आपलं ठरलं आहेच, पण नंतरच्या सगळ्या गोष्टींचा खर्च आपण दोघांनी उचलायचा यावर आपलं एकमत हवं. म्हणजे अगदी रिसेप्शन, पुढे वर्षसण वगैरे सगळंच. आणि हो, ज्या पाहुण्यांना आपली ओळख करून द्यावी लागेल आणि जे परत कधीच भेटायची शक्यता नाही असे  लोक बोलवायचे नाही.  उगाच गावजेवण घालायचं नाही आपल्याला. बाकी आपल्या माणसांची सगळी हौसमौज आपण करू .... खरेदी, मेंदी, ब्युटिशियन , फोटोग्राफी,  छोटा वाद्यवृंद ठेऊ. "
"झालं तुझं सांगून, का अजून काही बाकी आहे? आता माझं ऐक, आधी आपण आपल्या नवीन घराची छोटी पूजा करून घेऊ, कारण लग्नाच्या तयारी बरोबर आपल्याला नव्या घरात शिफटिंग ची पण तयारी करायची आहे. तिकडे आपण दोघेच राहणार आहोत.  तू एकटीने का म्हणून तुझं घर,  तुझी माणसं सोडून यायचं,  मी पण माझं घर माझी माणसं सोडून येणार,  आणि आपण आपला संसार उभा करायचा. मलाही कळेल आजवर सगळं आईच्या हातचं आयतं सोडून यायचं म्हणजे काय असतं. मला कधी तिची किंमत कळणार,  मला कधी कळणार कि सवयीची खोली, खण , बाथरूम,  वातावरण सगळं सोडून देणं किती जिवावर येतं . मग नवीन जागेशी,  माणसांशी जमवून राहायचं सवयींना मुरड घालायची हे ही मला जरा कळूदे. आणि वेगळे राहिलो तरी कोणीच कोणाची जबाबदारी झटकत नाहियोत,  आपण दोघांनी आपापल्या माहेरी  अडी अडचणी ला अगदी आर्थिक सुद्धा मदत करत रहायची आहे, त्यांच्या कडे जायचं आहे,  त्यांना बोलवायचे आहे. कळलं का मॅडम,  का गं बोल की  काही तरी? "
"राहुल, मी काय बोलू, खरंच,  तुला अजून मी पुरतं ओळखलंच नाही रे, समानतेचा खरा अर्थ तुला समजलाय.
मी साशंक मनाने काही बोलायला आले आणि तू तर मला न मागताच भरभरून देऊन मोकळा झालास.
आय रिस्पेक्ट यू......."
" आय एम ऑनरड मॅडम ,  पण ते रिस्पेक्ट च्या जागी दुसरं काहीतरी ऐकायला आवडलं असतं .......



KarmatNahi


तू सदैव जमवून घेतलंस , मी फक्त नवरेशाही गाजवली

आज 50 वर्ष होऊन गेली आपल्या संसाराला.
त्या वेळी एकच रिवाज. नवरा म्हणेल ती पूर्व दिशा.
मीही तसाच वागलो.  तू माझ्या हो ला हो करत गेलीस.
सदैव माझ्या करता झटलीस,  माझ्या घराला घरपण आणलंस.
त्या वेळी या तुझ्या समर्पित वृत्ती ची कुठलीच दखल मी घेतली नाही.  तू असंच वागणं अपेक्षित होतं, त्यात काय मोठं,  उलट तू तशी वागली नसतीस तर मी ते मुळीच खपवून घेतलं नसतं.

आज एक एक प्रसंग आठवला तरी मला स्वतःची लाज वाटते.  तू तुझ्या माहेरी गेली होतीस. येणार होतीस त्याच्या एक दिवस उशीरा आलीस, मी स्टेशन वर तुला घ्यायला आलो होतो,  तू अप्पांबरोबर गाडीतून उतरल्या उतरल्या मी त्यांच्या समोर तुला फैलावर घेतलं. किती हिरमोड झाला असेल तुझा.
तुला सिनेमा बघायची भारी हौस. मला काही कामामुळे तुला नेणं  शक्य नसायचं, पण तू मैत्रिणींच्या बरोबर जावंस हेही मला कधी चाललं नाही.
तुझं असं विश्व कधी तू बनवू शकली नाहीस, मी आखून दिलेल्या पारिघात जमेल तसं वावरलीस कोणत्या ही  तक्रारीविना. पाहुणे रावळे सांभाळलेस , सासू ची सेवा केलीस तरी माझं कधी समाधान व्हायचं नाही.
मी मात्र आज हे उद्या ते करत करत घरगुती व्यापात तुला अडकवत राहिलो.

जेव्हा कुठेतरी जाणवायचं कि तू नाराज आहेस तेव्हा मी एकच करायचो, दागदागिने आण, साड्या घे, पण तुला हवा होता मायेचा शब्द पण मी समजून घेण्यास असमर्थ होतो. मला लोकसंग्रह करायची भारी हौस . पण घरच्यांना कसं आपलेपणाने बांधून ठेवावं हे मला कधी समजलंच नाही.

आता आज हे सगळं का बोलतोय मी असं तू म्हणत असशील , पश्चात बुद्धी दुसरं काय.....
आज लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा करायला माझ्या सोबत तू नाहीस.......
आता हाती उरलंय फक्त तुझ्या अगणित फोटों कडे बघत राहणं.
आता हाती उरलंय फक्त तुझ्या पुतळ्याला हार घालणं.
माणूस आपल्या सोबत असतो त्या वेळी आपण किती गृहीत धरतो हे आता कळतंय.
नियतीने मारलेल्या या एका चपराकी ने मी भानावर आलो.

पण ........
करामत नाही.......घर घर वाटत नाही......




Samaanta

राहुल आणि रुचिता चा समानतेचा संसार आता वीस वर्षांचा झाला. त्याला आता मुरलेल्या लोणच्याची चव आली. ज्येष्ठांचं छत्र एकएक करत हरवत गेलं. सासुबाई होत्या तोवर दोघी मिळून हौशी ने सर्व सण साजरे करीत होत्या. रुचिता ची कधी पाळी ची खेप असली तरी सासूबाई एक हाती सगळं निभावून नेत होत्या. पण त्यांनी जगाचा निरोप घेतल्यावर मात्र राहुल, रुचिता ला काही प्रॅक्टिकल निर्णय घ्यावे लागले. राहुल ची बहिण रेवती तोवर यूएस ला सेटल झाली होती. त्यामुळे दोघांनी विचाराअंती ठरवलं कि आता पाळी चे निर्बंध झुगारून द्यायचे. त्याही दिवसात त्याच उमेदीने आणि उत्साहाने घरचे गौरी गणपती, दिवाळी साजरे करायचे .
सासुबाई गेल्यावर सासरे अजूनच थकले. रुचिता च्या आईच्या मागे देखिल आजारपण लागले. राहुल आणि रुचिता वर दोन्ही कडच्या जेष्ठांची जबाबदारी असे. प्रत्येकाची औषधे, लॅब रिपोर्ट, चेकिंग सगळं नियमित बघावं लागे. पुन्हा एकवार सोयीचा मार्ग काढत राहुल ने त्याच्या वडिलांचं आणि रुचिता ने तिच्या आईचं बघायचं ठरवलं. यामुळे दोघांना ऐका पेशंटवर व्यवस्थित लक्ष देणं सोपं पडे.
एरवी दोघांचं ऑफिस  आणि घर असं रूटीन चालूच होतं.
ऑफिसमध्ये आज एकच चर्चा चालु होती. वॅलेंटाईन डे प्लॅन्स ची. सगळे आपापले प्लॅन्स सांगत होते.
रुचिता म्हणाली, " आज मी घरीच थांबणार आहे मुलांच्या जवळ कारण राहुल चा आज मित्र मैत्रिणींच्या बरोबर डिनर प्लॅन आहे. " सगळ्यांचे डोळे विस्फारले.
कलीग म्हणाली, " तू हे इतक्या कूलली सांगत्येस? मी तुझ्या जागी असते तर घर डोक्यावर घेतलं असतं." रुचिता म्हणाली, " अगं  एवढं काय त्यात? मी नाही का माझ्या मित्रमैत्रिणीं बरोबर आऊटिंग ला जात? तो ही एरवी जातोच, तसंच हे आजच्या दिवशी प्लॅन केलं तर बिघडलं कुठं? माझं काही ठरलं असतं तर मीही गेले असते.
असंच काही दिवसांनी राहुल च्या ऑफिसमध्ये लंच ब्रेक दरम्यान वेगळे प्लॅन ठरत होते.
कलीग म्हणाला," चला या वर्षी आपण आपली जेन्टस ओन्ली बॅन्काॅक ट्रीप ठरवूनच टाकू."
" अरे पण घरी काय सांगणार?"
" सांगायचं की सरळ, त्यात काय, बाॅईज जस्ट वाॅन्ट टू हॅव सम फन, एक ब्रेक हवाच यार, एरवी संसार करतोच आहोत ना इमानेइतबारे." राहुल म्हणाला," डोन्ट काऊन्ट मी इन, तुमचं चालू द्या. "
" का रे बाबा, घाबरतोस की काय रुचिता ला सांगायला?"
" नाही रे, सांगायला नाही घाबरत. पण आपल्याला हवा तो चेंज तिला देखिल घ्यावा असं उद्या वाटलं तर मी तिला कोणत्या तोंडाने अडवू शकेन? ती तिथे जाऊन आपल्या सारखं 'एन्जाॅय' करून आलेली मला कितपत आवडेल, मग केवळ मी पुरुष म्हणून हवं ते करणं मला पटत नाही. व्हाय शुड ओन्ली बाॅईज हॅव ऑल द फन?
समानतेच्या या सडेतोड युक्तिवादाने सगळ्यांची तोंडं बंद झाली हे वेगळं सांगायला नकोच.

Thursday, March 5, 2020

Samanta#navatkayahe

#नावातकायआहे#

हीच रुचिता ची पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया होती. जेव्हा राहुल ने त्याचा मानस तिला बोलून दाखवला होता . आपल्या धाकट्या अपत्याचे लेकीचे नाव बदलण्याचा .....
म्हणजे तिच्या नावातील वडील म्हणून आपले असलेले नाव काढून , आई म्हणून रुचिता चे नाव घालण्याचा . आई म्हणून नुसते कर्तव्यापुरते , लाडापुरते नाही , तर दोन मुलां पैकी एकाच्या नावाशी कागदोपत्री देखील आईचे नाव जोडले जावे हा त्याचा सरळ साधा हेतू .

आता नवऱ्याचा सरळ साधा हेतू बायकोच्या सहजासहजी पचनी पडला तर कसं चालेल ? तिला असंख्य प्रश्न पडले . मुळात आत्ता हे करायची काही गरज आहे का ? त्यामुळे काही प्रॉब्लेम आला तर ? लेकीच्या पुढील कागदपत्रांमध्ये काही अडचण अली तर ? राहुल चं उत्तर तयार होतं , पुढे अडचण येऊ नये म्हणून हीच योग्य वेळ आहे . ती म्हणाली , उद्या लग्न झाल्यावर आपलं आडनाव तरी लेक पुढे लावणार आहे का हे कुठे नक्की आहे ? आडनावाचाच भरोसा नाही तर माझं नाव जोडलेलं राहील याची काय शाश्वती ? यावर तो म्हणाला  लगेच १० वर्षात तिचं लग्न लावणार आहोत का आपण ? पुढचं पुढे बघू . हि लगेच म्हणाली , मग लेकाचं का नको ? राहुल चं हि बरोबर होतं मुलाच्या स्कूल लिविंग आणि मार्कशीट वर  आधीच वडील म्हणून त्याचं  नाव आलंय . त्या पेक्षा लेकीचं बदलणं सोपं आहे .

मग रुचिता ने  ब्रम्हास्त्र काढलं . तुझ्या लेकीला चालणार आहे का विचार आधी . नाही  म्हटलं तरी तो ही गडबडलाच . लेकीला एव्हाना स्वतःची मतं आहेत हे तो चांगलंच जाणून होता . लेकीसमोर हा  विषय काढताच अपेक्षित रिऍक्शन आली
"हे काय ...... नाव का बदलायचं ? मला सवय झाली आहे याच नावाची , मी एकटीच शाळेत आणि बाकी सगळीकडे ऑड मॅन आऊट होईन , मग सगळे काय म्हणतील" वगैरे प्रश्नांच्या फैरी झडल्या .

रुचिता  गालातल्या गालात हसत होती . राहुल ने काही दिवस जाऊ दिले . थोडे लेकीच्या कलाने वागून घेतले . लेकीने हि संधी ओळखून वरचेवर काही दिवस बाहेरून पार्सल ऑर्डर्स मागवून घेतली . पुन्हा हा विषय लेकीसमोर काढल्यावर ती परत आपल्या मागच्याच भूमिकेवर ठाम . ती बधायला तयार नाही म्हटल्यावर त्याने त्वरित खिसा आवरता घेतला आणि आपला पवित्रा  बदलायचे ठरवले. लेकीला  समज तशी चांगली होती , हे तो जाणून होता. त्यामुळे आता सरळ तिच्याशी आपली या विषया  मागची भावना शेअर करायचे त्याने नक्की केले .
या शेअरिंग चा मात्र हवा तो परिणाम झाला आणि लेक तयार झाली.

आता त्याने मैदानच मारले म्हटल्यावर रुचिता  ला नवीन काही मुद्दे उरलेच नाहीत . लगोलग राहुल  कामाला लागला , आवश्यक ती तजवीज केली , आणि मनात आलेला विचार कृतीत उतरवला . इतके दिवस काथ्याकूट करता करता वारंवार कानावर पडत असलेले नवीन नाव एव्हाना घरात सर्वांच्याच सवयीचे झाले . त्यामुळे त्यातील वेगळेपणाचा अंश तर गेलाच , आणि त्या जागी नव्या समानतेची नांदी आणणारे लेकीचे बदललेले नाव सर्वांच्या मुखी शोभू लागले.
रिद्धिमा रुचिता साने.







Samaanta2

#भाग2नवराबायको
"राहुल, आज रात्री मी घरी नाहीए, लक्षात आहे न? "
"का गं, कुठे टूर का?"
"अरे टूर कसली, विसरलास ना? रेवती ची मंगळागौर नाही का? तुझ्या बहिणीचा कार्यक्रम तरी विसरू नकोस रे?"
"ओह, विसरलोच, अगं पण तुला एकाच दिवशी दुसरं पण काहीतरी होतं न? तुझ्या मैत्रिणीची पण मंगळागौर होती ना?"
"आहे ना, मी गार्गी कडे संध्याकाळी हळदीकुंकु ला जाऊन रात्री आपल्या घरी रेवती च्या जागरणाला जाणार आहे. मी आईंना कळवलंय तसं तू रात्री ये तिकडे डायरेक्ट जेवायला.
"ओके चल गुड बाय "

"ये रुचिता, जा चेंज करून ये, जेऊन घे मग मस्त जागून धमाल करायची आहे."
"अरे वा, रुचिता आली का? आम्हाला वाटलं जमणार नाही तुला जागरणाला यायला. तशीही पुजेला आणि हळदीकुंकु ला नव्हतीसच तू."
"काकू अहो आमचं आधीच बोलणं झालं होतं, शेवटी सगळ्यांची एकत्र भेट होणं महत्त्वाचं बाकी फक्त जमायला निमित्त आहेत."
"हो बाई विसरलेच, तुमचं काय बाबा ते समानता वगैरे जपणारं कुटुंब."
"काकू अहो समानतेचा हक्क मागणार्या आम्ही माणूसघाणी नसतो. मला तुम्ही सगळी माणसं हवी आहात. तुमच्या आमच्या कुटुंबात फरक इतकाच आहे कि आम्ही एकाचे लाड करताना दुसर्याची  गळचेपी होऊ देत नाही, सगळ्यांना स्पेस देत एकत्र येतो आम्ही."
"वा,वा,छान छान, म्हणजे नक्की काय करता तुम्ही?"कुतूहल म्हणून विचारतेय हं."
"हो सांगते न, संसार, मुलं, करियर आमचं दोघांचं आहे,  त्याची उस्तवार आम्ही दोघे मिळून करतो. घरातील कोणत्याही कामाची हे बाईचं हे पुरुषाचं अशी विभागणी नाही. बाहेरच्या आघाडीवर आम्ही जितक्या समान पातळीवर आहोत तितकेच घरीदेखिल आहोत. वीकेंड ला सुद्धा  राहुल आणि मी आपापल्या वेळेची समान विभागणी करत मित्रांच्या संगतीत कधी एकेकटे कधी एकत्र एंजाॅय करतो. अशाने मुलांजवळ नेहमी आमच्या पैकी एक जण असतंच आणि आम्हाला ही आमच्या अॅक्टिविटीज बिनधास्त करता येतात. मुलांचा अभ्यास ज्याला जसा वेळ असेल तसा घेतो. रोज मुलं शाळेतून पाळणाघरात जातात त्यामुळे त्यांचा कुठलाच भार घरातल्या ज्येष्ठांवर पडत नाही. त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे लाईफ जगता येतं, कोणत्या ही कायमच्या जबाबदारी विना नातवंडांना नुसतं भेटता येतं. "
"आला आला राहुल सुद्धा आला......तुझंच कौतुक चाललंय राहुल."
"थॅन्कस, पण खरंच काही विशेष नाही उलट हल्ली या बेसिक गोष्टी केल्याच पाहिजेत. काकू आमचं व्हायचं काय कि आम्हाला उत्तम शिक्षण आणि उत्तम करियर ची बायको तर हवी पण तिचा घरातला भार आम्ही पुरुष कमी नाही करणार, ते एकतर बायकोनंच सुपरवुमन होऊन करायचं किंवा मग आमच्या आया सासवांनी करायचं. आम्ही मात्र एक मूल जन्माला घालायचं योगदान देऊन संसारातून मुक्त. हे किती दिवस चालणार ."

समानता पुरेपूर अंगीकारलेल्या या नवरा बायको चे असेच स्वप्नचित्र तुमच्या मुंलांसाठी पाहताय ना?
ही